अॅन फेल्डहाउस या अमेरिकन विदुषी सध्या अॅरिझोना स्टेट विद्यापीठात पौर्वात्य धार्मिक अभ्यास विभागाच्या प्रमुख असून महाराष्ट्राचा सांस्कृतिक भूगोल आणि मराठी लोकसाहित्याचा त्यांचा अभ्यास स्तिमित करणारा आहे. या अभ्यासासाठी त्या पुण्यात आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत अनेक वेळा येऊन राहिल्या आहेत. मराठी लोकसाहित्याचे अनुवाद आणि त्यावर त्यांनी साहित्यनिर्मितीही केली आहे.
प्रत्येक वेळेला भारतात आल्यावर अॅन प्रथम पुण्याला एका कुटुंबात राहत आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांत जाऊन त्या तेथील रहिवाशांचा अभ्यास करीत. १९७२ आणि १९७४ च्या त्यांच्या मराठी कुटुंबातल्या मुक्कामात त्यांनी मराठी स्त्रियांप्रमाणे राहणीमानात बदल केला. साडी नेसणे, मराठीतच संभाषण वगरे. १९७६ मध्ये अॅननी पीएच.डी. करताना प्राचीन महानुभाव वाङ्मयाचं संशोधन करून त्यातल्या सूत्रपाठाचा इंग्रजी अनुवाद करून ‘दि महानुभाव सूत्रपाठ’ हे पुस्तक लिहिलं. महानुभाव तीर्थस्थान रिधीपूरच्या स्थळमाहात्म्याविषयी ‘दि डीड्स ऑफ गॉड इन रिधीपूर’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या त्यांच्या साहित्यनिर्मितीत त्यांनी प्राचीन मराठी वाङ्मयाचे प्रसिद्ध अभ्यासक शं. गो. तुळपुळे यांना प्राचीन मराठी शब्दकोशाचे संपादन करण्यातही अॅन यांनी मोठी मदत केली. त्यांनी लिहिलेल्या इतर पुस्तकांमध्ये ‘वॉटर अँड वूमनहूड इन महाराष्ट्र, रिलीजस मिनिंग ऑफ रिव्हर्स’ हे पुस्तक त्यांनी नद्यांच्या माहात्म्याविषयी पोथ्यांचा अभ्यास करून लिहिलं तसंच नदीपरिक्रमा स्वत: करून, नदीसंदर्भातल्या विविध कर्मकांडांचं परिशीलन करताना स्त्रीत्वाचा नदीशी निगडित संबंध यावर १९९६ साली लिहिलं.
अॅन काही काळ धनगरांच्या वस्त्यांमध्ये राहून हटकरी धनगरांची दैवतं धुळोबा आणि विरोबा यांच्याविषयी असलेल्या ओव्यांचा त्यांनी अभ्यास केला. गुंधर सोन्थायगर यांनी या ओव्यांच्या ध्वनिमुद्रिकांचे काम सुरू केलं होतं, परंतु त्यांच्या निधनामुळे बंद पडलेले हे काम अॅननी पूर्ण करून त्याचं संपादन केलं. ओवी संग्रहासाठी प्रस्तावना लिहिली. हा ओवीसंग्रह ऑक्सफर्ड युनिव्हर्सटिी प्रेसने अलीकडे ‘से टूर सन, सेंट राईज अँड टू द मून, डोंट सेट’ या नावाने प्रसिद्ध केलाय. तसेच अॅन यांचे ‘कनेक्टेड प्लेसेस’ हे भारतीय धर्म, तीर्थयात्रा यासंबंधीचे पुस्तकही साली प्रकाशित झाले आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com