दोन-तीन वर्षांपूर्वी माझ्या स्वभावाप्रमाणे उतारवयातही मी एक जरा अतिरेकी प्रयोग केला. त्यात माझ्या मुंबईच्या व्यवसायावर थोडंफार पाणी सोडून एका ग्रामीण, पण अत्याधुनिक रुग्णालयात महिन्यातले १५ दिवस सेवा देण्याचा प्रयत्न केला. परिसर रम्य आणि नीटनेटका होता. अगदी लहान-लहान वस्त्यांमध्येही बाहेर एका गोऱ्यापान निळे डोळे असलेल्या बाईचे छायाचित्र झोपडीवजा घरावर लावलेले दिसे आणि वर मराठीत पाटी असे ‘ब्यूटी पार्लर’. इथल्या एका बाईशी मी बोललो. तिने याचा अर्धाकच्चा तथाकथित कोर्स जवळच्या तालुक्याच्या गावी केला होता. मला म्हणाली, भरपूर मागणी आहे. एका बाईला मढविण्याचे २५ रुपये घेते. तेवढीच घरात मदत होते.
हल्ली कोपऱ्या-कोपऱ्यावर ब्युटी पार्लर्स निघाली आहेत. भारतात आर्थिक उदारीकरण आल्यावर जर कोणी आपल्या तुंबडय़ा ओतप्रोत भरल्या असतील तर या सौंदर्य प्रसाधक निर्मात्यांनी आणि विक्रेत्यांनी. जर आपण गेल्या दहा-वीस वर्षांचा इतिहास बघितला तर उदारीकरणाच्या पहिल्या पाच वर्षांत भारतातल्या अर्धा डझन स्त्रियांनी विश्व किंवा तत्सम सुंदरींचे किताब पटकाविले. याच्या मागे या प्रसाधनांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हात होता, अशी वदंता आहे. एखादे धरण फुटावे तसे हे लोण पसरले आणि डोंबिवली आणि पाल्र्याच्या मुलीदेखील हायहिल्स घालून, लचकत चालत सौंदर्य स्पर्धामधून झळकू लागल्या. हल्ली जो तो सुंदर होऊ पाहतो आहे. त्यात पुरुषांची संख्या कमी असली तरी नगण्य नाही.
सगळ्यांना चरबी स्वस्तात काढून मिळत असेल तर हवी आहे. सुरकुत्या नको आहेत. टक्कल पडले तर नरकवास मिळाल्याची शिक्षा समजतात. शरीरावर कोठेही जिथे नको तिथे एक जरी केस उगवला तरी साप डसल्यासारखी आपत्ती ओढवली असे वाटते. कोणाला स्तन मोठे हवे आहेत. काहींना लहान करून हवे आहेत. कोणाला कृत्रिम खळी पाडून घ्यायची आहे. ज्यांना थोडेफार मुरुमाचे व्रण आहेत त्यांना इस्त्री करून हवी असते. मेकअपचे तर काही विचारूच नका. वधू इतकी नटते की, ती स्वत: कुठे दिसतच नाही आणि जेव्हा उगवते तेव्हा एक-दीड तास उशिरा येते.
हा देश स्वतंत्र आहे आणि बायकांविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची हल्ली सोय नाही. माझी तरी नाही आणि वर मी पडलो प्लास्टिक सर्जन. असे लिहिणे म्हणजे स्वत:च्या पोटावर पायच, पण या भानगडीतले काही अशोभनीय किस्से येत्या सोमवारच्या लेखात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा