पृथ्वीवरच्या भूवैज्ञानिक घडामोडींच्या समग्र इतिहासाचा शोध घेणे हे भूविज्ञानाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी विविध प्रदेशांतील खडकांच्या अभ्यासावरून तिथल्या स्थानिक भूवैज्ञानिक इतिहासाचा मागोवा घेतला जातो आणि त्यावरून पृथ्वीच्या भूवैज्ञानिक घडामोडींचा समग्र इतिहास संकलित केला जातो. तथापि पृथ्वीवर नवीन खडक आणि पर्वतरांगा निर्माण होत असतील, अस्तित्वात असणाऱ्या खडकांची झीज होत असेल, किंवा खंड आपली जागा बदलत असतील; अशा भूवैज्ञानिक घडामोडींचा थांगपत्ता कोणालाही अगदी अठराव्या शतकापर्यंत नव्हता. जेम्स हटन या स्कॉटलँडच्या निसर्गप्रेमी अभ्यासकाने १७८८ मध्ये पृथ्वीच्या भूवैज्ञानिक जडणघडणीत सतत बदल होत असतात, हे सप्रमाण दाखवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरे तर हटन यांनी वैद्याकीय शिक्षण पूर्ण केले होते. तरीही त्यांनी वडिलोपार्जित शेती करायचा निर्णय घेतला. शेती जोपासताना त्यांना निसर्ग निरीक्षणाचा छंद जडला. शेतीचा आणि हवामानाचा संबंध तर निकटचा आहे. आपल्या चौकस स्वभावानुसार हवामानाचा परिणाम भवतालच्या निसर्गावर काय होतो याचा शोध हटन घेऊ लागले, तेव्हा ‘हवामानाचा परिणाम होऊन खडकांची झीज होते,’ असे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले.

१७६७ साली स्कॉटलँडमध्ये एका कालव्याचे काम सुरू झाले. त्यासाठी ५६ किमी लांबीचे सलग खोदकाम झाले. त्यात अनेक खडक उघडे पडले. ते अभ्यासण्याची सुवर्णसंधी हटन यांना मिळाली. स्कॉटलँडमधल्या अन्य काही खडकांचाही त्यांनी अभ्यास केला. अस्तित्वात असणारे खडक लक्षात येणार नाही इतक्या मंद गतीने झिजत असतात, तसेच कुठे कुठे नव्या खडकांची निर्मितीही होत असते, असे त्यांनी दाखवून दिले.

या संदर्भात ज्या भूवैज्ञानिक प्रक्रिया आज कार्यरत आहेत, त्याच भूतकाळातही कार्यरत होत्या, हे त्यांनी सिद्ध केले. सागरकिनाऱ्यावर साठणाऱ्या पुळणीवर लाटांच्या खुणा उमटत असतात. त्यांना तरंगचिन्हे (रिपल मार्क्स) म्हणतात. अगदी तशीच तरंगचिन्हे कोट्यवधी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या अवसादी खडकांमध्येही उमटलेली आढळतात. त्यावरून ‘वर्तमानकाळ ही भूतकाळाची गुरुकिल्ली आहे’ अशी हटन यांची संकल्पना सूत्ररूपाने सांगता येईल.

पुढे १८३३ मधे ब्रिटिश निसर्ग अभ्यासक चार्ल्स लायेल यांचा ‘भूविज्ञानाचे मूलभूत सिद्धान्त’ (प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी) हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्यात त्यांनी हटन यांची संकल्पना उचलून धरली. लायेल यांचे समकालीन विचारवंत विल्यम व्हेवेल यांनी लायेल यांच्या ग्रंथाची समीक्षा केली. वर्तमानकाळातल्या आणि भूतकाळातल्या नैसर्गिक प्रक्रिया यांच्यातले साधर्म्य स्थलकालातीत असल्याने हटन यांच्या संकल्पनेसाठी त्यांनी ‘एकरूपतावाद’ (युनिफॉर्मिटारिअॅनिजम्) अशी संज्ञा त्या समीक्षेत सुचवली.

– डॉ. विद्याधर बोरकर 

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org