कव्वाली, शायरी, गझल, हिंदी काव्य, ख्याल गायकी, संगीत अशा बहुविध कलाप्रकारांमध्ये महत्त्वाचे योगदान देणारा सूफी कलावंत म्हणून अमीर खुसरो यांची ख्याती आहे. पण या बहुआयामी, हरहुन्नरी माणसाच्या विद्वत्तेचे इतर अनेक पलू आहेत. यात युद्धशास्त्र, इतिहास, राजकारण, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, ज्योतिष अशा अनेक विषयांमध्ये खुसरो पारंगत होता. अरबी, फारसी, हिंदी, अवधी, संस्कृत अशा अनेक भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं. फारसी आणि हिंदी भाषेत त्याने उत्तमोत्तम काव्यरचना केल्या. त्यानं रचलेल्या शेरांची संख्या पाच लाखांच्या आसपास आहे असं म्हटलं जातं. अमीर खुसरो याशिवाय मल्लविद्या आणि घोडेस्वारीतही पारंगत होता!
अमीर खुसरोचे मूळ नाव अबुल हसन यमीनुद्दीन, जन्म इ.स. १२५३चा सध्याच्या उत्तर प्रदेशात इटाह जवळच्या पतियाळी या गावातला. अबुलचे वडील सफुद्दीन महमूद हे तुर्कस्तानातील कश या परगाण्यातल्या हजारये लाचीन कबिल्यापैकी एक सरदार होते, तर आई बीबी दौलतनाझ ही राजपूत. वडील स्थलांतर करून हिंदुस्थानात स्थायिक झाल्यावर अबुल ऊर्फ अमीरचा जन्म झाला. बालपणी अबुलला शिक्षणापेक्षा काव्यरचनेतच अधिक रस होता. दहाव्या वर्षीच काव्यरचना करू लागलेल्या अबुल हसनने ‘खुसरो’ हे टोपण नाव घेतलं. पुढे सुलतान जलालुद्दीन खिलजीने त्याच्या काव्यरचनेवर खूश होऊन त्याला ‘अमीर’ हा खिताब दिला. स्वत:ला ‘तूती-ए-हिन्द’ म्हणजे हिंदुस्थानची प्रशंसा करणारा पोपट म्हणवून घेणाऱ्या अमीर खुसरोला येथील तत्त्वज्ञान, विद्वत्ता, ज्योतिष याबद्दल अभिमान होता आणि संस्कृत भाषा अरबी-फारसीहून श्रेष्ठ असल्याचा तो दावा करीत असे. अमीर खुसरो स्वत:विषयी बोलताना मोठय़ा अभिमानाने म्हणत, ‘मी हिंदुस्थानी तुर्की’ आहे! अमीर खुसरो दिल्लीचे सूफी संत शेख निझामुद्दीन औलिया यांचा आवडता मुरीफ म्हणजे शिष्य होता. फारसी भाषेतील काव्याबाबतीत त्याचा आशिया खंडात अव्वल क्रमांक आहे. हिंदीतही त्याची मोठी साहित्यनिर्मिती आहे. अमीर स्वत: सूफी संप्रदायाचा असल्यामुळे त्याच्या साहित्यनिर्मितीत तसव्वूफ म्हणजे सूफी अध्यात्मवादाची झलक दिसते.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com