डॉ. येल्ला प्रगदा सुब्बाराव (१२ जाने. १८९५-९ ऑ. १९४८)
जन्मभूमी भारत पण कर्मभूमी अमेरिका असणारे जीवरसायन शास्त्रज्ञ डॉ. येल्ला प्रगदा सुब्बाराव हे १९२२ मध्ये शिक्षण-संशोधनासाठी भारतातून बॉस्टन (अमेरिका) येथे गेले.
तेथे सुब्बारावांनी लेडल्रे लॅबोरेटरीत स्प्रू रोगावर संशोधन केलं. स्प्रू रोगात लहान आतडय़ामध्ये अन्न, पाणी व खनिज द्रव्यं शोषली जात नाहीत. यामुळे या रोगात पोषणातील न्यूनता दर्शविणारी लक्षणं आढळतात. स्प्रू रोगानं सुब्बाराव यांच्या भावाचं निधन झालं होतं. त्यामुळे या रोगलक्षणांतून मानवाला मुक्त करण्यासाठी संशोधन करण्याचं सुब्बाराव यांनी ठरविले. त्यांनी रक्तपरीक्षा करून रक्तातील तांबडय़ा व पांढऱ्या पेशींचे विशिष्ट प्रमाण हे आरोग्यसंपन्नतेचं निदर्शक असतं, असं दाखविलं. तांबडय़ा पेशींची निर्मिती मंदावली की, शरीर निरोगी राहत नाही, असं त्यांना आढळलं. फॉलिक आम्लानं तांबडय़ा पेशींची झपाटय़ानं वाढ होते, हेही त्यांच्या लक्षात आलं. यावरून फॉलिक आम्लाच्या न्यूनतेमुळे स्प्रू रोगाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते, हे लक्षात आल्यावर फॉलिक आम्लातील घटकद्रव्यांचा त्यांनी शोध घेतला. यकृताच्या अर्कातून फॉलिक आम्ल मिळविणं हे खर्चीक काम असल्यानं त्यांनी कृत्रिम रीतीनं हे आम्ल तयार केलं.
फॉस्फरस संयुगांचं परीक्षण करताना यकृताच्या स्रावातील रासायनिक द्रव्यांकडे त्यांचं लक्ष गेलं. ही द्रव्यं रक्तक्षयावर रामबाण उपाय ठरू शकतील असं वाटल्यानं त्यांनी ही द्रव्यं शुद्घ रूपात वेगळी केली. पांडुरोगाच्या प्रकारात (मॅक्रोसायटिक ऑनिमियात) रुग्णाला फॉलिक आम्ल दिलं असता तांबडय़ा रक्तपेशींच्या निर्मितीत वाढ झाल्याचं सुब्बाराव यांना दिसून आलं. त्यांनी फॉलिक आम्लापासून ऑप्टिसिनासारखी द्रव्यं मिळविली आणि ल्यूकेमिया व कर्करोगावर गुणकारी ठरली. ऑरिओमायसिन (क्लोरोटेट्रासायक्लिन) हे प्रतिरोगजैविक (अँटिबायॉटिक) द्रव्य त्यांनी शोधून काढलं. ते रक्तविषयक रोगांवर गुणकारी औषध ठरलं. कर्करोगावरील औषध मेथोट्रेक्झेट शोधून काढलं. हत्तीरोगावरील हेट्राझन या औषधाचाही शोध लावला. फॉस्फरसाची उष्णतामापन पद्घती त्यांनी शोधून काढली व तिचा वैद्यकात उपयोग होऊ लागला. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामध्ये फॉस्फोक्रिअॅटिन व अॅलडिनोसिन ट्रायफॉस्फेट (अळढ) यांचा असणारा महत्त्वाचा सहभाग संशोधनाद्वारे शोधून काढला.
लेडल्रे प्रयोगशाळेतील संशोधन विभागानं ‘सुब्बाराव मेमोरियल लायब्ररी’ स्थापन केली आहे.
शुभदा वक्टे (मुंबई) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा