डिट्रॉइटच्या स्ट्रेथ हॉस्पिटलमधले माझे वास्तव्य बेकायदाच होते. कुक कौंटी रुग्णालयाला शैक्षणिक दर्जा होता म्हणून एक विशिष्ट व्हिसा मिळत असे. त्याची मुदत एक वर्ष होती, पण ती मुदत त्या रुग्णालयाशी संलग्न होती. मी तिथून राजीनामा देऊन पळाल्यानंतर ती संलग्नता संपुष्टात आली. स्ट्रेथ रुग्णालयात मी शिकत होतो, पण त्या रुग्णालयाला शैक्षणिक छप्पा नव्हता, तेव्हा मी बेकायदा रहिवासी झालो होतो. तो काळ अर्थात निराळा होता. अमेरिकेत येण्यासाठी त्या वेळी ECFMG नावाची परीक्षा भारतात घेत असत. ती फुकट असे. तुम्ही अमेरिकेत जाऊन नोकरी केलीत तर मग त्यांना कळवून पहिल्या पगारातून थोडे शुल्क भरावे लागे. मला आठवते मी ती परीक्षा मुंबईत जयहिंद कॉलेजमध्ये दिली आणि येऊन-जाऊन बसचे भाडे झाले १ रुपया. माझ्या बेकायदेशीर स्थितीचा विषय मी एकदा हळूच काढला तर तिथल्या Dr. Hipps ने थेट सिनेटरलाच फोन लावला, तेव्हा तो म्हणाला, ‘कोणी फारच चौकशी केली तर मला कळव. तुझ्यासाठी मी सिनेटमध्ये ठरावच मांडतो आणि तो प्रलंबित असेपर्यंत तू इथे सुखाने राहू शकतोस. आमच्या देशाला सुशिक्षित माणसांची गरज आहे.’ मी थक्कच झालो. हा इथला अस्सल राजकारणी. अट्टल गुन्हेगारांना कशाचीच पडलेली नसते आणि माझ्यासारख्याला अशा क्षुल्लक गोष्टी पछाडतात याचे हे उदाहरण होते.
कोणी चौकशीला आलेच नाही; परंतु स्ट्रेथ हॉस्पिटलमधल्या त्या सुंदर बायका ज्या आणखी सुंदर होऊ पाहात होत्या त्यांना मी हळूहळू कंटाळू लागलो होतो. हे असले काही भारतात जाऊन मला करायचेही नव्हते. प्लास्टिक सर्जरीतील इतर विज्ञान शिकायचे शिकायचे होते असे वाटून मी खूपच खट्टू होत असे. या काळात मी अमेरिकेतच राहावे, इथेच नशीब काढावे, खूप पैसा मिळवून मोठे घर घ्यावे, दोन-तीन गाडय़ा ठेवाव्यात असे स्वप्नही मला कधी पडले नाही. किंबहुना शिकागो आणि डिट्रॉइटमध्ये असताना दोन वकील मला भेटून गेले ‘तुम्हाला Green Card आम्ही मिळवून देऊ, फक्त १५०० डॉलर फी घेऊ’ असे ऐकून झाले होते, पण मनाने कधीही अमेरिकेचे वेड घेतले नाही हेच खरे.
आता पुढे काय असा विचार सतवत असताना एक दिवस फोन खणाणला. पलीकडचा माणूस होता माझा एक जुना नायर रुग्णालयातला मित्र. म्हणत होता ‘तू इथे आहेस हे कालच कळले. मी इथल्या विद्यापीठाच्या रुग्णालयात प्राध्यापक आहे. उद्या भेटायला ये. तुला पाहिजे ती नोकरी देतो.’’ केलेल्या प्रयत्नांची काही ना काही फळे माणसाला मिळतातच असे गीता म्हणते तसेच होणार होते; परंतु त्यासाठी काहीतरी करत राहावे लागते.
कुतूहल – कीड नियंत्रण व पाणी
परंतु फवाऱ्याने पाणी दिले तर आपल्याला पावसाळ्यासारखाच परिणाम मिळतो. झाडेही भिजतात आणि जमिनीलाही पाणी मिळते. अशाच फवाऱ्याने झाडांवर पाणी मारले तर त्याचा कीडनाशक औषधांपेक्षा चांगला परिणाम दिसून येतो. मी माझ्याकडच्या झाडांवर औषधांच्या फवाऱ्याऐवजी पाण्याचा फवारा मारायला सुरुवात केल्यावर पहिली गोष्ट म्हणजे माझा औषधांचा खर्च कमी झाला. मग जवळपास ८० टक्के किडी व रोग फवाऱ्यामुळे नष्ट होतात, असा मला अनुभव आला. फवाऱ्यामुळे पानांच्या खालूनही पाणी मारले जाते आणि त्यामुळे किडींची अंडी नष्ट होतात. मात्र अशा फवाऱ्यांचा खोड किडींवर काहीही परिणाम होत नाही.
आमच्या विहिरीवर पाच अश्वशक्तीचा पंप बसविलेला आहे. या पंपातून दोन इंची पाण्याचा प्रवाह मिळतो. त्यातील एक इंची पाइप आम्ही फवाऱ्यासाठी वापरून दुसऱ्या एक इंची पाइपने पाणी विहिरीत सोडून देतो. त्यामुळे पंपावर ताण येत नाही. विहिरीत सोडलेल्या पाण्यामुळे विहिरीचे पाणी हलते राहून त्यात शेवाळे होत नाही.
फवाऱ्यासाठी असलेल्या एक इंची पाइपला अर्धा इंची पी.व्ही.सी. पाइप रिडय़ूसर लावून बसविला की पाणी खूप जोराने येऊ लागते. त्या अर्धा इंची पाइपला पुढे स्टॉपर लावून त्याला भोके पाडली म्हणजे आपल्याला हवा तसा फवारा बनविता येतो.
असेच फवारे ठराविक अंतरावर लावून जमिनीवरील पिकांनाही पाणी देता येते. त्यासाठी पिकाची भूमिती बदलून लागवड ठराविक अंतरावर केल्यास प्रत्येक रोपाला पावसासारखे पाणी मिळते. हवेतून आलेल्या पाण्यात नत्र मिसळल्याने पिकाला फायदाच होतो. पाण्याचे योग्य नियोजन केलेले असल्यास व पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास ही पद्धत वापरणे फायदेशीर ठरते.
अशोक जोशी (पुणे) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
वॉर अँड पीस – कामांधता : वाढती समस्या – १
आजकाल कोणतेही वर्तमानपत्र उघडा, महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या मोठय़ा घटनांपासून लहान सहान विनयभंगाच्या घटनांच्या ठळक प्रसिद्धीमुळे थोर थोर विचारवंतच काय माझ्यासारखा छोटा माणूसुद्धा सुन्न होऊन जातो. बसेस, टॅक्सी, रेल्वेचे डबे, सिनेमा नाटकांचे हॉल, पंचतारांकित हॉटेल काही काहीच सुरक्षित नाही अशी बहुसंख्य महिलांची भावना झाली आहे.
समाजशास्त्रज्ञ, समाजातील विचारवंत, मार्गदर्शक यांवर विचार करत आहेत. मानवी मन अगाध आहे. या शरीराला मन नावाचे एक विलक्षण योगदान मिळालेले आहे. या मन नावाच्या अवयवाला अनेकानेक इच्छा, वासना, लोलुपता यांचा कमी अधिक संपर्क होत असतो. काम म्हणजे इच्छा यापासून कोणताच देव वा दानव सुटला नाही. कावीळ या विकाराला ‘कामला’ म्हणजे काम या भावनेचा लय अशा अर्थाने संबोधले जाते. या विकारात भूक, रुची यांचा लय होतो. यकृताचे, पित्ताचे स्राव सुटत नाहीत. उपचार रुची भूक उत्पन्न करण्याकरिता असतात. या कामला विकाराच्या उलट कामवासना हा विकार. देवाधिदेव, इंद्र यांच्यासह थोर ऋषीमुनींनाही या रोगाने केव्हातरी पछाडलेले आहे. कामवासना वैध मार्गाने शमवण्यात वावगे काहीच नाही. पण दुष्ट कामवासनेमुळे आपले मन आपल्या ताब्यात राहणार नसेल, स्वत:च्या कुटुंबाचे व परस्त्रीचे नुकसान होणार असेल तर अशी कामवासना टाळता येण्याकरिता काय करता येईल असा विचार वैद्यकीय चिकित्सकांना पडतो.
‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे साधन’ अशा नुसत्या तोंडदेखले तत्त्वज्ञानापेक्षा पुढील उपाय करून पहावे. आपण नित्य जो आहार घेतो त्यातील पौष्टिक, मांस, मेदोवर्धक, शुक्रवर्धक घटकद्रव्ये कमी करावी. निकस अन्न खावे, गहू, भात, हरभरा, वाटाणा, उडीद, मांसाहार, मिठाई टाळावी. ज्वारी, बाजरी, सातू, मूग, उकळलेल्या भाज्या खाव्या. गरम गरम पाणी प्यावे. दुपारी झोपू नये, रात्री जेवणानंतर फिरून यावे. दीर्घ श्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्कारांचे महत्त्व मी सांगावयास नकोच
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ११ मे
१८७८ > न्या. महादेव गोविंद रानडे व ‘लोकहितवादी’ गोपाळराव हरी देशमुख यांच्या पुढाकाराने पहिले ‘मराठी ग्रंथकार संमेलन’ या दिवशी भरले. हे मराठीतील पहिलेच साहित्य संमेलन. साहित्याच्या मुख्य धारेतील ‘अ. भा. मराठी साहित्य संमेलनां’चा इतिहासही याच संमेलनापासून मोजला जातो. पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष स्वत: न्या. रानडेच होते. विशेष म्हणजे, रानडे यांनी फेब्रुवारी १९७५ पासून या संमेलनाच्या संस्थात्मक उभारणीसाठी तयारी सुरू केली होती. त्या दृष्टीने, मराठीत गद्य व पद्याची किती पुस्तके तोवर प्रकाशित झाली आहेत याची एक सूची बनविण्याचेही काम रानडे यांनी सुरू केले. त्या काळात मराठी गद्याची सुमारे ४३१, तर पद्याची २३० पुस्तके मराठीत होती! दुसरे संमेलन बऱ्याच काळाने (१८८५) भरले, तेव्हा महात्मा जोतिबा फुले यांनी अशा संमेलनांवर केलेल्या टीकेमुळे विद्रोही साहित्याचा इतिहास बळकट झाला.
१९५८ > नाटककार व नट नागेश रामचंद्र जोशी यांचे निधन. रंगभूमीच्या पडत्या काळात छोटा गंधर्व व शंकर आपटेंसह ‘कलाविलास’ ही व्यावसायिक नाटय़संस्था स्थापून त्यांनी ‘देवमाणूस’, ‘मैलाचा दगड’, कामगार संप व मजुरांच्या एकजुटीवरील ‘सं. विजय’, ‘अंतरपाट’ अशी नाटके लिहिली होती.
– संजय वझरेकर