मानवी रक्ताविषयी मूलभूत संशोधन करणारे कार्ल लँडस्टायनर यांचा जन्म १८६८ सालचा व्हिएन्नातला. व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर जैविक संशोधन कार्याला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. मानवी रक्त हा त्यांचा संशोधनाचा प्रमुख विषय. त्यांनी संशोधन करेपर्यंत सर्व मानवजातीच्या शरीरात एकाच प्रकारचे रक्त असते असा समज प्रचलित होता; परंतु त्या काळी युरोपातील रुग्णालयात जखमी सनिक आणि इतर रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास सरसकट कोणाही रक्तदात्याचे रक्त दिले जाई. रुग्णाच्या शरीरात हे दुसऱ्याचे रक्त गेल्यावर बहुतेक वेळा रक्तात गुठळ्या तयार होत आणि रुग्ण किंवा सनिक दगावण्याच्या घटना होत असत. अशा अनेक घटना घडल्यावर व्यक्तीव्यक्तींच्या रक्तात काही तरी फरक असला पाहिजे अशी लँडस्टायनरना शंका येत होती. रक्तविषयक संशोधनाचा त्यांनी ध्यास घेतला. १८९४ ते १९०० या सहा वर्षांत त्यांनी ३६०० व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण केले. १९०० साली आपल्या संशोधनातून त्यांनी मानवी रक्ताचे ‘ए’, ‘बी’, ‘ओ’ व ‘एबी’ असे चार गट असल्याचा निष्कर्ष काढला. प्रथम तत्कालीन वैद्यकवर्ग हे मानायला तयार नव्हता; परंतु १९०७ साली न्यूयॉर्क येथील इस्पितळातील एका जटील शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर लँडस्टायनरनी ब्लड ट्रान्स्फ्युजनचा यशस्वी प्रयोग करून आपले संशोधन सिद्ध केले. पहिल्या महायुद्ध काळात तर शेकडो जखमी सनिकांना त्याच्या रक्तगटाप्रमाणे त्यांना रक्त देऊन या संशोधकाने हजारो सनिकांचे प्राण वाचवले. याच संशोधनात त्यांनी मानवी रक्तात ‘अल्ग्युटिनीन’ नावाचे घटक द्रव्य असते आणि त्याच्यामुळे रक्तात गुठळी होते असाही शोध लावला.
त्यांनी केलेल्या संशोधनांमध्ये पोलिओबद्दलचे संशोधनही मौलिक समजले जाते. पुढे त्यांनी १९३७ साली केलेल्या संशोधनात ‘ऱ्हेसस फॅक्टर’ या रक्तातील घटकाचा शोध लावला. त्यातून रक्ताची आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह अशीही वर्गवारी करता येऊ लागली. आजही रक्तगटांच्या या वर्गवारीचा वापर होतो.
– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com
***********************************************
रस्त्याच्या दुतर्फा झाडे
आज वाहनांची संख्या अफाट वाढली आहे. रस्त्यांवरील वाहनांच्या धावण्यामुळे वायू व धूलिकण प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम काही प्रमाणात का होईना, कमी करण्यासाठी वनस्पतींचा उपयोग होतो. रस्त्याच्या दोहो बाजूंना झाडे लावली, वाढवली आणि त्यांचा हरितपट्टा तयार केला की प्रदूषके त्या पट्टय़ात शोषली जाऊन रस्त्याशेजारी राहणाऱ्या रहिवाशांना त्रास कमी होऊ शकतो. शहराबाहेरील महामार्गाच्या जवळील शेतांवर होणारा दुष्परिणामही कमी होऊ शकतो.
रस्त्याच्या फुटपाथवर झाडे लावल्यास रस्त्याची शोभा वाढते आणि वाहन चालकांच्या नजरेचा ताण कमी होतो असे आढळून आले आहे. (मात्र पादचाऱ्यांच्या जागेवर आक्रमण न करता असे वृक्ष लावावेत) मात्र वेगाने धावणाऱ्या वाहनांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून काही पथ्ये पाळावी लागतात. म्हणजेच वनस्पती प्रकार विचारपूर्वक ठरवावे लागतात, ज्यामुळे प्रदूषण निवारण, रस्त्याचे सौंदर्य आणि वाहनांची सुरक्षितता, या सर्वाचा मेळ होऊ शकतो.
रस्त्याच्या बाजूस लावण्यासाठी योग्य ठरू शकतील अशा वृक्षांना पुढील गुण असणे जरुरीचे आहे. जमिनीपासून तीन मीटर उंचीपर्यंत फांद्या असू नयेत, पानांचा पसारा मोठा असावा, पण त्यांचा कचरा रस्त्यावर पडू नये, वर्षांचा जास्त काळ पाने वृक्षावर असावी, जेणेकरून वाटसरूस सावली मिळावी, फळे पडून रस्ता निसरडा होऊ नये, प्रदूषके आणि धुळीचे कण शोषून घेण्याची क्षमता असावी, इत्यादी.
यांतील काही गुण असणाऱ्या वृक्षांची संक्षिप्त यादी पुढे दिली आहे. ही नावे सुचवताना वृक्षांच्या पर्यावरणीय उपयुक्ततेवर भर दिला आहे. साधारण निगा राखल्यास हे वृक्ष हरितपट्टय़ाचे उद्दिष्ट पूर्ण करतात. परंतु, वृक्ष प्रकार निवडताना सागरी, डोंगरी किंवा पठारी प्रदेशांतील हवापाणी, वारा ही विचारात घ्यावी लागतात.
कार्यक्षमवृक्ष कदंब, महारुख, सप्तपर्णी, समुद्रफळ, कांचन, असाना, कुंभा, कासोद, भोकर, करंज, भेंड, पिंपळ, पुत्रंजीव, तामण, चान्दाडा, शेंदरी, इत्यादी.
उपयुक्त वृक्ष – खिरणी, बकुल, नोनी, उंडी, सुरंगी, जंगली बदाम, अर्जुन, ऐन, रिठा, बेहेडा, इत्यादी.
संवेदनशीलवृक्ष म्हणून प्रदूषण निदर्शक – आंबा, असुपालव, शेवगा, आकाश निंब.
– प्रा. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org