आधी डोळय़ांनी निरखून, पुढे प्रगत तंत्रज्ञानाने दुर्बिणींतून माणसांनी आकाशवेध घेतला. चंद्र, सूर्य, तारे, नक्षत्रे, आकाशगंगांसारख्या आकाशस्थ वस्तू अभ्यासल्या. प्रकाशीय, रेडिओ दुर्बिणी निर्मून वर्षांनुवर्षे आकाशाचा अभ्यास केला. आकाश जाणण्यासाठी निरीक्षणांच्या जोडीला माणसाने, हातांना पंख बांधून, वायूफुग्यांतून, विमान-अंतराळयानांतून आभाळभरारी घेतली. अमेरिकेने १९६९ मध्ये पहिले मानवसहित अवकाशयान चंद्रावर पाठवले. विविध देशांची मानवरहित अवकाशयाने मंगळ, गुरू, युरेनससारख्या ग्रहांवर उतरवली वा ग्रहांभोवती फिरवून माहिती मिळवली. इस्रोने २००८ मध्ये श्रीहरीकोटावरून पाठवलेल्या चांद्रयानाला चंद्रध्रुवीय प्रदेशात पाण्याचे रेणू मिळाले.
अतिदूरच्या ग्रहताऱ्यांबद्दल आहे तेवढीही माहिती आपल्याला पृथ्वीचा ७० टक्के पृष्ठभाग व्यापणाऱ्या समुद्राबद्दल नाही. खोल समुद्राचा शोध घेणे कठीण! कारण, खोल समुद्रात कायम अंधार आणि प्रचंड थंडी असते. त्याहून मोठी समस्या पाण्याच्या महाप्रचंड दाबाची असते. समुद्रसपाटीपासून २०० किमी उंचावर हवेचा वातावरणीय दाब एक असतो. पण आपण समुद्रसपाटीखाली फक्त १० मीटर गेल्यास दाब दुप्पट होतो. वातावरणीय दाब अधिक १० मीटर उंच पाण्याचा दाब, जो २०० किमी उंच हवेच्या स्तंभाइतका असतो. समुद्रपृष्ठापासून ६००० मीटर खाली समुद्रसपाटीपेक्षा सहाशेपट जास्त दाब असतो.
२०२१ ऑक्टोबरमध्ये भारताच्या ‘मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस’ने तत्त्वत: मानलेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने प्रत्यक्षात राबवायची समुद्रतळ शोधमोहीम योजली. या शोधमोहिमेत तीन समुद्रवीरांसह सलग तीन दिवस समुद्रतळावर सरपटण्याची क्षमता असणारे समुद्रयान असेल. या समुद्रयान कवचास समुद्रसपाटीपेक्षा ६०० पट दाब सहन करावा लागतो. मोहिमेची सुरुवात चेन्नईतून झाली आहे. अमेरिका, रशिया, चीन, जपान, फ्रान्स यांनी असे प्रयत्न आपल्याआधीच केले आहेत.
आता समुद्राचा अज्ञात भाग, नवी सागरी-संसाधने सापडतील. सागरी अन्नपदार्थ, पिण्याचे पाणी, प्रदूषणमुक्त ऊर्जा या अतिमहत्त्वाच्या गोष्टी मिळवण्याचा मार्ग अशा मोहिमेतून दिसेल. यापेक्षाही मोठा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढून भारताची प्रतिमा उंचावेल. उच्च सैद्धांतिक ज्ञानाने, तंत्रज्ञानाने भारत अल्पकाळात, प्रगत देशांइतका सामथ्र्यवान झाला आहे याची जगाला जाणीव होईल. हिंदी महासागरात ७५,००० चौ.किमी. क्षेत्र ‘यूएन इंटरनॅशनल सीबेड ऑथॉरिटी’ने भारतीय मोहिमेसाठी राखून ठेवले आहे. त्यातून लाखो टन मँगेनीज, निकेल, तांबे, कोबाल्ट खनिज बहुधातुकांच्या गुठळय़ा (पॉलिमेटॅलिक नोडय़ुल्स) मिळतील असे वाटते.
नारायण वाडदेकर ,मराठी विज्ञान परिषद