व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान देऊन समाजकल्याण साधणाऱ्या पारशी व्यक्तींमध्ये सर जमसेटजी जीजीभाय यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
जीजीभाय या पारशी औद्योगिक घराण्याचे संस्थापक जमसेट (जमशेद) जीजीभाय (इ.स. १७८३-१८५९) हे मुंबईतले एक साधारण कापड व्यापारी मखानजी यांचे पुत्र. जुजबी शालेय शिक्षण घेतल्यावर, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी प्रथम कलकत्त्यात जाऊन तिथे कापड व्यवसाय सुरू केला. तिथे त्यांना एका व्यापारी मालवाहू जहाजातून चीनला जाण्याचा योग आला. व्यापारकुशल जमशेद यांनी चीनमध्ये व्यापाराच्या संधींचा अभ्यास करून मुंबईस परत आल्यावर चीनबरोबर कापूस आणि अफूचा व्यापार सुरू केला. त्या वेळी त्यांचे वय होते केवळ अठरा वष्रे! पुढचा चीनचा एक दौरा जमशेद यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून केला आणि तेव्हापासून त्यांचे ईस्ट इंडिया कंपनीशी व्यापारी संबंध दृढ झाले. या काळात तिकडे युरोपात नेपोलियनशी युद्ध चालू होते. या युद्धकाळाचा फायदा उठवीत जमशेद य् यांनी आपल्या व्यवसायाचा मोठा विस्तार केला.
‘गुड सक्सेस’ हे आपले पहिले मालवाहू जहाज १८१४ मध्ये विकत घेऊन त्यांनी चीनशी कापूस, अफू आणि लाकडाचा व्यापार सुरू केला. थोडय़ाच काळात आणखी सहा जहाजे खरेदी करून त्यांनी स्वतचा मालवाहक जहाजांचा ताफाच उभा केला. व्यापारात अमाप संपत्ती मिळविणाऱ्या जमशेद यांनी १८०३ साली त्यांची आतेबहीण आवाबाईशी विवाह केला. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांच्याकडे दोन कोटींची संपत्ती जमली. पुढे त्यांनी आपल्या जमशेद या नावात गुजराथी पद्धतीने बदल करून जमशेठजी (इंग्रजी वळणाचा रूढ उच्चार ‘जमसेट’) असे केले. कापूस व अफूच्या व्यापाराव्यतिरिक्त जमशेठजी यांचा काचेच्या बाटल्या निर्मितीचाही व्यवसाय होता. त्यामुळे अनेक लोक त्यांना जमसेटजी बाटलीवाला या नावानेच ओळखत. मुंबईच्या विकासात त्यांच्या दानशूरपणाचा वाटा कसा होता, हे पुढल्या भागात पाहू..
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com