उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा असेल तर त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांना प्रथिनांचा पुरवठा कमी होतो. प्रथिनांमुळे दुधाचे उत्पादन तसेच शरीराची वाढ होत असते. प्रथिनांच्या कमतरतेमुळे जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणून उन्हाळ्यामध्ये प्रथिनयुक्त अन्नघटक इतर माध्यमांतून दिले तर जनावरांचे पोषण चांगले होते.
धान्यातून प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी जास्त खर्च येतो. जनावरांच्या खाद्यात एझोलाचा वापर केल्यास खर्चात बचत होते. एझोला या निळे-हिरवे वर्गातील शेवाळामध्ये २५ ते ३५ टक्के प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह व इतर घटक मोठय़ा प्रमाणात असतात. जैविके आणि प्रतिजैविके यांचाही साठा असतो. एझोलामुळे पशुखाद्य किंवा पेंडीच्या वापरामध्ये २० ते २५ टक्के बचत होते. दूधउत्पादन वाढीबरोबरच उत्पादन खर्चातही बचत होते.
एझोला तयार करण्यासाठी चार फूट रुंद, नऊ ते दहा फूट लांब व सहा ते सात इंच खोल खड्डय़ामध्ये २००-३०० मायक्रॉन सिलपॉलिन (प्लास्टिक) कागदाचे आच्छादन करून पाणी साठविण्याचे छोटेसे तळे तयार करावे. यामध्ये १० ते १५ किलो चाळलेली सुपीक माती एकसारखी पसरावी. तसेच पाच किलो शेण १० लीटर पाण्यामध्ये भिजवून टाकावे किंवा १० किलो गांडूळखत टाकावे. यामध्ये ५० ग्रॅम सुपर फॉस्फेट टाकावे. पाण्याची उंची चार इंचापर्यंत ठेवावी. मग एक किलो एझोलाचे शुद्ध कल्चर या पाण्यावर सोडावे. एझोलाची वाढ झपाटय़ाने होऊन आठ ते दहा दिवसांमध्ये एझोला काढण्यासाठी तयार होते. अशा प्रकारच्या प्रत्येक तळ्यातून दोन दिवसांतून एझोलाची काढणी करावी.
एका तळ्यातून एक ते दोन किलो एझोला तयार होते. एझोला स्वच्छ पाण्यात धुऊन प्रत्येक गाईला दररोज एक ते दोन किलो तर शेळ्यांना २०० ते ३०० ग्रॅम खाद्यातून द्यावे. एझोलाचे उत्पादन चांगले मिळण्यासाठी १० ते १५ दिवसांतून एकदा ५० ग्रॅम सुपरफॉस्फेट टाकावे. तसेच थोडय़ा प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्य टाकले तर त्याचा फायदा होतो. तीन महिन्यांतून एकदा हा ‘बेड’ बदलावा. एझोला हे जैविक खाद्य असल्यामुळे त्याचा पशुपक्ष्यांची उत्पादनवाढ तसेच आरोग्य यासाठी फायदा होतो.
-डॉ. भास्कर गायकवाड (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा