सध्याचे व्हेनिस ११७ लहान लहान बेटांवर उभे आणि १७७ कालव्यांनी विभागलेले आहे. अर्थात, हे कालवे ओलांडण्यासाठी व्हेनिस शहरात एकूण ४०९ लहान-मोठे पूल आहेत. इटालियन प्रजासत्ताकाचा भाग असलेले व्हेनिस इटालीचे एक कम्युन आहे. २००९च्या शिरगणतीप्रमाणे व्हेनिस शहराची लोकसंख्या ६० हजार होती, तर पूर्ण व्हेनिस कम्युनची लोकसंख्या २ लाख ७२ हजार होती. १९५० सालापासून व्हेनिसच्या लोकसंख्येत मोठी घट होत चालली आहे. व्हेनिस नगर प्रशासनाने व्हेनिस शहराची सहा प्रशासकीय बरोजमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक बरोजचे एक निर्वाचित सल्लागार मंडळ आणि त्यातून नियुक्त केलेला बरो प्रेसिडेंट असतो. व्हेनिस शहराच्या सहा बरोजमधून ४५ निर्वाचित सदस्यांचे ग्रेट सिटी कौन्सिल पाच वर्षांसाठी काम करते. या ४५ सदस्यांच्या कौन्सिलमधून व्हेनिस शहरासाठी मेयरची निवड होते. मेयर पुढे १२ असेसर्सचे कार्यकारी मंडळ नियुक्त करतो. सतराव्या शतकात व्हेनिसचे व्यापारी साम्राज्य जिनोआच्या व्यापाऱ्यांनी उद्ध्वस्त केल्यावर व्हेनिसने आपले कृषी उत्पादन आणि काही औद्योगिक उत्पादने निर्यात करण्यावर भर दिला. सध्या व्हेनिसची अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटन, जहाज बांधणी व्यवसाय आणि मुरानो काच उत्पादनांवर अवलंबून आहे. व्हेनिस शहराचा काही नवीन भाग इटालीच्या प्रमुख भूमीला जोडलेला आहे. व्हेनिसचा जुना ऐतिहासिक भाग कालव्यांनी जोडलेला असल्यामुळे येथील सार्वजनिक वाहतूक जलमार्गानेच अधिक होते. शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर ‘एसीटीव्ही’ ही सरकारी यंत्रणा नियंत्रण ठेवते. या कालव्यांमधून ‘व्हेपोरेत्ती’ या स्वयंचलित वॉटरबसेस हे येथील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. येथील पारंपरिक ‘गंडोला’ या व्हेनिसचे वैशिष्टय़ असलेल्या बोटी केवळ पर्यटकांसाठी वापरल्या जातात. व्हेनिसच्या नव्या भागात रेल्वेसेवा, बससेवा आणि ट्रामसेवा आहेत. रेल्वेसेवेसाठी दोन प्रमुख स्टेशन्स आहेत परंतु इटालीच्या रोम, मिलान, फ्लोरन्स वगरे दूरच्या शहरांकडे जाण्यासाठीच या रेल्वेसेवेचा वापर होतो. मार्कोपोलो हा व्हेनिसचा आंतरराष्ट्रीय विमान तळ व्हेनिसच्या नव्या भूमीवर आहे.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
उद्यानकलाशास्त्र : ओलेरीकल्चर
ओलेरीकल्चर ह्य़ामध्ये भाजीपाला उत्पादनाचा शास्त्रशुद्ध आभास केला जातो. अनेक वनस्पतींचा आपल्या रोजच्या आहारात उपयोग केला जातो. कारण भाजीपाल्याची एक आवश्यक अन्नघटक म्हणून नितांत गरज आहे, भाजीपाल्यामध्ये समाविष्ट केलेल्या बऱ्याच वनस्पती एकवर्षीय असून त्यांचा झुडपांमध्ये समावेश केलेला आहे. याला अपवाद म्हणजे शतावरी, शेवगा ह्य़ा बहुवर्षीय वनस्पती. भाजीपाला लावताना त्याचे नियोजन, लागवड, त्यांची प्रत व उत्पादन यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
भारतात शाकाहाराला महत्त्व आहे. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी असते. आता आपण भाजीपाल्याचे वर्गीकरण बघू या. हे प्रत्येक वनस्पतीचा कोणता भाग आपल्या आहारात वापरला जातो यावरून केलेले आहे. उदाहरणार्थ कंद व कंदमुळे – कांदा, बटाटा, लसूण, मुळा, गाजर, रताळी, बीट.
फळभाज्या टोमॅटो, वांगी, भेंडी, ढोबळी मिरची
पालेभाज्या- मेथी, कोिथबीर पालक, आंबाडी,
वेलवर्गीय भाज्या – कारली, दोडकी , दुधीभोपळा, पडवळ फुलवर्गभाज्या- फ्लॉवर, ब्रोकोली पानवर्गीय – कोबी, पालक शेंगवर्गीय – गवार, वाटाणा, घेवडा, चवळी, शेवगा ह्य़ा सर्व भाज्यांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक अशी कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, ह्य़ा सारखी पोषणमूल्ये व जीवनसत्त्वे आहेत. यापकी रताळे सोडून बहुतेक सर्व भाज्यांची लागवड बिया पेरून केली जाते. आपल्या देशातील हवामान व जमिनीच्या प्रकारात इतकी विविधता आहे की अनेक प्रकारच्या भाज्या कोणत्या ना कोणत्या भागात वर्षभर पिकवता येतात या सर्व भाज्या बिया पेरल्यापासून अंदाजे २ ते ३ महिन्यांत तोडणीसाठी तयार होतात, भाज्या तोडल्यावर हिरव्यागार असतानाच स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. त्याला चांगला भाव येतो तसेच भाज्यांची साठवणूक करून आवश्यक त्या वेळी बाजारात उपलब्ध करून देता येतात. उदा हवाबंद डब्यातील फ्रेंचबीन, शीतगृहातील हिरवे मटार, इन्स्टंट भाज्यांच्या पाकिटात वाळवलेल्या गाजर-मटार यांसारख्या भाज्या.
सर्व भाज्यांमधील पोषणमूल्ये व जीवनसत्त्व ह्य़ांचे योग्य प्रमाण ठेवण्यासाठी सेंद्रिय खते आणि भरपूर पाणी यांची गरज असते.
अशा तऱ्हेने केवळ आहाराच्या दृष्टीनेच नाही तर कमी वेळात थोडय़ा जागेत आणि कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न देण्याच्या दृष्टीने भाजीपाल्याचे महत्त्व फार आहे.
प्रा. रंजना देव
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
१७७ कालवे, ४०९ पूल!
सध्याचे व्हेनिस ११७ लहान लहान बेटांवर उभे आणि १७७ कालव्यांनी विभागलेले आहे.
Written by सुनीत पोतनीस
आणखी वाचा
First published on: 12-05-2016 at 03:53 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about venice city