‘सुरीने कापण्याजोगा नरम धातू’ म्हटले तर विश्वास बसणार नाही; पण सोडियम आणि इंडिअम हे असे धातू आहेत. मजा म्हणजे इंडिअमचा तुकडा जर वाकवायचा प्रयत्न केला तर त्याच्या स्फटिकांच्या घर्षणाने चिरका आवाजही येतो.
फर्डिनंड रीश आणि हिरोनिमी रिक्टर हे १८६३ साली सॅक्सनी (जर्मनी) येथे जस्ताच्या धातुकावर प्रयोग करत असताना इंडिअमचा शोध लागला. खरं तर हे दोघे जण थॅलिअम मिळवण्याच्या प्रयत्नात होते, पण प्रयोगात त्यांना मिळालेल्या पिवळ्या साक्याची (जो थॅलिअम सल्फाइडचा असावा असा अंदाज होता) स्पेक्ट्रोमीटरमध्ये (वर्णपंक्तीमापीमध्ये) चाचणी केल्यावर फर्डिनंड रीशला जांभळी वर्ण रेषा दिसली. फर्डिनंड रीश रंगांधळा असल्याने त्याने रिक्टरला पुन्हा ही वर्णपंक्ती बघायला सांगितली. त्याने त्याचे निरीक्षण नोंदवले आणि पुढे लॅटिनमध्ये जांभळा म्हणजे इंडिकम या शब्दावरून या मूलद्रव्याला इंडिअम हे नाव पडले. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अतिशय कमी प्रमाणात इंडिअम आढळते. जगभरातील १३०० टन उत्पादनापकी चीनचा वाटा २९० टन, त्याखालोखाल दक्षिण कोरिया, जपान आणि कॅनडा हे देश इंडिअमच्या उत्पादनात अग्रेसर आहेत.
दुसऱ्या महायुद्धात या धातूचा वापर विमानातील भागांचा गंज रोखण्यासाठी केला गेला. विद्युत उपकरणांमध्ये सांधण (वेल्डिंग) कामासाठी तसेच सेमिकंडक्टर्समध्ये व ट्रान्सिस्टर्समध्ये मोठय़ा प्रमाणावर इंडिअम वापरले जाते. सांधणकाम करणाऱ्यांच्या चष्म्यावर संरक्षण थर म्हणून इंडिअम वापरतात. शर्यतीच्या गाडय़ांच्या बॉलबेअरिंगला इंडिअमचा थर दिला जातो त्यामुळे घर्षण कमी होण्यास मदत होते. इंडिअमचा वितळण बिंदू १५६.६ अंश सेल्सिअस असल्यामुळे, अतिथंड आणि निर्वात पोकळीमध्ये ‘सील’ करण्यासाठी हा धातू वापरतात. गॅलियम, इंडिअम आणि कथिल यांचे गॅलिस्टन हे संमिश्र द्रवरूपात असल्याने पाऱ्याप्रमाणे तापमापकात वापरले जाते. तसेच इंडिअमच्या काचेला चिकटण्याच्या आणि चकचकीत लेप देण्याच्या गुणधर्मामुळे त्याचा वापर आरसे बनविण्याकरितादेखील केला जातो. कॅडमिअमप्रमाणे न्यूट्रॉन शोषून घेत असल्याने अणुभट्टय़ांमध्ये नियंत्रण रॉड्स म्हणूनही इंडिअम वापरतात.
सन १९९० पासून मात्र संगणकाच्या ‘एल.सी.डी. मॉनिटर’मध्ये इंडिअमचा वापर प्रचंड वाढला. सध्या इंडिअमचे ५० टक्क्यांहून अधिक उत्पादन एलसीडी स्क्रीनसाठीच वापरले जाते. इंडिअम ऑक्साइड किंवा इंडिअम आणि कथिल यांच्या ऑक्साइडचा पातळ थर एल.सी.डी.करिता सर्वाधिक वापरला जातो. तसेच सौर घटाच्या बॅटरीमध्येसुद्धा इंडिअम उपयोगी ठरते.
– डॉ. कविता रेगे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org