शेतीच्या क्षेत्रातील भारत देशाची ही सर्वोच्च संस्था असून ती १६ जुल १९२९ रोजी स्थापन झाली. संस्थेचे सध्याचे अंदाजपत्रक पाच हजार कोटी रुपयांचे असून देशाचे कृषिमंत्री संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संस्थेची उद्दिष्टे अशी आहेत – १) देशभरच्या शेती कार्यक्रमाचे नियोजन करणे २) शेतीतील शिक्षण व संशोधन करणे ३) शेतीबरोबरच वनशेती, पशुपालन, मत्स्यपालन, गृहविज्ञान व इतर संबंधित शास्त्रांचा शिक्षण व संशोधनाबाबत परामर्श घेणे ४) वरील सर्व शास्त्रात होणारे संशोधन प्रसिद्ध करणे व सर्व माध्यमे वापरून ते लोकांपर्यंत पोहोचवणे ५) संस्थेत निर्माण झालेल्या संशोधनावर आधारित तंत्रज्ञान विकसित करून ते लोकांपर्यंत पोहोचवणे ६) वरील सर्व विषयांवर सल्ला देणे ७) शेती आणि कापणीनंतरच्या पिकांबाबत ग्रामीण लोकांच्या समस्या सोडवणे व त्यासाठी इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्सेस रिसर्च, कौन्सिल ऑफ सायण्टिफिक अॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च, भाभा अणुसंशोधन संस्था व विद्यापीठे यांच्या मदतीने कार्यक्रम करणे.
कौन्सिलने १९८६ साली देशातील सर्व पिकांच्या बियाणांचे एक संग्रहालय दिल्लीत स्थापन केले. शेतीसंबंधी देशात ४८ राज्यस्तरावरील संशोधन केंद्रे स्थापन केली. त्यात देशभरच्या सर्व पिकांवर संशोधन केले जाते. संस्थेच्या अखत्यारीत चार अभिमत विद्यापीठे, ४८ राज्यस्तरावरील संशोधन केंद्रे, सहा राष्ट्रीय ब्युरो, ११ राष्ट्रीय संशोधन केंद्रे, विविध प्रकल्पांसाठी २५ प्रकल्प संचालक, १३८ उपकेंद्रे आणि राज्यस्तरावरील ४५ कृषी विद्यापीठे एवढा पसारा येतो. कौन्सिल करीत असलेल्या कार्यात शेतीसंबंधित संख्याशास्त्रावर संशोधन, शेती शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण, कोरडवाहू शेतीवर संशोधन, खारफुटी जमिनीत कोणती पिके घेता येतील यावर संशोधन, डेअरी विषयावर संशोधन, शेतीला उपयोगी पडणाऱ्या पशूंवर संशोधन, ऊस-कापूस-बटाटा-ज्यूट-तांदूळ-लोकर-गवत-डाळी-भाज्या या पिकांवर संशोधन चालू आहे.
डॉ. आत्माराम भरव जोशी हे मराठी गृहस्थ या संस्थेचे १९६६ ते १९७२ या काळात उपमहासंचालक होते.
संस्थेचा पत्ता – इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चरल रिसर्च (आयसीएआर), कृषी भवन, डॉ.राजेंद्रप्रसाद रोड, नवी दिल्ली-११००१४. दूरध्वनी – ०११-२५८४२७८७, २३३८८८४२, वेबसाइट – http://www.icar.org.in
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा