एस्तोनिया व इतर बाल्टिक प्रदेशात रशियाने मोठय़ा प्रमाणात रूसीकरण सुरू केले त्याची प्रतिक्रिया म्हणून एस्तोनियन जनतेत राष्ट्रीयत्व जागृत होऊन १९०५ पासून तिथे राजकीय पक्ष निर्माण झाले. या पक्षांनी रशियाने चालविलेली सांस्कृतिक, शैक्षणिक रूसीकरणाची मोहीम त्वरित थांबवून एस्तोनियाला अंतर्गत प्रशासकीय स्वायत्ततेची मागणी झारकडे सुरू केली. या मागणीसाठी शेतकरी आणि कामगारांनी रशियन जमीनदार आणि संस्थांवर हल्ले केले. ही चळवळ झारने दडपून टाकली. १९१७ च्या फेब्रुवारी क्रांतीनंतर रशियाने एस्तोनियाला अंतर्गत स्वायत्तता देऊन त्यांचे हंगामी कायदेमंडळ बनविण्यास मंजुरी दिली; त्यानुसार एस्तोनियन प्रोव्हिन्शियल असेंब्ली बनली. परंतु ऑक्टोबर १९१७ पासून बोल्शेविकांचे सरकार येऊन त्यांनी त्यावर बंदी घातली. याच काळात पहिल्या महायुद्धात जर्मनीने रशियावर आक्रमण केले. या युद्धाच्या धामधुमीत २४ फेब्रुवारी १९१८ रोजी एस्तोनियन नेत्यांनी  स्वातंत्र्याची घोषणा केली. महायुद्ध संपल्यावर सोव्हिएत रशियाने एस्तोनियाचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला, परंतु एस्तोनियाच्या प्रतिकाराने रशियाला ते शक्य झाले नाही. पुढील वर्षी तेथे निवडणूक होऊन संसदीय लोकशाही स्थापन झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, १९३९ मध्ये जर्मनी आणि सोव्हिएत युनियनमध्ये करार होऊन सर्व बाल्टिक देश दोन गटांत विभागले गेले. त्यापैकी एस्तोनिया रशियाच्या गटात आल्यावर रशियाने त्यांची लाल सेना सरळ एस्तोनियात घुसवून त्यांचे लष्करी तळ तयार केले. १९४० मध्ये तर रशियाने संपूर्ण एस्तोनियन प्रदेशाचा ताबा घेऊन ते सक्तीने सोव्हिएत युनियनचा घटक असल्याचे जाहीर केले. याला विरोध करणाऱ्या २० हजार एस्तोनियनांना सैबेरियात हद्दपार केले गेले. १९८७ मध्ये गोर्बाचेव्ह यांच्या पेरेस्रोइका धोरणानंतर या देशातल्या स्वातंत्र्यवाद्यांनी ‘सिंगिंग रिव्हाल्यूशन’ व मानवी साखळी आंदोलन करून सोव्हिएत युनियनकडे एस्तोनियाच्या पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. या काळात सोव्हिएत युनियनसुद्धा कोलमडायच्या अवस्थेत होते. २० ऑगस्ट १९९१ रोजी नेत्यांनी एस्तोनिया हे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आल्याचे जाहीर केले; त्याला सोव्हिएत नेत्यांनीही मान्यता दिली. प्रजासत्ताक एस्तोनिया सध्या संयुक्त राष्टे, युरोपियन युनियन, नाटो यांचा सदस्य देश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com