महाराष्ट्राचे जवळपास ८० टक्के क्षेत्र ज्वालामुखीजन्य काळय़ा कातळाने व्यापलेले आहे. जगात जिथे जिथे ज्वालामुखीजन्य पाषाणांची चळत असते, तिथल्या डोंगरांचे उतार एखाद्या महाकाय जिन्याच्या पायऱ्यांप्रमाणे दिसतात, अशा प्रस्तरांना ‘सोपानप्रस्तर’ म्हणतात. महाराष्ट्र दख्खनच्या पठारावर महाराष्ट्राबाहेरही हे सोपानप्रस्तर आढळतात. काळय़ा कातळांनी दख्खनच्या पठाराचे पाच लाख चौरस किमी इतके क्षेत्र घरात व्यापले आहे. म्हणून या पाषाणप्रस्तरांना ‘दख्खनचे सोपानप्रस्तर’ (इंग्रजी संज्ञा ‘डेक्कन ट्रॅप’) म्हणतात.

महाराष्ट्राच्या भूमीत ज्वालामुखीजन्य पाषाण असल्यामुळे महाराष्ट्रात जीवाश्म सापडणे असंभव आहे असे काही जणांना वाटते. पण वस्तुस्थिती तशी नाही. कारण ज्वालामुखीजन्य पाषाणांसमवेत काही ठिकाणी गाळाचे खडकही निर्माण झाले आहेत. ते कसे निर्माण झाले हे आपण पाहू.

दख्खनच्या सोपानप्रस्तरांची निर्मिती सुमारे ६.६० कोटी वर्षांपूर्वी सुरू झाली आणि ६.१० कोटी वर्षांपूर्वी संपली. म्हणजे या प्रस्तरांची निर्मिती पन्नास लाख वर्षे सुरू होती. जमिनीला काही मैल लांबीची भेग पडून भूगर्भातून बाहेर येणारा लाव्हारस त्या भेगेतून भूपृष्ठावर ओतला जाई. तो थंड होऊन ज्वालामुखीजन्य खडकाचा एक प्रस्तर तयार होत असे. पुढचा प्रस्तर कालांतराने निर्माण होत असे. क्वचित् कुठे तरी दोन प्रस्तरांच्या निर्मितीमधला अवधी थोडा लांबत असे.   

त्या अवधीत आधीच्या प्रस्तराची झीज व्हायला सुरुवात होऊन त्याच्या पृष्ठभागावर नद्या, नाले आणि छोटी छोटी तळी तयार होत असत. त्यात पाणी साठत असे. पाणी म्हटले की तिथे सजीवसृष्टीचा वावरही आला; आणि पाण्याच्या तळाशी साठणारा गाळही आला. तळय़ातल्या निरनिराळय़ा जलचरांचे आणि काही प्रमाणात तळय़ाकाठच्या जमिनीवर राहणाऱ्या सजीवांचे मृतदेह त्या गाळात गाडले जाऊ लागले.

कालांतराने पुढचा ज्वालामुखीजन्य प्रस्तर निर्माण होत असे. तळय़ात साठलेल्या गाळापासून गाळाच्या खडकाचा छोटासा प्रस्तर तयार होत असे, तर त्यात गाडल्या गेलेल्या सजीवांच्या मृतदेहांपासून जीवाश्म तयार होत असत. गाळाच्या खडकांचे असे प्रस्तर दोन ज्वालामुखीजन्य सोपानप्रस्तरांच्या मध्ये येत असल्याने त्यांना ‘आंतरसोपानीय प्रस्तर’ म्हणतात. ते दख्खनच्या पठारावर अनेक ठिकाणी आढळतात.

असाच एक आंतरसोपानीय प्रस्तर मुंबईच्या मलबार हिलच्या उतारावर सापडतो. त्यात बेडकाच्या एका छोटय़ाशा जातीचे जीवाश्म आढळतात. या प्रस्तरात बेडकाचे जीवाश्म मिळतात म्हणून या प्रस्तराला ‘मुंबईचा बेडूकप्रस्तर’ असे नाव मिळाले आहे. या बेडकाचे वैज्ञानिक नाव आहे ‘इंडोबॅट्रॅकस पुसिलस’.

– डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader