मातीत कोणते जंतू तग धरून राहातात आणि वाढतात, हे त्या मातीच्या गुणधर्मावर आणि त्या ठिकाणाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, कोंकणातल्या लाल मातीतली फॉस्फरसयुक्त संयुगे पाण्यात विद्राव्य नसतात. वनस्पतींप्रमाणेच सूक्ष्मजंतूंनाही फॉस्फरस या मूलद्रव्याची गरज असल्याने या मातीत निसर्गत: उपलब्ध असणाऱ्या अविद्राव्य फॉस्फेटचे पाण्यात विद्राव्य अशा रूपात परिवर्तन करणारे सूक्ष्मजंतूच अशा प्रकारच्या मातीत तग धरून राहातात. महाराष्ट्रातल्या काळ्या मातीत लोहाची कमतरता असते. कारण या मातीत निसर्गत: असणारे लोह जैव घटकांना उपयोगी पडत नाही. या लोहाचे रूपांतर जैव घटकांना उपयोगी प्रकारात करावे लागते. त्यामुळे जे सूक्ष्मजीव हे परिवर्तन घडवून आणू शकतात, तेच या मातीत तग धरून राहू शकतात. जर एखाद्या जमिनीत नायट्रोजनयुक्त संयुगांची कमतरता असेल तर हवेतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करू शकणारे सूक्ष्मजंतूच अशा जमिनीत जिवंत राहू शकतील.
थोडक्यात म्हणजे जमिनीत जी काही कमतरता आहे, ती दूर करू शकणाऱ्या सूक्ष्मजंतूंचे त्या जमिनीत अगोदरपासूनच वास्तव्य असते. अशा जमिनीत असणारी कमतरता नाहीशी करण्यासाठी प्रयोगशाळेत वाढविलेल्या खास सूक्ष्मजंतूंची संवर्धने वापरा असे शेतकऱ्यांना सांगणे हा बनवाबनवीचाच प्रकार आहे. असे जंतू त्या जमिनीत बाहेरून घालण्याची अजिबात आवश्यकता नसते. कारण अशा प्रकारचे सूक्ष्मजंतू जमिनीत निसर्गत:च राहात असतात. गरज असते ती त्यांची जमिनीतली संख्या वाढविण्याची आणि यासाठी उच्च पोषणमूल्य असलेला कोणताही सेंद्रिय पदार्थ या जमिनीत घातला तर त्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते.
गहू, तांदूळ, ऊस अशा गवतवर्गीय पिकांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर सिलिका आढळते. हल्ली काही व्यावसायिक सिलिकॉनयुक्त संयुगे शेतात घाला असा प्रचार करीत आहेत, पण तसे करण्याचीसुद्धा काहीही आवश्यकता नसते. आपल्या मातीत मोठय़ा प्रमाणात सिलिकेट असते आणि मातीतलेच काही विशिष्ट सूक्ष्मजंतू हे सिलिकेट वनस्पतींना उपलब्ध करून देत असतात. त्यांना फक्त सेंद्रिय पदार्थ देऊन जमिनीतली त्यांची संख्या वाढविल्यास ते वनस्पतींना सिलिका उपलब्ध करून देतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा