जीन जॅक्स रुसो या अठराव्या शतकाच्या अखेरच्या कालखंडातील जीनिव्हावासीयाची गणना पाश्चिमात्य युगप्रवर्तक विचारवंतांमध्ये होते. १७१२ साली जीनिव्हात जन्मलेल्या ‘फ्रँकोफोन’ रुसोंनी आपल्या लेखनातून फ्रेंच राज्यक्रांतीला प्रथम प्रेरणा दिली असे मानले जाते. फ्रेंच भाषा बोलणाऱ्या व्यक्तीला ‘फ्रँकोफोन’ म्हणतात. युरोपियन साहित्यातील अत्यंत प्रभावी मानल्या गेलेल्या रोमँटिसिझम या साहित्यशैलीचा जनक म्हणून रुसो ओळखला जातो. जीवनातील सर्व प्रकारची कृत्रिमता घालवून निसर्गाशी प्रामाणिक राहून जीवन जगावे आणि त्यासाठी आधुनिक मानवाने निसर्गाकडे परत फिरावे, असा संदेश त्यांनी आपल्या लेखनातून दिला. जीनिव्हात जन्मलेल्या रुसोंचे सर्व जीवन अत्यंत हलाखीत गेले. युरोपात त्या काळात निर्माण झालेली विषम राज्यव्यवस्था, विषम अर्थव्यवस्था यांच्यामुळे सामान्य माणसाचे जीवन यातनामय बनले होते. त्या काळात त्यांनी लिहिलेले ‘ए ट्रिटीज ऑन द सोशल कॉन्ट्रॅक्ट’ आणि ‘ए ट्रिटीज ऑन इनइक्व्ॉलिटी’ हे दोन ग्रंथ प्रभावी ठरले. या ग्रंथांमध्ये रुसोंनी तात्कालीन युरोपातील राजकीय आणि सामाजिक व्यवस्था नाकारून माणसामाणसातील समानता, व्यक्तिस्वातंत्र्य कायम राखता येईल, अशी लोकशाही शासन यंत्रणा सुचवली. जीनिव्हा स्वित्र्झलडमध्ये पश्चिमेला फ्रान्सच्या सरहद्दीला लागून असल्याने जिनेव्हामध्ये फ्रेंच भाषाच प्रामुख्याने बोलली जाते. त्यामुळे रुसोच्या लेखनाचा परिणाम तत्कालीन फ्रेंच राज्यव्यवस्थेमुळे गांजलेल्या सामान्य फ्रेंच माणसावर ताबडतोब झाला आणि त्यातूनच पुढे झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीची बीजे रुजली. ‘एमिल’ या रुसोंच्या ग्रंथात त्यांनी माणसाच्या जीवनातल्या खऱ्या आनंदाच्या शोधातच त्याच्या दु:खाचं मूळ आहे हे प्रभावीपणे कथन केलेय. ‘ला नूवेल एलॉयजा’ ही रुसोंची कादंबरी विश्व साहित्यातला एक मानदंड समजला जातो. या ग्रंथात समाजातील नतिक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केलाय. ‘द कन्फेशन्स’ हे रुसोंनी लिहिलेले आत्मचरित्र आदर्श समजले जाते. एवढी प्रभावी साहित्यनिर्मिती करणाऱ्या रुसोंच्या नशिबी मात्र दारिद्रय़, दैन्य, उपेक्षाच आल्या. १७७८ साली रुसोंचा मृत्यू झाला. परंतु त्यांच्या नंतरच्या काळातील गटे, इलियट, टॉलस्टॉय, महात्मा गांधी यांसारख्या थोर विचारवंतांवर रुसोंच्या विचारांचा प्रभाव राहिला.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
वृक्षाची फेरस्थापना
स्थलांतरणाची पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे झाडाभोवती खड्डा खणून झाड जमिनीपासून वेगळे करणे. हा अतिशय महत्त्वाचा भाग असून तो शास्त्रोक्त पद्धतीने न केल्यामुळेच बहुधा स्थलांतरित वृक्ष मेल्याचे आपण बघतो. म्हणजेच तांत्रिकदृष्टय़ा काम यशस्वी झाले पण झाडाचा मृत्यू झाला असे घडते. झाडाच्या आकारमानानुसार खोडापासून साधारणपणे ०.७५ ते १.० मी. अंतरावर एक मीटर रुंदीचा चर खणतात. हा चर एकदम खणण्यापेक्षा आठवडय़ाच्या अंतराने तीन-चार भागांत खणल्यास झाडाला कमी धक्का बसतो व झाड नवीन जागेत रुजण्याचे प्रमाण अधिक राहते. साधारण दोन-तीन आठवडय़ांत चर खणण्याच काम पूर्ण होते. हा चर खणताना अध्र्या खोलीनंतर चर आतल्या बाजूला वळवत नेला जातो. म्हणजे मुळाभोवतीच्या मातीच्या गड्डय़ाला उलटय़ा शंकूसारखा आकार प्राप्त होतो. चर खणण्याच्या दरम्यानच झाड जिथे स्थलांतरित करायचे आहे तिथे चराच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणतात. खड्डा खणताना जर चांगली माती लागली नसेल तर त्याऐवजी चांगली लाल माती वापरतात. ह्य़ा मातीत एकचतुर्थाश भागात कुजलेले शेणखत व जंतुनाशक मिसळतात.
वृक्षाभोवतीचा खड्डा खणताना मोठय़ा मुळांना धक्का लागणार नाही ह्य़ाची काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे खड्डा खोल खोल जातांना खोदकामात उघडय़ा पडलेल्या मुळांना ओल्या गोणपाटांनी झाकून ठेवल्याने मुळे न सुकण्याचे प्रमाण वाढते. तसेच चर खणताना झाड पडू नये म्हणून झाडाला चारही दिशांनी जमिनीत रोवलेल्या जाड खुंटांना मजबूत दोरखंडाने बांधून ठेवतात. चर सोटमुळाच्या जवळ पोहोचल्यावर झाड लहान असल्यास कप्पीच्या साहाय्याने तीन पायांच्या स्टॅण्डवर बांधून ठेवतात व जर मोठे असेल तर झाडाच्या वजनानुसार आणलेल्या यारीच्या दांडय़ाला बांधतात. यारीची स्लिंग दोरी मुख्य खोडाला बांधण्यापूर्वी खोडाभोवती गोणपाटाच्या अस्तरावर साधारण १ इंच जाडीच्या फांद्यांच्या तुकडय़ांची एक माळ करून बांधतात, ज्यामुळे झाड उचलताना स्लिंग दोरी झाडाला आवळून साल कचणार नाही. ह्य़ानंतर शेवटचा धक्का म्हणजे अजूनपर्यंत न कापलेली मुळे तोडणे व शेवटचे सोटमूळ तोडणे. हे काम अतिशय कौशल्याने करावे लागते. हे मूळ तोडण्यासाठी यारीचा दांडा थोडा थोडा उजवीकडे व डावीकडे असा हलवला की झाड मुळापासून जमिनीतून मोकळे होते.
– डॉ. विद्याधर ओगले
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org