बुडुख म्हणजे बुंधा, आधार. एकदा आधार घट्ट असला की पुढे सरणे सोपे जाते. झाडाचा बुंधा चांगला असला की पर्णसंभार चांगला फोफावतो, विस्ताराला अडचण येत नाही, असा या म्हणीचा अर्थ घेता येईल. काही जण फार भाग्यवान असतात. जगण्यासाठी त्यांना भक्कम व्यासपीठ दैवानुसार मिळालेलेच असते. त्याचा त्यांच्या जगण्यासाठी त्यांना चांगला उपयोग होऊ शकतो. वडीलधाऱ्या लोकांच्या मोठेपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना यशाचा टप्पा गाठता येऊ शकतो. अर्थात असे व्हायला त्यांच्या अंगीही काही गुण, कर्तृत्व असणे आवश्यक असते. पण तसे सर्वाच्या जवळ असतेच असे नाही ना! वडिलांचे नाव मोठे आणि यांचे मात्र लक्षण खोटे असेही होऊ शकतेच. तेव्हा ही म्हण त्यांना लागू पडेल असे वाटते. उदा. एका अतिशय विद्वान पंडिताची मुलगी मेघना. ती इतक्या विद्वान पंडिताची मुलगी म्हणून तिला सारेच जण खूप मान द्यायचे, तिची प्रशंसा करायचे. पण ती वडिलांच्या कीर्तीवरच जगल्यासारखी होती. वडिलांच्या पुण्याईचा ती फायदा घ्यायची. मग काय लोक बोलायला कमी करतात की काय! लोक म्हणायचेच, ‘‘मेघनाचं बरं आहे म्हणायचं, ‘वडिलांचे बुडुख आणि नाचे तुडुक तुडुक!’ आयजीच्या जिवावर बायजी उदार! असंच म्हणा की!’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा