प्राध्यापक ब्रिजमोहन जोहरी यांचा जन्म १९०९ साली बिजनोर, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बिजनोरमध्येच झाले. पुढील शिक्षण राधास्वामी शिक्षण संस्थेत झाले. त्यांनी आग्रा कॉलेज, आग्रा येथून १९३१ साली बी. एस्सी. आणि १९३३ साली एम.एस्सी. डिग्री प्रथम क्रमांकाने मिळवली. १९३२-३३ चे स्नातकोत्तर उकृष्ट विद्यार्थी म्हणून त्यांना लार्ड रीडिंग विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर प्रा. जोहरी यांनी पी. माहेश्वरी यांसारख्या मातबर शिक्षकांकडे शोधकार्य सुरू केले. वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी आग्रा विश्वविद्यालयाची डॉ. ऑफ सायन्स ही पदवी घेऊन डी.एस्सी.चे पहिले मानकरी ठरले.

प्रा. जोहरी यांनी काही काळ दयालबाग, बिकानेर आणि आग्रा या ठिकाणी शिक्षक होते. १९४८ साली दिल्ली विश्वविद्यालयात व्याख्याता म्हणून प्रवेश केला. १९६४-७४ वनस्पतिशास्त्र प्राध्यापक, १९६६- ७३ विभागप्रमुख आणि डीन ऑफ फॅकल्टी ऑफ सायन्स ही पदे भूषवली आणि सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स स्टडीज इन बॉटनीचे संचालक झाले. प्राध्यापक जोहरी यांचे संपूर्ण संशोधन प्रामुख्याने सपुष्प वनस्पतीच्या विविध कुलातील वनस्पतींच्या बाह्य़रचनाशास्त्र आणि भृणशास्त्र यावर केंद्रित होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आणि संपादितही केली. १९८२ साली ‘एक्सपरिमेंटल एम्ब्रिओलॉजी ऑफ व्हासक्युलर प्लॅन्ट’ हे पुस्तक प्रसिद्ध केले.

१९८४ साली हिडलबर्ग एम्ब्रिओलॉजी ऑफ एंजिओस्पर्म प्रसिद्ध झाले. हेच पुस्तक रशियन भाषेत १९९० साली दोन खंडात प्रसिद्ध झाले. प्रा. जोहरी यांच्या वनस्पती शास्त्रातील योगदानामुळे त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. प्रा. जोहरी यांना वनस्पतिशास्त्रातील अनेक परिसंवाद व कार्यशाळांसाठी भारतात आणि परदेशातही आमंत्रित करण्यात येत असे. या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांनी अतिशय बारकाईने भारतातील आणि परदेशातील शिक्षणाच्या पद्धती, संशोधनकार्य, त्यासाठीची साधने यांचा तुलनात्मक अभ्यास केला. नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी नवीन पिढीला प्रोत्साहन दिले. १ डिसेंबर २००३ साली त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. सी. एस. लट्ट (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

office@mavipamumbai.org

 

डाखाव  कॉन्सन्ट्रेशन कॅम्प

म्युनिकपासून १६ कि.मी.वरील डाखाव येथे १९३३ साली हिटलरच्या नाझी पक्षाने सुरू केलेला ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग होता. हिटलरचे राजकीय विरोधक, इतर गुन्हेगार, ज्यू समाज यांना अपुऱ्या जागेत डांबून, त्यांच्याकडून अतिश्रमाची सार्वजनिक कामे करून घेण्यासाठी हिटलरचा सहायक हेन्रीच हिमलर याने सुरू केलेला हा श्रमछावणीचा प्रयोग फारच यशस्वी झाला. पुढे नाझी सरकारने पूर्ण जर्मनीत अशा प्रकारच्या शंभर श्रमछावण्या राबविल्या. श्रमछावणीतील कैदी, ज्यू आणि इतरांचा उपयोग युद्धकाळात केवळ सक्तीचे कामगार म्हणूनच केला गेला. जे लोक काम करण्यास सक्षम होते अशांनाच जिवंत ठेवले जाई, इतरांना विविध प्रकारे ठार मारले जाई. सुरुवातीस फक्त नाझीविरोधक आणि दुसऱ्या देशांच्या गुप्तहेरांसाठीच वापरल्या जाणाऱ्या श्रमछावणीत पुढे अधिकतर ज्यू कैद्यांचा भरणा वाढला. श्रमछावणीत एकेक बराक २०० कैद्यांसाठी बांधली गेली होती. पुढे कैद्यांची संख्या वाढल्यावर २०० कैद्यांच्या बराकीत १६०० कैदी कोंबले जात! १२ हजारांहून अधिक कैदी एकावेळी या छावणीत ठेवले जात. गलिच्छ वातावरण आणि अपुऱ्या अन्नामुळे टायफाइडसारख्या साथीने मृत्यूचे प्रमाण वाढत असे, तसेच अवाजवी श्रमांमुळे मरणाऱ्यांची संख्या मोठी होती. १९४० ते १९४४ या काळात एकूण दोन लाख सहा हजार कैदी येथे होते, त्यापकी ३५ हजार कैदी मृत्यू पावले. या छावणीतच त्यांचे दफन केले जाई. या कैद्यांकडून रस्त्यांचे आणि इमारतींचे बांधकाम, शस्त्रास्त्र निर्मिती अशी कामे करवून घेतली जात, तर स्त्रियांकडून भटारखाना आणि लहानसहान मेहनतीची कामे करवून घेतली जात. काही कैद्यांवर मलेरिया आणि इतर रोगांचे जंतू टोचून तसेच मानसिक दबाव टाकून त्यांच्यावर काय परिणाम होतात याचे प्रयोगही केले जात. कैद्यांचा अधिक भरणा झाला की १२०० कैद्यांचा एक गट रेल्वे वॅगनमधून वॉर्साच्या ट्रिंबलिका गॅस चेंबरमध्ये मृत्युदंडाची शेवटची शिक्षा भोगण्यासाठी रवाना केला जाई. १९४५ साली दुसऱ्या महायुद्ध समाप्तीनंतर अमेरिकन फौजांनी म्युनिक श्रमछावणीतले कैदी मुक्त केले.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader