पश्चिम आशियातल्या येमेन या देशापेक्षा या देशातल्या एडन या शहराचे नाव सर्वसामान्यांना अधिक परिचयाचे आहे. पश्चिम आशियातील अरब द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावरील प्रदेशातील येमेन या प्रजासत्ताक देशाचे अरेबिक नाव आहे अल-जम्हूरिया अल-यमन. साडेपाच लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या येमेनच्या उत्तरेला सौदी अरेबिया, ईशान्येला ओमान, दक्षिणेला अरबी समुद्र आणि एडनची खाडी तसेच पश्चिमेस लाल समुद्र अशा याच्या चतु:सीमा आहेत. दोन हजार कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या येमेनमध्ये २०० लहान बेटेही समाविष्ट आहेत. या बेटांपैकी सोकोत्रा हे बेट सर्वांत मोठे आहे. तीन कोटींच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या देशात ९९ टक्के जनता इस्लामी आहे. या इस्लाम धर्मीयांपैकी ६५ टक्के लोक सुन्नी पंथीय, तर ३४ टक्के जनता शिया पंथीय आहे. दक्षिण आणि ईशान्य येमेनमध्ये अधिकतर सुन्नी पंथीयांची वस्ती, तर उत्तर आणि पश्चिम येमेनमध्ये शिया पंथीय लोक बहुसंख्येने आहेत. मुस्लिमांशिवाय उर्वरित एक टक्का लोकांमध्ये ख्रिश्चन, ज्यू, हिंदू आणि काही धर्म न मानणारे आहेत. येमेन हा अरब द्वीपकल्पातला सर्वाधिक धर्मश्रद्धावान देश समजला जातो. येमेनी नागरिकांमध्ये ९३ टक्के लोक अरबी वंशाचे आणि उर्वरितांमध्ये सोमाली, अफ्रो-अरेबिक वगैरे वंशाचे आहेत.
अनेक वर्षे उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन येथील राज्यांमध्ये संघर्ष चालल्यावर २२ मे १९९० रोजी या दोन्ही सत्तांमध्ये समझोता होऊन एक येमेनी राष्ट्र अस्तित्वात आले. येमेनमध्ये सध्या एकल संसदीय सभागृह असलेली अध्यक्षीय प्रणालीची प्रजासत्ताक पद्धतीची राजकीय व्यवस्था आहे. साना हे येथील राजधानीचे शहर. साना आणि एडन ही येथील मोठी आणि औद्योगिक शहरे. येमेनी रियाल हे येथील प्रमुख चलन. अरेबिक ही येमेनची सरकारी प्रशासनाची प्रचलित भाषा असली तरी येथील अरेबिकच्या स्थानिक उपभाषा विविध प्रदेशांमध्ये अधिक बोलल्या जातात. अत्यंत अविकसित देशांच्या गटांमध्ये गणला जाणारा हा देश अरब लीग, युनायटेड नेशन्स, तटस्थ राष्ट्र संघटना आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य देश आहे. येमेनचा मानवी विकास निर्देशांक अत्यंत खालच्या पातळीवर आहे.– सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com