श्रुती पानसे contact@shrutipanse.com
काही माणसं ही त्यांच्या पालकपणाने फार गांजून गेलेली असतात. अशी काही माणसं आहेत. ते या स्वरूपाचे प्रश्न विचारतात – मुलं कधी एकदा मोठी होणार? कधी एकदा शहाणी होणार? कधी एकदा स्वतंत्र होणार? हे एवढे का भांडतात? किती हे प्रश्न? कधी सुटणार? कधी एकदा मुलांना त्यांचं स्वत:चं कळणार आणि कधी आपण सुटणार, असं त्यांना होऊन गेलेलं असतं.
मुलांचे हट्ट, भांडणं, अंगातली अतिरिक्त ऊर्जा, सततच्या मागण्या- काहीच सहन होत नाही. अशा पालकांना कदाचित मुलं म्हणजे ‘एक आदर्श चित्र’ असावं अशी अपेक्षा असते. असं कधी होतं का?
जसं आदर्श मूल हे भिंग घेऊन शोधावं लागेल तसंच आदर्श पालक हेदेखील शोधावेच लागतील. या दोन्ही गोष्टी अस्तित्वात आहेत की नाही, हेही आपल्याला माहीत नाही.
इतरांची मुलं थोडाच काळ भेटतात. तेव्हा ती चांगलीच वागतात. म्हणून आपलीही मुलं अशीच शहाणी असावीत, अशीच आदर्श असावीत, असं वाटत राहतं. अशा प्रकारे तुलना केल्याने कोणीच शहाणं होत नसतं किंवा परिस्थिती आपोआप सुधारत नसते.
समाधानी होणं हे आपल्याच हातात असतं. पालक असतानाच्या काळातला सर्वात सुंदर काळ कोणता? तर, आजचा क्षण. मुलं वाढत असताना आता पुढे काय घडेल याचाच विचार करत राहिलो, तर त्या नात्यातली, त्या कामातली मजा कधी घेणार?
बाळांचे आवाज, पहिली पावलं, पहिले शब्द ऐकणं याचा आनंद फार महत्त्वाचा. शाळेतल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी मनापासून सोडवणं – या अडचणी वाटून घेणं हा क्षणही किती महत्त्वाचा आहे! मूल किती ‘हुशारीने’ आणि ‘चलाखीने’ हट्ट करत आहे हासुद्धा निरीक्षणाचा भाग असायला हवा. टीन एजमधल्या मुलांबरोबर मोकळेपणाने गप्पा मारणं, हे तसं अवघड; पण जमायला हवं.
आनंदाचा काळ पुढे केव्हा तरी येईल या आशेवर आज त्रास सहन करत आहोत असे विचार काहीच कामाचे नाहीत. त्यापेक्षा आज आणि आत्ता आनंदी राहाणं आपल्या हातात आहे.