‘माझ्या झाडाला कीड लागली आहे’ हे वाक्य आपण सर्रास ऐकतो. ही कीड बहुधा कीटकाची असते. त्यामुळे कीटक हे फक्त उपद्रवीच असतात असा समज होतो. पण काही कीटक हे शेतीसाठी उपयुक्तच नव्हे तर आवश्यकही असतात. आपण जी धान्ये, फळे, भाज्या आपल्या आहारात वापरतो, ती तयार होण्यासाठी त्या त्या वनस्पतीची फलधारणा होणे आवश्यक असते. फळधारणेसाठी परागीभवन ही एक अत्यंत आवश्यक क्रिया आहे. परागीभवन म्हणजे परागकणांचे फळधारणेसाठी होणारे स्थलांतर. फळ हे मुख्यत: लंगिक उत्पादन आहे. त्यासाठी एका फुलाचे पराग म्हणजे नर, परागवाहकाच्या मदतीने दुसऱ्या झाडावरच्या फुलाच्या बीजांड म्हणजे मादीपर्यंत पोहोचून त्यांचा संयोग व्हावा लागतो. फूल आणि परागवाहक यातील परागीभवनाचा पहिला संदर्भ अठराव्या शतकात ख्रिश्चन कोनरॅड िस्प्रगल या शास्त्रज्ञाने दाखवून दिला.
वनस्पती जगतातील फक्त १० टक्केवनस्पतींत फलधारणा ही स्वत:च्याच परागांनी होते उदा. पीच. आणखी १० टक्के वनस्पतींत परागीभवन हे कुठल्याही प्राण्याच्या मदतीशिवाय होतं. यात मुख्य सहभाग असतो तो वाऱ्याचा. उदा. वेगवेगळी गवते (त्यात धान्येही आलीच), सूचिपर्णी वनस्पती व काही पानगळ होणाऱ्या वनस्पती. दुसरा प्रकार पाणवनस्पतींचा. यांचे परागकण पाण्यात पडून प्रवाहाबरोबर वाहात जातात व दुसऱ्या फुलांचे परागसिंचन करतात. या दोन्ही प्रकारांत बरेचसे परागकण फुकट जातात. त्यामुळे या वनस्पतींत मोठय़ा प्रमाणावर परागनिर्मिती होते.
उरलेल्या ८० टक्के वनस्पतींत परागीभवनाची क्रिया ही प्राण्यांमार्फत होते. शास्त्रज्ञांनी या क्रियेत सहभागी असलेल्या दोन लाखांपेक्षा जास्त प्राण्यांची मोजदाद केली आहे. त्यात कीटकांची संख्या सर्वात जास्त आहे. सुंदर रंगीत फुलं, सुगंध वा ज्यात मकरंद असतो अशा वनस्पती परागीभवनासाठी वेगवेगळ्या मधमाश्या, इतर माश्या, भुंगे, ढालपंखी, फुलपाखरे, पतंग इत्यादी कीटक यांना आकर्षति करतात. वटवाघळे व पतंगांमार्फत परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं प्रामुख्यानं पांढरी, रात्री फुलणारी व विशिष्ट गंधाची असतात. पक्ष्यांकडून परागीभवन होणाऱ्या वनस्पतींची फुलं लाल पाकळ्यांची आणि क्वचितच गंधांची असतात. कारण काही मोजक्याच पक्ष्यांना अन्नाच्या शोधासाठी गंधाचे ज्ञान असते.
डॉ. विद्याधर ओगले मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा