इस्तंबूलच्या केमाल पाशाने १९२४ साली तुर्कस्तानात प्रजासत्ताक राज्याची स्थापना केली. इस्लाम आणि धर्माच्या नावावर तयार झालेल्या परंपरांमुळे तिथली जनता अडाणी आणि दरिद्री राहिली होती. त्यामुळे धर्माचे जोखड उतरवून विज्ञाननिष्ठ, आधुनिक समाजनिर्मिती या कार्यक्रमाला केमालने आता प्राधान्य दिले. त्यासाठी त्याने खलिफापद रद्द करून शासनात धर्मखाते तयार केले. त्यापूर्वी विवाह आणि घटस्फोटविषयक समस्या धर्म न्यायालय सोडवी, आता केमालने ते काम धर्मखात्याच्या मंत्र्याकडे सोपवले. ताईत, गंडेदोरे इत्यादी दरवेशी संघाचे काम बंद केले. सामाजिक सुधारणा करताना प्रथम पुरुषांचे पेहराव, जे तत्पूर्वी फेज टोपी आणि लांब अजागळ कपडे होते, त्या जागी डोक्यावर जर्मन पद्धतीची हॅट आणि पँट शर्ट सक्तीचे केले. लांबलचक दाढी वाढविण्यावर बंदी आणली. स्त्री-स्वातंत्र्याची मोहीम राबवताना केमालने बहुपत्नीकत्व कायद्याने रद्द करून स्त्रियांनी बुरखा घेण्याची सक्ती रद्द केली. तत्पूर्वी तुर्की मुस्लीम स्त्रिया बहुधा घराबाहेर पडत नव्हत्या. नवऱ्यासह बाहेर जाताना त्याच्यापेक्षा थोडे लांबून चालत. इतर पुरुषांबरोबर बोलणे हा मोठा अशिष्टाचार समजला जाई. केमालने तुर्की स्त्रियांच्या अशा रूढी बदलण्यासाठी प्रथम आपल्या पत्नीमध्ये परिवर्तन केले. तिला युरोपियन पद्धतीचा स्कर्ट किंवा पँट शर्टचा पेहराव करायला लावून इस्तंबूलमधील विविध कार्यक्रमांत बरोबर नेऊन सहभागी केले. केमालने स्त्रियांना राजकारणातही सहभागी केले. १९३५ साली सतरा स्त्रिया तुर्कस्तानच्या लोकसभेच्या सदस्य झाल्या. १९२७ च्या तुर्की लोकसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा अध्यक्षपदी नियुक्त झाल्यावर केमालने इस्लाम हा तुर्की प्रजासत्ताकाचा धर्म असल्याचे कलम राष्ट्राच्या घटनेतून काढून टाकून, ते धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे नमूद केले. इतर सामाजिक सुधारणा करताना केमालने धर्मातरबंदीचा कायदा केला. शुक्रवार हा सरकारी कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा दिवस बदलून तो रविवार केला. शुक्रवारचा नमाज हा ज्याने त्याने त्याचे कामकाज सांभाळून पढावा असे त्याने सुचविले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनीत पोतनीस

 sunitpotnis@rediffmail.com

 

गारंबीवेल

काही वनस्पतींचं खोड मजबूत नसल्याने त्या वनस्पती एक तर दुसऱ्या वनस्पतींचा विशेषत: झाडांचा आधार घेतात, नाही तर जमिनीवर पसरतात. अशा वनस्पतींना वेलीवर्गीय वनस्पती म्हणतात. या वेली जंगलात एका झाडावरून दुसऱ्या झाडावर गेलेल्या दिसतात. वेलींचं खोड म्हणजे अगदीच लवचीक असणार असं आपण गृहीत धरतो. पण एखाद्या वृक्षासारखं मजबूत खोडही काही वेलींना काही काळानंतर प्राप्त झालेलं दिसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर गारंबीवेल. कोकणात हर्णे, कर्नाळा, मुरुड-जंजिरा तसेच पश्चिम घाटात इतरत्रही गारंबीची वेल दिसून येते, या वेलीचे शास्त्रीय नाव ‘एनटाडा ऱ्हीडीई'(एल्ल३िं १ँी्िर) असून ती ‘फॅबीएसी’ कुळातील आहे. या वेलीच्या खोडाचा व्यास ४० सेंटिमीटपर्यंत वाढू शकतो तर वेलीची लांबी आणि उंची परिसरावर अवलंबून असते. खोडाच्या आधारानेच ही झाडावर पसरते. इतके अजस्र खोड पाहिल्यावर हे वेलीचे खोड आहे की एखादा वृक्षच आहे, असा संभ्रम पडतो. या प्रकारच्या वेलींना शास्त्रीय भाषेत ‘लायनाज’ म्हणजेच काष्ठवेली म्हणतात. अशी वेल निसर्गभ्रमण करणाऱ्या लोकांसाठी आकर्षण असते. ही वेल एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज पसरत जाते. फुले पांढऱ्या रंगाची, नाजूक, १५ सेंटिमीटर लांब अशा तुऱ्यात असतात. या वेलीचे फळ म्हणजे मोठी शेंग. मोठी म्हणजे किती असावी, एक  मीटर लांब आणि ८-१० सेंटिमीटर रुंद अशी असते. शेंगा सुरुवातीला हिरव्या रंगाच्या असून परिपक्व झाल्यावर भुरकट रंगाच्या होतात. शेंगेत जवळजवळ १० ते १२ बिया असतात. बीचे बाह्य़ आवरण चॉकलेटी रंगाचे व कठीण असते. त्याच्या आत पांढऱ्या रंगाची बी असते. सपुष्प वनस्पतीमधील सर्वात मोठे बी असल्याचा मान गारंबीच्या बीला मिळतो. या वनस्पतीच्या बीचा प्रसार पाण्यामार्फत होतो. ही औषधी वनस्पती असून कावीळ, दातदुखी आणि अल्सर या आजारांत वापरतात. दक्षिण आफ्रिकेत गारंबीवेल ही परंपरागत औषधी वनस्पती म्हणून वापरली जात असून ‘आफ्रिकन ड्रीम हर्ब’ म्हणूनही ओळखली जाते. रस्त्यावर औषधी वनस्पती घेऊन बसणाऱ्या वैदूंकडे गारंबीच्या बिया बघायला मिळतात.

शुभदा वक्टे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kemal pasha social development