अंबरग्रिस म्हणजेच ‘स्पर्म व्हेल’ या प्रजातीच्या देवमाशांनी उत्सर्जित केलेला पदार्थ. प्राचीन काळापासून, म्हणजेच एक हजार वर्षांहून अधिक काळापासून या अंबरग्रिसचा वापर सुगंधी द्रव्यांच्या उद्योगात आणि  विविध सौंदर्यप्रसाधनांत केला जात आहे. हे अतिशय मौल्यवान समजले जात असल्यामुळे तस्करांची त्यावर नजर पडते आणि त्यामुळे झटकन श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी त्याची तस्करी होते. याला समुद्रसोने असेही म्हटले जाते. या पदार्थाचा १.७५ दशलक्ष वर्षांपूर्वीचा जीवाश्म पुरावा उपलब्ध आहे. स्पर्म व्हेल या देवमाशांच्या एकूण प्रजातींपैकी केवळ चार ते पाच टक्के प्राणीच असे अंबरग्रिस तयार करतात.

स्पर्म व्हेल मुख्यत्वे माखलासारखे मृदुकाय प्राणी आणि त्यासारख्या इतर जीवांवर आपले उदरभरण करतो. अशा आहारानंतर न पचणारे घटक म्हणजेच माखल्यांचे दात आणि त्यांच्या  पाठीवरच्या कवचाप्रमाणे असणारा मधला काटा (स्वीक्ड पेन), स्पर्म व्हेल उलटी करून बाहेर काढतो, असा समज आहे. काही वेळा स्पर्म व्हेल पचनसंस्थेच्या आत राहिलेल्या, पचनास जड असलेल्या पदार्थाभोवती एक विशिष्ट चिकट स्राव सोडून आवरण तयार करतात. हा पदार्थ म्हणजेच अंबरग्रिस. त्याचे नंतर उत्सर्जन होते. असे हे अंबरग्रिस समुद्रजलात तरंगू लागते. प्रथमत: विष्ठेसारखा उग्र वास असणारे अंबरग्रिस कालांतराने लाटांच्या आणि प्रवाहाच्या घुसळणीमुळे कस्तुरी गंध धारण करते. अंबरग्रिसमध्ये अंब्रीन नावाचा घटक असतो, त्याचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात आणि सुगंधी द्रव्यांत केला जातो. त्याच्यामुळे अत्तराचा (परफ्यूमचा) सुगंध दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. तसेच ओष्ठ-प्रसाधनांत याचा वापर

केला जातो. 

१०० वर्षांपूर्वी अंबरग्रिस बळकावण्यासाठी स्पर्म व्हेलची मोठय़ा प्रमाणावर कत्तल केली जात होती. मात्र आता स्पर्म व्हेल आणि तत्सम  समुद्री सस्तन प्राण्यांना ‘वन्यजीव सरंक्षण अधिनियम, १९७२’ अंतर्गत संरक्षण मिळाले आहे. त्यांच्या शिकारीवर बंदी असून अंबरग्रिसच्या वापरावर आणि व्यापारावर देखील निर्बंध आले आहेत. परिणामी त्याच्या तस्करीत वाढ झालेली आढळते. विशेषत: कोविडकाळात वाढलेल्या बेरोजगारीच्या तडाख्यात अंबरग्रिसचे काही जाणकार या तस्करीत ओढले जाऊ लागले आहेत.

अंबरग्रिसची तस्करी करणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाते. भारतात जरी अंबरग्रिसच्या व्यापारावर बंदी असली तरी इतर बऱ्याच देशांत, याच्या व्यापाराला परवानगी आहे, कारण शेवटी तो उत्सर्जित घटक आहे. निसर्ग मानवाला कोणत्या न कोणत्या स्वरूपात काहीतरी देतच असतो. आपण त्याकडे डोळसपणे पाहून त्याचा सुयोग्य आणि शाश्वत वापर करणे महत्त्वाचे आहे.

– हर्षल कर्वे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org

Story img Loader