– डॉ. निधी पटवर्धन nidheepatwardhan@gmail.com
भाषासूत्र लिहायला लागल्यापासून कौतुकाप्रमाणेच कानउघाडणीचीही पत्रे येतात. आम्ही मराठीचा आग्रह धरतो, म्हणजे इंग्रजीचा दुस्वास करतो, असे अनेकांना वाटते. आधुनिक युगात प्रत्येक पोटार्थी व्यक्तीला इंग्रजीचे किमान कामचलाऊ ज्ञान असणे आवश्यक आहे, याची पूर्ण जाणीव सर्वानाच आहे.
कोणतीच भाषा बांधीव स्वरूपाची राहून चालणार नाही, ती प्रवाही असणार. अनेक शब्दांना आपल्यामध्ये सामावून घेऊन पुढे जाणार. स्वाभाविक आणि सहजसुंदर मराठी भाषेची ओळख घराघरांतून होणे आवश्यक आहे.
सकाळी उठताना ‘अलार्म’ नको ‘गजर’ वाजू द्या. आचवणे हा शब्द आपण विसरत चाललो आहोत. ‘न्याहारी’, ‘भोजन’, ‘परवचा’, ‘गृहपाठ’, ‘अंथरूण-पांघरूण’, ‘कासंडी’, ‘कोनाडा’ या साध्या शब्दांचा परिचय तरी लहानग्यांना करून देऊ या.
एका लेखकाच्या मुलीशी परवाच भेट झाली. ती लंडनला इंग्रजीची प्राध्यापक आहे. तिने मान्य केले की ‘मी माझ्या मुलाशी त्याच्या जन्मापासून मराठी भाषेत बोलले नाही, हे चुकलंच. इंग्रजी तर तो बाहेर शिकलाच असता; पण आता वेळ निघून गेलेली आहे. त्याची समजण्याची आणि विचार करण्याची भाषा इंग्रजीच झाली आहे. इथे आल्यावर आपल्या आज्यांशी तो छान मराठीत बोलू शकत नाही. जमेल तसं तोडकं-मोडकं बोलतो हेच खूप आहे. तो इंग्लंडमध्ये राहणार, वाढणार, नोकरी करणार, कदाचित तिथेच स्थायिक होणार. त्यामुळे आमच्या पश्चात मराठीसाठी एक घर बंद झालेलं असणार. आम्ही पालकच याला जबाबदार आहोत,’ हे सांगताना तिला मनोमन वाईट वाटत होते. मराठी समाजाने जागतिक आव्हाने पेलण्यासाठी इंग्रजी आणि आपली संस्कृती जपण्यासाठी मराठी असा समतोल साधणे आवश्यक आहे, हे तिने आवर्जून सांगितले.
पालकांबरोबरच नभोवाणी, वाहिन्या आणि वृत्तपत्रे ही माध्यमे जनतेची भाषा घडवू किंवा बिघडवू शकतात, म्हणून त्यांनीदेखील अधिक जबाबदारीने वागायला हवे. मराठी ही आपली स्वभाषा आहे, तिच्याविषयी आपली काही भाषिक कर्तव्ये आहेत, याची थोडीशी तरी जाणीव आपण ठेवू या, इतकीच कळकळीची विनंती!