दिवाळी हा संपूर्ण सेंद्रिय सोहळा आहे. पंचेंद्रियांना स्पर्श करणाऱ्या सगळ्या सुख संवेदना त्यात सामावलेल्या आहेत (अपवाद फटाक्यांचे भीषण आवाज, धूर, वास इ.). यापैकी द्रष्टा दिवाळी, खास मन लुभावन. कारण फराळ सदासर्वकाळ असतो, सुगंधी उटणं बारा महिने मिळतं, फटाके वाजवायला तर कारणं लागत नाहीत. पण आकाशकंदील, झगमगते आकाशदिवे, घराघरातल्या दिव्यांच्या खास रंगीत माळा आणि रांगोळ्या ही अगदी फक्त आणि फक्त दिवाळीसाठी.
रांगोळी म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं घेतलेला (ती चित्रकार, रचनाकार असो वा नसो) दिवाळीचा द्रष्टा अनुभव असतो. स्वहस्ते रांगोळी काढणं, त्यात रंग भरणे, त्यावर किंचित चकचकी उधळणे, केंद्रभागी पणती ठेवणे. या गोष्टी करून बालपणातली दिवाळी सजलीय. आतादेखील रांगोळ्या बघून मन हरखून जातं. दहा आडवे, दहा उभे का होईना, रांगोळीचे ठिपके जमिनीवर काढून रांगोळी काढून पाहावीच.
बालपण संपलं तरी मनातलं रांगोळीचं आकर्षण मात्र कधी ओसरलं नाही. मानवी मनामध्ये रांगोळीचं इतकं आकर्षण का असावं, असा प्रश्न बालपणी निर्माण झाला. तो विचारल्यामुळे शिक्षकांच्या हातच्या आगाऊ प्रश्न विचारल्याबद्दल चापटय़ा खाल्ल्या. तरी, ती जिज्ञासा काही ओसरली नाही. मानसशास्त्रानं हे कोडं नंतर सोडवून दिलं.
रांगोळीबद्दल आकर्षण वाटतं केवळ ती फक्त सुंदर असते, रंगीबेरंगी असते म्हणून नाही, तर रांगोळी ‘इज पर्फेक्ट सीमेट्री’. सीमेट्री म्हणजे सममिती, रूपबंधातील सगळ्या रेषा, आकार आणि एकूण आकृती यांचं परस्परांशी पर्फेक्ट नातं. त्यांचं परस्परांशी असलेलं प्रपोर्शन अचूक असतं. त्या अचूकतेबद्दल, सममितीबद्दल मनाला आकर्षण वाटतं, त्या आकारात एक प्रकारचा सुरक्षितपणा असतो. ओबडधोबड, वेडेवाकडेपणा यांमधून नकळत सूचित होणारी अव्यवस्था आपल्या असंज्ञ मनाला अस्वस्थ करते. जणू काही अशा असुंदर एसिमिट्रीकल रचनेमध्ये काही तरी गूढ, भीतिदायक असू शकतं. अशी भावना आपल्या मनातल्या नेणिवेत आपोआप निर्माण होते आणि ती नकोशी वाटते.
एकुणात सममिती, अचूकता आणि आखीव-रेखीव असण्यामध्ये समग्रता असते. काही लपवून ठेवलेलं नसतं. त्यामुळे अशा बांधीव संरचना आपल्याला आकर्षित करतात. आश्वस्त करतात. कोणी तरी विचारपूर्वक, कष्टानं काढलेल्या रांगोळ्या मनात सुरक्षितता निर्माण करतात. त्या रंगसंगतीमुळे मन आनंदित होतं, रांगोळ्या घातलेल्या पाहिल्या की, आपोआप मनात दिवाळी साजरी होते.
मित्रा, तू म्हणशील दिवाळीच्या दिवसांत ही कशाला ‘सायकॉलॉजीगिरी’ लावलीय. मनापासून सांगतो. रांगोळीचं कोडं उलगडून दाखवून मनमोरानं दिवाळी साजरी केली. आता हे जाणीव, नेणीव, संज्ञ, असंज्ञ, सममिती विसरून जा. मस्तपैकी फराळ कर. कडबोळ्यांबरोबर ताजं ताजं लोणी आणि चकलीबरोबर साईचं दही इतकं मस्त लागतं! बायकोला पाडव्याची नि बहिणीला बीजेची छानशी भेट दे. बहिणीकडून रिटर्न गिफ्ट मागून घे आणि बायकोकडून काय मागशील? ते इथे सांगता येण्यासारखं नाही. समझे ना?
डॉ. राजेंद्र बर्वे
drrajendrabarve@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा