घरातील मिठाची पिशवी पाहा. त्यावर मोठय़ा अक्षरांत ‘आयोडीनयुक्त मीठ’, असे लिहिलेले दिसेल. मिठात आयोडीइन का मिसळतात? हा प्रश्न नेहमी पडतो. आयोडीन खूप अल्प प्रमाणात जरी शरीरास आवश्यक असते, परंतु तरी आयोडीन शरीराच्या वाढीसाठी फार आवश्यक असते. थायरॉइड ग्रंथीमध्ये या आयोडीनपासून थायरॉक्सीन नावाचा अंत:स्राव तयार केला जातो. या स्रावावर शरीराची वाढ व चयापचयाच्या अनेक क्रिया अवलंबून असतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भके व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतिमंद वा मुकबधिर होतात. मोठय़ा माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात, बौद्धिक क्षमता कमी होते, वाढ खुंटते. स्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. आयोडीन मुख्यत: समुद्री मासे, मीठ व कॉर्ड माशाच्या यकृताचे तेल इत्यादींपासून मिळते. कमी प्रमाणात दूध, मांस, पालेभाज्या व तृणधान्यातही ते काही प्रमाणात सापडते. पिण्याच्या पाण्यातही थोडय़ा प्रमाणात आयोडीन सापडते. जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठय़ा प्रमाणात या व्याधीला बळी पडावे लागते.
त्यामुळे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. गरीब, श्रीमंत असे सर्वच लोक जेवणात मिठाचा समावेश करत असल्याने मिठात आयोडीन मिसळल्याने सर्व देशातील या समस्येचा नायनाट करता येईल. त्यामुळे १ किलो मिठात १५ ते ३० मि. ग्रॅ. या प्रमाणात आयोडीन मिसळणे योग्य ठरते.
मिठात आयोडीन टाकण्यासाठी चार असेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. यात पोटॅशिअम आयोडेट, पोटॅशिअम आयोडाइट, सोडिअम आयोडेट व सोडिअम आयोडाइड यांचा समावेश होतो. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही मिठात आयोडीन मिसळल्याचा फायदा होतो. ज्या मिठाच्या आयोडायझेशनसाठी आयोडाइड वापरले आहे, ते जास्त काळ हवेच्या संपर्कात आले तर त्यातील आयोडीनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे घरात मीठ वापरताना ते झाकून ठेवणे चांगले.
डॉ. जगन्नाथ दीक्षित, (औरंगाबाद) मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,चुनाभट्टी,मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा