पक्ष्यांचे पंख हे आकाशात भरारी घेण्यासाठीच असतात. वटवाघूळ हा सस्तन प्राणी असला तरी त्याचे पंख इतर पक्ष्यांच्या पंखांप्रमाणे उडण्याचेच कार्य करतात. विमान निर्मितीचे बीज पक्षी, त्याचे निमुळते शरीर आणि या दोन पंखांमध्येच रुजलेले आहे. मात्र ध्रुवीय प्रदेशात अधिस्थान असलेल्या पेंग्विनचे पंख मात्र उडण्यासाठी नसून त्याला पाण्यात पोहण्यासाठी मदत करतात.
पक्षी आकाशात का उडतात, या कुतूहलाचे उत्तर आहे निवारा आणि भक्ष्य शोधणे. घार, गरुड यांसारखे पक्षी आकाशात उंच स्थिर उडताना दिसतात, मात्र त्यांची नजर भूपृष्ठावरील त्यांच्या भक्ष्याच्या हालचालीकडे असते आणि ते दिसताच वेगाने एका झेपेतच ते त्याला घेऊन पुन्हा आकाशात जातात. पेंग्विनचेसुद्धा असेच आहे. हा पक्षी त्याच्या पंखांच्या साहाय्याने समुद्रात खोलवर जाऊन सागरी खाद्य प्राप्त करतो.
थोडक्यात परिस्थितीमुळे पंखांचा उपयोग पोहण्यासाठी झाला आणि याच कारणासाठी त्याचा वारंवार वापर होऊ लागल्यामुळे सहा कोटी वर्षांच्याही आधी उडणाऱ्या पेंग्विनचे उडणे नंतर कायमचे बंद झाले ते झालेच. पेंग्विन पक्ष्यामधील ही एक उत्क्रांतीच आहे. हे सिद्ध करण्यासाठी शास्त्रज्ञांनी या पक्ष्यांच्या सहा कोटी वर्षे जुन्या ४७ जीवाश्मांचा अभ्यास केला. त्यांचा जनुकीय आराखडा तयार केल्यावर त्यांना आढळले की या पक्ष्यात पोहणे आणि उडणे या दोन्ही क्रिया नियंत्रित करणारी जनुके होती. पेंग्विनला सागरी भक्ष्य प्राप्त करण्यासाठी पोहणे अधिक उपयुक्त वाटल्यामुळे त्याने पंखांचा जास्त वापर पोहण्यासाठी सुरू केला. त्यामुळे उडण्याची क्रिया नियंत्रित करणारी जनुके अकार्यक्षम होऊ लागली आणि त्यांचे उडणे हळूहळू बंद झाले.
उडणाऱ्या पक्ष्यांची हाडे वजनाला हलकी असतात. मात्र पेंग्विनमध्ये कॅल्शिअमच्या साठय़ामुळे ती जाड, वजनदार आणि मजबूत होतात म्हणूनच त्याचा पाण्याखालील एक सूर ४०० मीटपर्यंत खोल असतो. शास्त्रज्ञ म्हणतात सहा कोटी वर्षांपूर्वी अंटाक्र्टिकावर बर्फ नव्हते, म्हणूनच हा पक्षी पोहण्यात तरबेज झाला. समुद्रात अन्न सहज उपलब्ध होत असल्याने या पक्ष्याने उडण्यासाठी लागणारी ऊर्जा खर्च करणे टाळले आणि त्याचे उडणे थांबले. पोहण्यास प्राधान्य मिळाल्यामुळे या पक्ष्यात उत्क्रांतीच्या प्रवाहात इतर शारीरिक बदल झाले. पूर्वीचे त्यांचे लांब पाय छोटे होऊन ते दोन पायांवर उभे राहू लागले त्यामुळे त्यांची उंची वाढली. नैसर्गिक उत्क्रांतीचा कालावधी नेहमीच प्रदीर्घ असतो. आज आपल्या राणीच्या बागेत असलेला पेंग्विन हा सहा कोटी वर्षांपूर्वी उत्क्रांतीत बदल झालेल्या त्याच्या पूर्वजांचा एक वंशज आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org