या वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत कापड तयार झाल्यावर केल्या जाणाऱ्या विविध प्रक्रियांची माहिती, कपडय़ांची धुलाई करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन, तयार कपडय़ाच्या उद्योगाची वाढ, मार्केटिंगमधील टप्पे आणि त्यामधील सर्व घटकांचे योगदान, वेगवगळ्या क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या तंत्र वस्त्रांची ओळख, गुणधर्म आणि उपयोग, अवकाश क्षेत्रात व इतरत्र वापरल्या जाणाऱ्या चाणाक्ष वस्त्रे अशी माहिती दिली होती. काही साडय़ांबद्दलही माहिती दिली होती. परिणामी साडय़ांबाबत लेखांचे स्वतंत्र पुस्तक असावे, मी पहिली ग्राहक असेन असा प्रतिसाद दर्शना िशदे यांनी दिला होता. या प्रतिसादासारखे मागणी करणारे अनेक लघुसंदेश आले होते. मराठीतील ही माहिती एकत्रित कुठे मिळेल असे ई पत्र प्राजक्ता कोल्हटकर यांनी पाठवले होते. माधवी मुळ्ये यांनी कापड विकत घेताना काय काळजी घ्यावी अशी विचारणा करून आपल्याकडे रंगाई करताना दिरंगाई करतात का? आणि म्हणून रंग जाण्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात असतात का? अशी पृच्छा केली होती. त्यांना उत्तर पाठवले होते. अशाच प्रकारची विचारणा करणारे पत्र ‘लोकसत्ता’ लोकमानसमध्ये आले होते. नाराजीचा सूर लावणारे दौलत पाटील यांचे ई पत्र होते. हा अपवाद म्हणायला हवा. धर्मावरम साडीबद्दल अधिक वैज्ञानिक माहिती हवी, अशी मागणी करणारे महाशब्दे यांचे पत्र होते. काही प्रमाणात साडीचा इतिहास, अर्थशास्त्र आणि विणकरांची परिस्थिती देणे सयुक्तिक होते अशी आमची भूमिका आहे. इतर सर्व तांत्रिक माहिती दिली होती. बहुसंख्य वाचकांनी आमच्या भूमिकेला पािठबा दिला आहे. सुताचे गुणधर्म, फायदे, त्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रिया हे सर्व तंत्रज्ञान त्या लेखात विस्तृत दिले होते. दोन साडी व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया प्रातिनिधिक म्हणून पाहाव्या लागतील. रामराव संगोवार हे निवृत्त झालेले व्यापारी लिहितात की काम सुरू असताना माहिती मिळाली असती तर अधिक उपयोग झाला असता. दुसऱ्या व्यापाऱ्याने साडय़ांचे नमुने आणि दरपत्रकाची मागणी केली.
दिगंबर बेहेरे यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेल्या लेखात साल चुकल्याचे निदर्शनास आणून दिले होते. वस्त्रोद्योगात दीर्घ काळ कार्यरत असलेल्या विवेक तोंडापूरकर यांच्या सहभागाने आणि सक्रिय सहकार्यामुळे हे सदर वर्षभर चालवता आले, हे नमूद करायलाच हवे. कुतूहल सदराच्या सर्व लेखकांना आणि वाचकांना धन्यवाद!
– दिलीप हेर्लेकर (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
वाचकांच्या सूचना
या सदरामुळे गतकालीन संस्थानांची माहिती मराठीत इतक्या सुलभपणे पहिल्यांदाच मिळत असल्याचे अनेक वाचकांनी कळविले, तर आणखी काही वाचकांनी, विशिष्ट संस्थानांची किंवा त्याविषयीच्या तपशिलाची माहिती द्यावी, अशा सूचनाही केल्या.
माहिती द्या, असे सुचवणाऱ्या पत्रांपैकी पहिले डॉ. राजीव देवधर यांचे होते. झाशीच्या राणीबद्दलही लेख असावा, असे त्यांनी सुचवले. पुढे, झाशी संस्थानाबद्दल लिहिताना तो मजकूर आला. ‘पानिपतात गेलेल्या सरदारांच्या नावांची माहिती द्यावी,’ अशी सूचना अमोल कामथे (पुणे पोलीस) यांनी केली, ती मात्र या सदराच्या आवाक्याबाहेरची होती. माहूरगडविषयी लेख द्यावा (डॉ. मनीष अदे, मुंबई) ही सूचनाही पाळणे अशक्य होते. नागपूरकर भोसले यांच्याविषयी लेख द्यावा, असे प्रदीप भावे यांनी सुचविले होते. नागपूरकर भोसले यांच्याविषयीचे उल्लेख अनुषंगाने काही वेळा करण्यात आले आहेत. जमिखडीविषयी अधिक माहिती द्यावी, असे सुचविणारे पत्र अशोक पटवर्धन यांच्याकडून आले होते; तर पुणे येथील डॉ. अरिवद पाचपांडे यांनी, काश्मीर संस्थानाविषयी माहिती द्यावी, अशी सूचना केली होती. नवाबांच्या राज्याचे नाव रामपूर कसे? असा प्रश्न डॉ. विद्याधर ओक यांच्या पत्रात होता. अशा पत्रांमुळे वाचक किती आत्मीयतेने हे सदर वाचतात, याची प्रचीती वेळोवेळी आली. काही पत्रे ‘लोकमानस’मध्येही छापली गेली. चित्रकार व लेखक सुहास बहुळकर यांनीही संस्थानांविषयीच्या लिखाणाचे कौतुक केले होते. हे लेख संग्रहित स्वरूपात हवे असल्याचे अनेकांनी कळविणे, हीदेखील समाधानाची बाब. कॅप्टन मिलिंद गोलाईत, टी. एस. बहल- मुंबई, वसंत धुपकर- पुणे, ठाण्याचे अॅड. प्रशांत पंचाक्षरी, चंदू मिठाईवाले, अनंत गवळी- अंबरनाथ आदींनी ‘पुस्तक काढावे’ अशी सूचना केली. तर अरुण परांजपे यांची ‘या विषयावर नकाशांसह पुस्तक लिहावे’ अशी सूचना होती.
.. नव्या वर्षांत, नव्या विषयासह भेट घडणार आहेच.
(समाप्त)
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com