मोठ्या प्रमाणात असलेले अभियंते, तंत्रज्ञानात निपुण तरुण आणि मोठ्या संख्येने असलेला ग्राहक वर्ग हे घटक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील प्रगतीला पोषक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात शिकण्याच्या सोयीसुविधा निर्माण करण्याची चांगली सुरुवात झाली आहे. उत्पादक क्षेत्रे, नोकरीतील संधी आणि तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक कामे सोपी होत आहेत. नवीन तंत्रज्ञान वापराचे समाजावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार असतील तर त्या तंत्रज्ञानाच्या वापराचे नियमन, दिशादर्शन करणे आवश्यक असते. या अनुषंगाने २०१८ मध्ये निती आयोगाने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा आढावा घेणारा चर्चा वृतांत प्रसिद्ध केला. जनतेचे हित लक्षात घेऊन संधी आणि आव्हाने, भावी धोरण आणि कृती आराखडा या वृत्तांतात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोजनाचे कौशल्य व्यक्तीमध्ये निर्माण करणारे शिक्षण विद्यापीठ स्तरावर दिले जाण्यास सुरुवात झाली आहे. या पद्धतीने माफक शुल्कात अद्यायावत ज्ञान उपलब्ध होईल. क्षमता विकासातून रोजगारनिर्मिती तर होईलच, पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग अर्ध नागरी आणि ग्रामीण भागातही होईल. म्हणजेच तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण किंवा लोकशाहीकरण होत आहे. सर्वांत जिव्हाळ्याचा विषय आहे माहितीची गुप्तता राखणे आणि तिचा उचित उपयोग करणे. सरकारने माहिती घेणे, वापरणे आणि हस्तांतर करणे या व्यवहाराचे नियम ठरवणारे विधेयक तयार केले आहे. ते संसदीय समितीकडे विचारार्थ पाठवले आहे. विशिष्ट क्षेत्रे उदाहरणार्थ आरोग्य सेवा, वित्त आणि वाहतूक यासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या संस्थांनी पारदर्शकता, नैतिकतेसंदर्भात स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन केले आहे. या क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या खासगी उद्याोगांनीही या दृष्टिकोनास सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.
हेही वाचा : कुतूहल: भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल
कोणताही पूर्वग्रह न बाळगणारी तसेच मानवी समाजासाठी अहितकारक गोष्टी टाळणारी कृत्रिम बुद्धिमता म्हणजे नैतिकता पाळणारी कृत्रिम बुद्धिमत्ता! कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित एखाद्या प्रक्रियेतून मोठी हानी झाली तर जबाबदार कोण? याविषयीचे संशोधन भारतात सुरू झाले आहे. ही धोरणे कालानुरूप विकसित होतील आणि प्रगतीला पूरक ठरतील. भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास व स्थिती, खूप उंचावर जाऊन पर्वतावर बसलेल्या व अधिक उत्तुंग आणि मुक्तपणे विहार करावयास सज्ज आणि उत्सुक अशा गरुडासमान आहे.
प्रा. किरण बर्वे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org