हायड्रोजन आणि कार्बन हे रबरातील मुख्य रासायनिक घटक. रबर हे एक बहुवारिक आहे. रेणू तयार होताना दोन किंवा अधिक मूलद्रव्य एकमेकांशी विशिष्ट पद्धतीनं जोडलेली असतात. जेव्हा या रेणूंची लांब अशी साखळी तयार होते. तेव्हा त्याला ‘बहुवारिक’ म्हणतात. मायकेल फॅरडे यांनी रबराच्या झाडाचं विश्लेषण केलं. चिकाचं अपघटन केल्यावर आयसोप्रीन नावाचा एक पदार्थ मिळतो. आयसोप्रीनमध्ये कार्बनचे ५ आणि हायड्रोजनचे ८ अणू दुहेरी पद्धतीनं एकमेकांशी जोडलेले असतात. साधारण ८० वनस्पतींच्या कुलातील चिकापासून नसíगक रबर मिळवता येतं. हेविया ब्राझीलिअस, कॅस्टिला इलास्टिका, फायकस इलास्टिका या त्यापकी काही निवडक वनस्पती. वनस्पती साधारण सात ते आठ वर्षांच्या झाल्यावर वनस्पतीच्या खोडावर छेद देऊन चीक गोळा केला जातो. गोळा केलेला चीक पहिल्यांदा गाळला जातो. गाळलेला चीक अॅल्युमिनिअमच्या टाकीत ठेवतात. त्यात अॅसेटिक आम्ल घालून रात्रभर ठेवतात. चीक साकाळतो. त्यातील घट्ट पदार्थ आणि पाणी वेगवेगळे होतं. हा चोथा म्हणजेच रबराचं प्राथमिक रूप. हा चोथा टाकीतील पत्र्यावर जमतो आणि त्याच्या लाद्या तयार होतात. त्यानंतर त्यात गंधक किंवा सिलिनियम, बेंझॉइल पेरॉक्साइड असे इतर पदार्थ वापरून व्हल्कनीकरणाची प्रक्रिया केली जाते. व्हल्कनीकरणाची क्रिया लवकर होण्यासाठी त्यात नायट्रोसो डायमिथिल अॅनिलीन, डायमिथिल ग्वलिडीन असे कार्बनी पदार्थ आणि मॅग्नेशिअम ऑक्साइड, झिंक ऑक्साइड असे अकार्बनी पदार्थ वापरतात. काजळी, सिलिका, काही काबरेनेट्स हे पदार्थ रबराला मजबुती येण्यासाठी वापरतात. हवेतील ऑक्सिजनचा रबरावर दुष्परिणाम होऊ नये म्हणून त्यात फिनिल बीटा नॅप्थिल अमाइन हा पदार्थ वापरतात. हे सर्व करीत असताना रबर प्रमाणापेक्षा जास्त कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात. ही अडचण दूर करण्यासाठी वनस्पती तेलं, खनिज तेलं, मेदाम्लं अशा काही पदार्थाचा उपयोग केला जातो.
टायर किंवा खोडरबरासारख्या वस्तूंचं घर्षण जास्त होतं. अशा वस्तू तयार करताना पमिस, सिलिका असे पदार्थ वापरले जातात. रबरापासून रंगीत आकर्षक वस्तू तयार करताना त्यात टिटॅनिअम डाय-ऑक्साइड, झिंक सल्फाइड आणि इतर काही कार्बनी पदार्थ वापरले जातात.
सुचेता भिडे (कर्जत) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा