रसायनांचे अस्तित्व हे खरे तर, तिन्ही लोकांत; आकाशात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या पोटातही! अवघ्या विश्वात ते अणुरेणुच्या स्वरूपात भरून आहे, आणि धरतीवर ते अखिल सजीव सृष्टी व्यापून आहे. अगदी जीवाचे असणेपण ज्यामुळे ओळखले जाते ते डीएनए हेही नायट्रोजनचे आम्लारी घटक, डीऑक्सिरायबोझ नावाची शर्करा आणि फॉस्फेट्स-गटांपासूनच बनलेले आहे. ही रसायने, रासायनिक प्रक्रियांच्या मार्गाने विविध रूपांत प्रकट होऊन आपल्याला अचंबित करून सोडतात. चौकस स्थायिभाव असलेल्या मानवाला त्या गोष्टींचे कुतूहल न वाटावे, तरच नवल! प्रयोगाचे कौशल्य ज्यांना वश असे शास्त्रज्ञ मग स्वस्थ कसे? रसायनांच्या तळाशी खरवडून मग मूलद्रव्यांचा शोध घेत राहणे, यातला आनंद गेली काही शतके अनेकांनी घेतला. त्यामागे अनेकांचे श्रम, त्याग आणि चिकाटी होती. या सुरस कथांची अन् त्या कथा-विषयांना भुरळ घालणाऱ्या त्या मूलद्रव्यांची रोचक माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांचे कुतूहल वाढीस लागावे म्हणून या वर्षीचा विषय रासायनिक मूलद्रव्ये, असा निवडण्यात आला.
या विषयाचे सौंदर्य हे एखाद्या ललनेच्या गळ्यातील रत्नजडित हाराप्रमाणे असलेल्या अन् विशिष्ट रचनेत मांडलेल्या आवर्तसारणीच्या रचनेत आहे. आवर्तसारणी ही वृत्त, अलंकार आणि छंदबद्ध अशी एखादी कविताच असावी, इतकी त्यात शिस्त आहे- इकडचा शब्द तिकडे होणे नाही आणि मूलद्रव्यही! आवर्त सारणीच्या क्रमाने वर्षभर मूलद्रव्ये पिंजून काढावित असे ठरले आणि हे वर्ष संपता-संपता योगायोग पाहा – संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने पुढील वर्ष २०१९ हे ‘आंतरराष्ट्रीय आवर्त सारणी वर्ष’ म्हणून साजरे करण्याचे जाहीर केल्याचे कळले. तेव्हा २०१९मध्ये या कुतूहलचे पुस्तक स्वरूपात बारसे करण्याचा योग जुळून आला आहे, असो!
मूलद्रव्ये विषयाची रुजवात आदल्या वर्षी दोन महिने आधी झाली. ३६५ दिवसातील सुमारे २६० लेखांची विषयवार मांडणी आणि संभाव्य तज्ज्ञ लेखकांची चाचपणी सुरू झाली. लेखांची अद्ययावतता आणि मजकूराचे प्रामाण्य तपासण्यासाठी तज्ज्ञ म्हणून प्रा. डॉ. भालचंद्र भणगे, अभि. योगेश सोमण आणि डॉ. सुभगा काल्रेकर या त्रयीने जबाबदारी उचलली. पहिली सभा दोन डिसेंबर २०१७ रोजी होऊन परिषदेकडे लेख पोहोचणे सुरू झाले. काही जण मराठीतून प्रथमच लिहिणारे आणि मराठी पारिभाषिक संज्ञांशी अनभिज्ञ असणारे; तर काही जण मराठीतून विपुल लिखाण केलेले आणि तांत्रिक विषयही लीलया हाताळणारे सिद्धहस्त लेखक! परिषदेच्या माध्यमातून आजवर अनेकांना लेखनावर आपला हात साफ करता आला, याचा मविपला तर अभिमान आहेच; परंतु अशा लेखकांमध्ये त्या बाबतची कृतज्ञताही आहे.