प्रशांत, अटलांटिक, हिंदी, आक्र्टिक आणि अंटाक्र्टिक असे प्रमुख महासागर आहेत. यापैकी आपल्या देशालगत असलेला हिंदी महासागर हा जगातील तिसरा आकाराने मोठा असलेला महासागर. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण अशा आपल्या महासागरात पृथ्वीतलावरील एकूण तेलसाठय़ांच्या ४० टक्के साठे आढळतात. वेगळय़ा भौतिक-रासायनिक गुणधर्मामुळे हिंदी महासागर हा वेगळा गणला जातो. सर्वात कमी व जास्त क्षारता, प्राणवायूचे न्यूनतम प्रमाण, बाष्पीभवनाचा महत्तम वेग आणि तरीही या तुलनेत लक्षवेधी जीवसंपदा! पृथ्वीचा २० टक्के पृष्ठभाग व्यापणारा असा हा अतिविशाल जलधी सर्वाचे लक्ष न वेधता तरच नवल. यामुळेच, सदर महासागराचा बहुराष्ट्रीय अभ्यास हाती घ्यावा, असे ठरले. मुळात, हिंदी महासागर हा सातापैकी चार खंड स्पर्शणारा असल्याने, अनेक देशांच्या सीमा हे त्याचे किनारे आहेत.

१९५७-५८ हे ‘आंतरराष्ट्रीय भू-भौतिक’ वर्ष असल्याने, त्याच वर्षी हिंदी महासागर मोहीम (इंडियन ओशन एक्सपिडिशन) सुरू झाली. महासागर विज्ञानात बहुविध देशांचे एकत्रित, सुसंघटित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्या वेळी नमूद करण्यात आले. ‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स’ (विद्यमान ‘इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सायन्स’) या शिखर संस्थेने तात्काळ ‘स्पेशल कमिटी ऑन ओशियानिक रिसर्च’ स्थापन केली.  कालांतराने  तिचे ‘सायंटिफिक कमिटी ऑन ओशियानिक रिसर्च’ असे नामांतर झाले. १९५७ साली झालेल्या पहिल्याच बैठकीत हिंदी महासागर हा संशोधनाचा विषय ठरवण्यात आला. या समितीने स्थापन केलेल्या चार कृतीगटांनी प्राथमिक व मूलभूत संशोधनाचे निकष व कार्यपद्धती निश्चित केली आणि पाचव्या कृती गटाच्या निर्मितीपासून प्रत्यक्ष कार्याला सुरुवात झाली. ‘हिंदी महासागर मोहीम-१’ अधिकृतपणे १ सप्टेंबर १९५९ ते ३१ डिसेंबर १९६५ या कालावधीत राबविली गेली. सुरुवातीपासून रॉबर्ट जी. स्नायडर हे या मोहिमेचे समन्वयक होते. नंतर १९६२ साली हा प्रकल्प ‘इंटरगव्हर्नमेंटल ओशियानोग्राफिक कमिशन’कडे हस्तांतरित करण्यात आला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

जैविक, भौगोलिक, वातावरणीय-पर्यावरणीय, भौतिक, रासायनिक अशा विविध क्षेत्रांतील अनेक तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि २० राष्ट्रे या प्रकल्पात सहभागी झाली. सर्व निरीक्षणे, प्रयोग व त्यांचे निष्कर्ष आणि इतर बारीकसारीक तपशील लेखी, मौखिक व दृक्-श्राव्य माध्यमांतून नोंदवून त्यांचे जतन करून ठेवले जाऊ लागले. २०१५ ते २०२५ या कालावधीत ‘हिंदी महासागर मोहीम-२’ हाती घेण्यात आली आहे.

– डॉ. प्रसाद कर्णिक

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader