सुनीत पोतनीस
धातुशास्त्रज्ञ म्हणून तरुणपणी ब्रिटिशांसह भारतात आलेल्या जेम्स प्रिन्सेप या ईस्ट इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्याची २१९ वी जयंती कोलकात्यात ऑगस्ट २०१८ मध्ये साजरी केली गेली. हे ऐकून अनेकांना प्रश्न पडेल की कोण हा जेम्स प्रिन्सेप? भारतातील प्राचीन शिलालेख, ताम्रलेख आणि नाण्यांवर आढळणाऱ्या ब्राम्ही आणि खारोष्टी या लिप्यांची वर्णाक्षरे ओळखून ते लेख वाचण्याचे काम प्रथमच करणाऱ्या जेम्स यांनी प्राचीन भारतीय इतिहास संशोधनाची गुरुकिल्लीच भारतीयांच्या हातात दिली आणि हेच जेम्स यांचे भारतीय संस्कृतीसंवर्धनाचे मोठे कार्य होय! एक धातुशास्त्रज्ञ, पौर्वात्यविद्या अभ्यासक, पुराणवस्तू संशोधक, नाणेशास्त्रतज्ज्ञ अशी जेम्स प्रिन्सेप यांची विविधांगी ओळख होती.
जेम्स यांचा जन्म लंडनमधला, १७९९ सालचा. जॉन प्रिन्सेप आणि सोफिया यांच्या दहा अपत्यांपैकीजेम्स हे सातवे. जॉन प्रिन्सेप यांचेसुद्धा काही काळ भारतात वास्तव्य झाले होते. अगदी कफल्लक अवस्थेत भारतात येऊन त्यांनी पूर्वी नीळ-शेती केली आणि युरोपात नीळ विकून अमाप पसा केला. पुढे ईस्ट इंडिया कंपनीचे एजंट म्हणून लंडनमध्ये ते स्थायिक झाले, ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्यही झाले. एक प्रभावशाली खासदार आणि व्यापारी म्हणून नाव झालेल्या जॉन प्रिन्सेप यांनी मग आपल्या चार मुलांना ईस्ट इंडिया कंपनीत भारतात चांगल्या जागांवर नोकरीला लावून घेतले.
जॉन यांना कळले की भारतात ईस्ट इंडिया कंपनी दोन ठिकाणी नवीन टांकसाळी काढण्याच्या विचारात आहे, त्यांनी लंडनच्या रॉयल मिंटमध्ये जेम्सला प्रशिक्षणार्थी म्हणून दाखल केले. त्याशिवाय लंडनमधील एका कॉलेजात रसायनशास्त्राचा अभ्यासक्रम पुरा करायला लावला आणि त्यानंतर जेम्सची नियुक्ती ईस्ट इंडिया कंपनीच्या कलकत्ता टांकसाळीत सहायक धातुशास्त्रज्ञ म्हणून १९१९ मध्ये झाली. या टांकसाळीत वर्षभर काम केल्यावर त्यांची नियुक्ती नव्याने स्थापन झालेल्या बनारस येथील टांकसाळीत प्रमुख धातुशास्त्रतज्ज्ञ या पदावर झाली. दहा वर्षे बनारस टांकसाळीत काम केल्यावर कंपनी सरकारने जेम्स यांना कलकत्त्याच्या टांकसाळीचे प्रमुख म्हणून नियुक्त केले.
sunitpotnis@rediffmail.com