डॉ. गोविंद पांडुरंग काणे (१९११-१९९१) यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून एम.एस्सी. केले व नंतर इंग्लंडच्या इम्पिरियल कॉलेजातून इंधन या विषयावर संशोधन करून पीएच.डी. मिळवली. मुंबईच्या इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी अध्यापनास सुरुवात करून तेथे ते १९ वष्रे होते. शेवटची काही वर्षे ते तेथे प्रभारी संचालक होते. वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या रुग्णालयात रुग्णांना तपासता येते आणि ते पुढे जे करणार त्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. तसा अनुभव इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीतील विद्यार्थ्यांना घेता आला पाहिजे, असे त्यांना प्रकर्षांने वाटले आणि मग त्यांनी विविध कारखान्यांना आणि उद्योगधंद्यांना भेटी देण्याची संधी त्यांच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. किंबहुना इन्स्टिटय़ूटचा अभ्यासक्रमच तसा तयार केला. यामुळे विद्यार्थी जे शिकत होते. त्याचा कारखान्यात प्रत्यक्ष कसा उपयोग केला जातो ते विद्यार्थ्यांना पाहायला मिळू लागले. उत्पादन करीत असताना कारखान्यांना काय काय अडचणी येतात व त्या कशा सोडवायच्या हे विद्यार्थ्यांना शिकता येऊ लागले. दुसऱ्या बाजूने कारखानदारांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हुशार प्राध्यापकांची मदत मिळू लागली. या योजनेतून असा दुहेरी फायदा झाला. त्यातून प्राध्यापकांना आणि संस्थेला आर्थिक फायदाही होऊ लागला. डॉ. काणे यांच्या या योजनेतून विद्यार्थी, प्राध्यापक आणि कारखानदार यांचे एक जाळे निर्माण झाले. या १९ वर्षांच्या कारकिर्दीनंतर काणे यांना केंद्रीय उद्योगमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्याकडून उद्योग मंत्रालयात रासायनिक उद्योगांचे सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. १९५४ ते १९६९ या १५ वर्षांच्या काळातील त्यांच्या दिल्लीच्या वास्तव्यात औषधे, अल्कोहोल्स, कोळशावर आधारित रसायने, पेट्रोरसायने, खते, कागद यांचे कारखाने उभारण्यासाठी त्यांनी समित्या नेमून केंद्र व राज्य सरकारांचा समन्वय घडवून आणला व ते ते कारखाने सुरू करून दिले. या उद्योगधंद्यांसाठी त्यांनी अनेक परदेशी संस्थांकडून तंत्रज्ञान मिळवून दिले.
अ. पां. देशपांडे, (मुंबई)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
प्रबोधन पर्व
स्त्रीसमाजाविषयीं कळकळ बाळगणारे फार थोडे
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महर्षि कर्वे यांनी स्त्रीशिक्षणाविषयी मांडलेले विचार-
स्त्रियांच्या हायस्कुलासंबंधानें सुशिक्षित लोकमताची प्रगति व सामान्यत: स्त्रीशिक्षणासंबंधानें बहुजनसमाजाच्या मताची प्रगति, यांमध्यें पुष्कळच साम्य आहे. आरंभीं क्रियायुक्त विरोध, पुढें निष्क्रिय पण तिरस्कारपूर्ण विरोध, त्यापुढें पक्की उदासीनता, व शेवटीं औदासीन्याच्या बाजूला झुकणारी निष्क्रिय सहानुभूति, अशीं क्रमाक्रमानें लोकमताचीं स्थित्यंतरें होत गेलीं आहेत. ही प्रगति इतक्या मंद गतीनें होत आहे कीं, हें मांद्य अगदीं निराशाजनक नसलें, तरी जवळजवळ तसेंच आहे. स्त्री-शिक्षणाच्या भावी स्थितीचा विचार केला असतांहि आशाजनक असें क्षितिजावर कांहींच दिसत नाही. हिंदूी, अर्थात् हिंदु, मुसलमान वगैरे हिंदवासीयांनीं बनलेल्या स्त्रीसमाजाची निरक्षरता पाहिली म्हणजे मनुष्य कितीहि आशावादी असला तरी तो उदास होऊन जाण्याचा संभव आहे. निद्रित अगर बेशद्ध अशा स्थितींत असलेल्या हिंदी समाजाच्या डोळ्यांत अंजन कसें पडावें, हा अति बिकट प्रश्न आहे. त्यांतल्यात्यांत पुरुषसमाजाविषयीं काळजीं घेणारे अनेक नांवांनी संबोधिल्या जाणाऱ्या, विचार करूं लागलेल्या, अनेक पक्षांत कांहीं लोक तरी आढळतात; परंतु स्त्रीसमाजाविषयीं कळकळ बाळगणारे फार थोडे आणि त्यांतहि स्वार्थत्यागयुक्त कृति पाहावयाची असल्यास सूक्ष्मदर्शक यंत्राचेंच साहाय्य घेतले पाहिजे.. स्त्रीशिक्षणाला सुरुवात होऊन र्अधे शतक लोटलें, तरी हिंदुसमाजाची काय स्थिति आहे पाहा! त्यानें साक्षर स्त्रियांचें प्रमाण शेंकडा दोनतीनच्यावर जाऊं दिलें नाहीं!.. मागच्या पन्नास वर्षांच्या प्रगतीवरूनच जर पुढील अजमास करावयाचा असेल, तर तेथपर्यंत तो जिवंत राहिल्यास कित्येक सहस्त्रें तरी पुरीं पडतील कीं नाहीं, याचीहि वानवाच आहे. आजपर्यंत आम्हीं या बाबतींत प्रयत्न म्हणून केलाच नाहीं. आपोआप जें घडून आलें तें आलें. स्वावलंबनाची कांस न धरितां परावलंबी राहावयाचें हें आपलें ब्रीदच कायम राखावयाचें असल्यास वरील भविष्य वर्तविण्यास कोणी भविष्यवादी नको.’’
मनमोराचा पिसारा
बायसिकल थीफ
बेकारांच्या तांडय़ात उभ्या असलेल्या अँटोनिओला अखेर नोकरी मिळाल्याची गोड बातमी मिळते. कामं शहरभर फिरून सर्व ठिकाणी पोस्टर लावायची. कामं स्वीकारण्यासाठी एक अट असते, फिरण्यासाठी सायकल असणं आवश्यक असतं. अँटोनिओकडे समजूतदार बायको असते. एक गोंडस बाळ असतं, ब्रुनो नावाचा चुणचुणीत मुलगा असतो, पण सायकल नसते. ‘एवढंच ना!’ असं म्हणून त्याची बायको मरिआ, ‘माझ्या माहेरून आलेल्या शुभ्र चादरी असतात, त्या विकून एका सायकलपुरते पैसे नक्की उभे राहातील,’ असं म्हणून दोघं चादरी विकत घेणाऱ्या अडत्याच्या दुकानात जातात नि सायकल मिळतेही. अँटोनिओ आणि मरिआ आपल्या मालकीच्या नव्या सायकलवरून घरी येतात. मजेच्या वातावरणात. अँटोनिओ कामाला जातो आणि पहिल्याच दिवशी सायकल चोरीला जाते! मोठी पंचाईत होते. मग अँटोनिओ आणि ब्रुनो रोम शहरात सायकल शोधत फिरतात. एका सायकलसारख्या शेकडो सायकली. आशा-निराशेच्या रोलर कोस्टरवरून सायकलीचा शोध हीच सिनेमाची गोष्ट.
सिनेमाचा हा प्लॉट वाचून ‘माहेरची साडी’छाप टीअर जर्कर सिनेमा असेल असं वाटलं ना? पण हा सिनेमा असा अजिबात नाही. कारण या सायकल-शोधामध्ये अश्रुपात नाहीये, तर मनाची घालमेल आहे, मनाची कश्मकश आहे, ब्रुनोच्या नजरेतून दिसणारं प्रौढ जग आहे. सायकल शोधण्यासाठी तथाकथित अतींद्रिय शक्ती असलेल्या व्यक्तीची मदत घेण्याचा मजेशीर अनुभव आहे.
खिशातल्या दोन दमडीच्या जोरावर ब्रुनो आणि त्याच्या बापाची रेस्तराँमध्ये होणारी मौजमजा आहे. अर्थात, सगळ्या प्रसंगांना कारुण्याचं रम्य अस्तर आहे. अखेर, आपली सायकल चोरीला गेली तर त्यावर उपाय म्हणून आपण दुसरी चोरू शकतो ही शक्कल आहे. पण त्यातही दुर्दैव आड येतं. अखेर, त्या दुसऱ्या सायकलीचा चोर अँटोनिओला माफ करतो. ब्रुनो आणि अँटोनिओ हातात हात घालून रोममधल्या मोठमोठय़ा जमावात सामील होतात आणि चित्रपट संपतो..
हा सिनेमा दुसऱ्या महायुद्धात होरपळलेल्या गरीब रोममध्ये १९४८च्या सुमाराला घडतो. अँटोनिओ सोडल्यास कोणी फिल्मस्टार नाहीत. जवळजवळ सगळा सिनेमा सर्वसामान्य लोकांच्या सहभागातून साकार होतो. सगळी लोकेशनही खरी आहेत.
वित्तोरिओ डिसिका या दिग्दर्शकाचा हा सिनेमा जगातल्या ‘ऑल टाइम ग्रेट’पैकी एक आहे, असं आजही मानलं जातं. कारण या सिनेमात कसलाही खोटेपणा नाही. ‘नो प्रिटेंशन.’ निओरिअॅलिझम् शैलीतला हा सिनेमा पाहाणं, विलक्षण अनुभव ठरतो. कसलाही अभिनिवेश नसल्याने आपण प्रत्येक पात्राच्या नजरेतून जगाकडे पाहतो. हे दिग्दर्शकाचं कौशल्य आहे. अशा ‘रिअलिस्टिक’ सिनेमात ‘अतिवास्तवता’ कशी गुंफली (सर्रिअॅलिझम) हे कळत नाही. उदा. चादरीच्या दुकानातल्या प्रसंगात चादरीचे गठ्ठे रचलेले असतात. ते शोधत शोधत कॅमेरा आकाशाइतका उंच जाईल असं वाटतं..
प्रेमात पडण्यासाठी ही कलाकृती आहे. टचिंग, खुसखुशीत, हृद्य, सर्व काही..
डॉ.राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com