भारत देशाचे तीन प्राकृतिक विभाग पडतात. सिंधू, गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या गाळाने बनलेल्या पट्ट्याला ‘सुपीक गाळाचा मैदानी प्रदेश’ (अॅल्युव्हियल प्लेन्स) म्हणतात. त्याच्या दक्षिणेला असलेल्या त्रिकोणी भागाला ‘भारतीय द्वीपकल्प’ (इंडियन पेनिन्शुला) म्हणतात आणि उत्तरेकडच्या हिमालयाच्या रांगांना ‘द्वीपकल्पबाह्य प्रदेश’ किंवा ‘द्वीपकल्पेतर प्रदेश’ (एक्स्ट्रापेनिन्शुला) म्हणतात.

या तिन्ही प्राकृतिक विभागांचा भूवैज्ञानिक इतिहास मात्र वेगवेगळा आहे. भूवैज्ञानिक घडामोडींमुळे जगाचा नकाशा सतत बदलत असतो हे त्याचे कारण आहे. खंडांच्या आणि महासागरांच्या जागांमध्ये बदल होता होता एक वेळ अशी आली की जगामध्ये दोन महाप्रचंड खंड निर्माण झाले; उत्तर गोलार्धातल्या खंडाला आपण लॉरेशिया म्हणतो आणि दक्षिण गोलार्धातल्या खंडाला गोंडवनलँड. या दोहोंच्या मधे असणाऱ्या महासागराला ‘टेथिस महासागर’ म्हणतात. उत्तरेकडच्या लॉरेशियामधून आणि दक्षिणेकडच्या गोंडवनलँडमधून आलेले अवसाद (सेडिमेंट्स) त्यात कोट्यवधी वर्षे साठत होते.

हेही वाचा >>> कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर

पुढे लॉरेशियाची शकले होऊन उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया असे तीन खंड झाले; तर गोंडवनलँडची आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय द्वीपकल्प अशी पाच शकले झाली. आपापल्या मार्गाने जाऊन ती आपल्या सध्याच्या जागी पोहोचली.

गोंडवनलँडची पाच शकले झाली तेव्हा भारतीय द्वीपकल्प एका त्रिकोणी बेटासारखे भासत होते. ते १३ कोटी वर्षांपासून उत्तरेकडे पामिरच्या पठाराच्या दिशेने सरकू लागले. भूपृष्ठाच्या खाली खोलवर होणाऱ्या हालचाली या बेटाला नेटाने उत्तरेकडे ढकलत होत्या, तर उत्तरेकडे आशियातले पामिरचे पठार पाय रोवून घट्ट उभे होते. त्यामुळे या दोघांच्या मधे टेथिस महासागराच्या तळाशी साठलेल्या अवसादी खडकांच्या थरांवर दाब पडू लागला. कोणतीही वस्तू दाब किती सहन करू शकते, याला साहजिकच मर्यादा असते. ही मर्यादा ओलांडली की ज्या वस्तूवर दाब पडलेला आहे त्या वस्तूचे विरूपण (डिफॉर्मेशन) होण्यास सुरुवात होते. टेथिस महासागराच्या तळाशी साठलेल्या अवसादी खडकांचे घड्यांच्या पर्वताच्या रूपात विरूपण झाले. त्या पर्वतराजीला आपण हिमालय असे नाव दिले आहे.

हिमालय पर्वताची निर्मिती काही एका रात्रीत झालेली नाही. अजूनही ती प्रक्रिया सुरूच आहे. भारतीय द्वीपकल्प आजही उत्तरेकडे सरकत आहे आणि हिमालयाची उंची आजही वाढत आहे. भारतीय द्वीपकल्पाची उत्तरेकडे सरकण्याची आणि हिमालयाची उंची वाढण्याची गती ‘दर वर्षाला काही मिलिमीटर’ इतकी नगण्य आहे, त्यामुळे ते आपल्याला जाणवत मात्र नाही.

 डॉ. विद्याधर बोरकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader