सागरातील परिसंस्थेत आढळणाऱ्या विविध प्रकारच्या शैवालांना ‘सी-वीड’ या नावाने ओळखले जाते. यात वीड हा शब्द आला असला तरी हे वनस्पतीतील सामान्य तण नसून त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. काही सागरी शैवाल सूक्ष्म एकपेशीय तर काही विशाल आकाराचे बहुपेशीय असतात. बहुधा सागरी शैवाल सागराच्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रात दृढ आधाराला चिकटून असलेले आढळतात. खडकाळ सागर किनाऱ्यांवर त्यांचे अधिक वास्तव्य असते. भारताच्या संपूर्ण सागरी किनाऱ्यावर शैवालांच्या एकूण ८०० जाती आढळतात. त्यांचे वास्तव्य खोल सागरात क्वचितच आढळते. सागरी शैवालांचे वर्गीकरण रंगानुसार तीन गटांत करतात, क्लोरोफील हरितद्रव्य असणारे हिरवे शैवाल, झ्ॉन्थोफीलधारी तपकिरी शैवाल आणि फायकोइरीथ्रीनयुक्त लाल शैवाल. ओहोटीच्या सुमारास खडकाळ सागरी किनाऱ्यांवर भटकंती केल्यास विविध प्रकारचे शैवाल पाहायला मिळते, तसेच तेथील खोलगट डबक्यांतही (कोस्टल पूल्स) दिसून येतात.
सागरी शैवाल हा अनंतकाळ उपलब्ध असणारा, व्यावसायिक महत्त्वाचा एक जिवंत अन्नस्रोत असतो. सर्व सागरी शैवाल हे स्वयंपोषी, जलद वाढणारे, सागराच्या भरती-ओहोटी क्षेत्रात आढळणारे, वाढीसाठी वेगळी जमीन न लागणारे स्रोत आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती न आल्यास हा अक्षय साठा उपलब्ध असतो. सागरी शैवालांची वाढ जमिनीवरील वनस्पतींपेक्षा अनेक पटींने अधिक असते. सागरी शैवाल मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असूनही, त्याला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन अधिक सोयीस्कर उपलब्धतेसाठी मानवाने त्यांची शेती करण्याचे तंत्रज्ञान फार पूर्वीपासून आत्मसात केले. आता हा जागतिक उद्योग झाला आहे, कारण यांचा उपयोग प्राण्यांच्या खाद्याव्यतिरिक्त मानवासाठीही करता येतो. या व्यवसायात जपान, दक्षिण कोरिया आणि चीन हे देश आघाडीवर आहेत. सध्या सागरी शैवालांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ पाश्चात्त्य देशांमध्ये पण आवडीचे होत आहेत.
समुद्र शैवाल हरितद्रव्याच्या साहाय्याने मोठय़ा प्रमाणात प्राणवायू तयार करतात तसेच हानिकारक कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि जीवसृष्टीला उपयोगी असल्याचे सिद्ध करतात. शिवाय समुद्रातील जीवांना आश्रय व अन्न देतात. काही सागरी शैवाले औषध, खते, सौंदर्यप्रसाधने यांच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतात. काही सागरी शैवालांमधील चिकट स्वरूपाच्या रसायनांचा वापर स्थिरीकरण करणारे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो.
– डॉ. चंद्रकांत लट्टू
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org