गावोगाव अशा प्रकारचे पाझर तलाव नसल्यामुळे या वर्षीच्या दुष्काळात ग्रामीण जनता होरपळून निघत आहे. महाराष्ट्रातील कित्येक गावे उन्हाळ्यात रिकामी करावी लागतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रेल्वे आणि टँकरच्या सहाय्याने लोक व जनावरांची पाण्याची गरज पूर्ण करावी लागत आहे. पण हे काही दीर्घकालीन उपाय नव्हेत. तहान लागली म्हणजे विहीर खणण्याचा हा प्रकार झाला.
आजही काही गावांत तलाव आहेत व त्यात पाणीही आहे. पण प्रदूषणामुळे त्यातील पाणी पिण्याच्या लायकीचं राहिलं नाही. या तलावात कपडे धुतले जातात, जनावरे धुतली जातात, एवढेच नव्हे तर गावातील सर्व केरकचरा व सांडपाणीही तलावात विसर्जति करण्यात येते. ब्रिटिश राज्य येण्याच्या आधी गावातील सर्व तलावांची देखभाल ग्रामस्थ करीत असत. आता मात्र हे काम सरकारने करावे, अशी भावना लोकांमध्ये आहे.
दक्षिण भारतात आजही तलाव व्यवस्थेचे प्राबल्य दिसून येते. तेथील चारही राज्यांत संपूर्ण सिंचन व्यवस्था तलावांवर अवलंबून आहे. तिथे नियमित येणाऱ्या मान्सूनचा पाऊस पडत नाही. मान्सून जेव्हा परतीचा प्रवास करतात, त्या वेळी या भागात पाऊस पडतो. पण भरपूर तलाव असल्यामुळे या चारही राज्यांना सिंचनाचा त्रास जाणवत नाही. तलावांचा विकास करण्यासाठी या प्रदेशात बऱ्याच स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. त्यांपकी धन फाउंडेशन नावाची संस्था तर या क्षेत्रात मोलाचे काम करीत आहे. या वर्षी या संस्थेने केलेल्या कामाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करण्यात आला.
महाराष्ट्रातही विदर्भात जुन्या पद्धतीने बांधलेले मालगुजारी तलाव मोठय़ा संख्येने अस्तित्वात आहेत. पण तलावांचे व्यवस्थापन हा आज सरकारच्या अखत्यारीतील विषय झाल्यामुळे त्यांची नीट देखभाल होताना दिसत नाही. थोडक्यात काय, तर तलाव व्यवस्थापनात महत्त्वाचे बदल केल्याशिवाय त्यांच्यामध्ये सुधारणा होणार नाहीत.
सरकारचे या क्षेत्रातील औदासीन्य आपल्याला दूर करावे लागेल. तेव्हा कुठे पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी आदर्श व्यवस्था बनविता येईल.
– डॉ. दत्ता देशकर (पुणे)- मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जे देखे रवी..- गुजगोष्टी
माझ्या गुरूने माझ्याशी केलेल्या गुजगोष्टींचा एक ग्रंथ होऊ शकेल. एकदा एका सभेचे आयोजन करीत होतो. कोणी किती वेळ बोलायचे हे ठरवत होतो. तेव्हा मी किती वेळ बोलू असे मी त्यांना विचारले होते, तेव्हा ते म्हणाले, ‘ते तूच ठरव; परंतु स्वत:च्या भाषणाच्या प्रेमात पडू नकोस.’ भगेंद्र नावाचा एक आजार आहे, ज्यात गुदद्वाराच्या आत गळू होते, ते फुटते आणि बाहेर एक भोक तयार होते. ते काही केल्या बरे होत नाही. त्याच्यावरच्या शस्त्रक्रियेसंबंधी ते म्हणाले होते, ‘या भगेंद्राकडे मित्रत्वाने पाहा. कारण वाळवंटात रात्रीच्या ताऱ्यावरून जशी दिशा कळते, तसेच हे भगेंद्र तुम्हाला आतल्या गळूकडे जाण्याची दिशा दाखविते.’
हॅमिल्टन बेली याने उद्धृत केलेली तत्त्वे हे नेहमी सांगत असत. ‘शस्त्रक्रिया’ अयशस्वी झाली तर माझे नाव बदनाम होईल, असे वाटणे लांच्छनास्पद आहे. तुझी समाजातील यशापयशाची प्रतिमा महत्त्वाची नाही; परंतु ही शस्त्रक्रिया करण्यास मी लायक आहे की नाही यातून काही उद्भवले तर ते तुला सावरता येईल की नाही हा विचार जास्त महत्त्वाचा आहे.’ हा माझा गुरू माझ्या २५ वर्षांच्या त्यांच्या सहवासात कधीही कोणावरही रागावला नाही. कधीही घाबरला नाही, कधीही घाईत नव्हता.
मला एकदा ते म्हणाले, ‘घाई घाई करणाऱ्या माणसाएवढे कुरूप दृश्य जगात शोधून सापडणार नाही.’ एकदा शस्त्रक्रिया करायची ठरली की मग रुग्ण मुख्यमंत्री आहे की त्याचा संत्री याचा त्यांनी कधी विचारच केला नाही. ते निवृत्त झाल्यावरची एक गोष्ट आहे. त्यांच्या मुलीच्या हृदयाच्या झडपेवर शस्त्रक्रिया होणार होती. हे स्वत: हजर राहणार नव्हते. मी त्यांना म्हटले अनेक दिवस तुम्ही शस्त्रक्रिया केलेली नाही. आपल्या विभागात एक अवघड केस आहे तुम्ही करा. विद्यार्थी काहीतरी शिकतील. ते लगेचच हो म्हणाले, पण त्यांनी सुचविले की, मी त्यांच्या मुलीच्या आसपास राहावे. मी तिकडे गेलो. मुलीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि मी मोठय़ा आनंदाने त्यांना बातमी दिली, ‘सगळे उत्तमरीत्या पार पडले.’ हे त्यांच्या शस्त्रक्रियेत इतके दंग होते की, म्हणाले, ‘कशाबद्दल बोलतो आहेस. अजून अर्धेच काम झाले आहे’ मला त्यांना मग त्यांच्या मुलीची आठवण करून द्यावी लागली. तेव्हा म्हणाले ‘अरे हो विसरलोच आता, एक बघ बायको बाहेर आहे तिला जाऊन सांग.’
गीता म्हणते अभ्यासापेक्षा ज्ञान गहन आहे. ज्ञानापेक्षा ध्यान सरस आहे. ध्यानाच्या मानाने कर्म फलत्याग श्रेयस्कर आणि या त्यागापेक्षा शांति किंवा शांतपणा श्रेष्ठ आहे. माझे गुरू आहेत ख्रिश्चन, पण खरे गुरू असतात धर्मापलीकडचे.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – पांडु : भाग २
लक्षणे – १) त्वचा, नखे, डोळ्यांच्या आतील भाग, चेहरा व एकूण सर्व शरीर पांढुरके, निस्तेज दिसणे, नैसर्गिक गोरेपणा व पांढुरकेपणा यात नेमका फरक जाणवत असतो.  २) पायात -पोटऱ्यांत ताकद नसणे. ३) थोडय़ाशा श्रमाने थकवा येणे. विश्रांतीने बरे वाटणे. ४) हातापायाला मुंग्या येणे. डोळ्याखाली काळेपणा येणे. ५) शरीर शिथिल होणे. त्वचेला सुरकुत्या पडणे. सहनशक्ती कमी होणे. ६) शरीरात सर्वभर पित्ताची वाढ. शरीरभर भगभग विशेषत: डोळे, तळहात, तळपाय, लघवी यांची आग.
कारणे – १) खूप तिखट, आंबट-खारट असे तीक्ष्ण, उष्ण स्वभावाचे पदार्थ खाणे. २) शरीरातील रक्त व पित्त बिघडू शकेल असा विरुद्ध गुणांचा आहार घेणे. कारण नसताना चुकीची वेदनाशामक औषधे घेऊन त्यांचा परिणाम यकृत, प्लीहा (पानथरी), वृक्क (किडनी) तसेच शरीरातील मोठय़ा हाडांवर होणे. ३) जागरण करणे, वेळेवर न जेवणे, अकारण उपवास करणे, खूप श्रम करणे, त्यामानाने पुरेसा आहार नसणे. अधिक चिंता व कमी स्वास्थ्य. ४) स्थूलपणा, ग्रहणी, अरुची व अर्श ५) स्त्रियांच्या मासिक पाळीच्या अनियमितपणामुळे व अंगावरून अधिक जाणे.
शारीर परीक्षण – डोळे, त्वचा, नख याठिकाणी लालपणा का पांढुरकेपणा आहे, हे पहावे. बोटाच्या नखाजवळ दाबून रक्ताची सामान्य कल्पना येते. वजन घटणे, पोटऱ्या दुखणे, काम करण्याची इच्छा नसणे, थकवा यावरून रोगाचा अंदाज बांधता येतो. यकृतप्लीहा यांचे परीक्षणावरून सूज हे कारण कळते. जीभेच्या परीक्षणावरून कृमी, आव, मलावरोध यांचे निदान होते. पोटात स्पर्शावरून वायू किंवा मलाचा चिकटपणा, आव यांचे निदान होते. रक्ताचे परीक्षण प्रथम आठवडय़ाने, नंतर एक महिन्याने करावे.
उपचारांची दिशा – चव, भूक नसल्यास सुचवलेल्या उपचारांनी ती वाढते का? हे पाहावे. आहार वाढणे अत्यावश्यक. नुसत्या रक्तवर्धक औषधांनी टिकाऊ गुण मिळत नाही. विश्रांती, योग्य आहार, औषधे अशा त्रयींपैकी कशाची गरज आहे हे पाहावे. संधिवात, संधिशोध विकारांत सूजेपेक्षा रक्तवर्धनाकडे लक्ष द्यावे. बृहण उपचारांत अग्निवर्धन व रक्तवर्धनाला प्राधान्य द्यावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ६ एप्रिल
१८८७ >  गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक व लेखक पांडुरंग श्रीधर आपटे यांचा जन्म. त्यांची बरीच पुस्तके अनुवादित व चरित्रग्रंथ या प्रकारांत मोडणारी असली, तरी चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांती-सिद्धान्तावर आधारित ‘पूर्वजांचा शोध’ आणि पक्षी विरुद्ध मानव हा झगडा औपरोधिक शैलीत चितारणारे ‘अलौकिक अभियोग’ ही पुस्तके उल्लेखनीय आहेत. देहदानाचा संकल्प करणाऱ्या आपटे गुरुजींचे १९ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.
१९१९ >    ‘वा्र.ल.’ या नावाने परिचित असलेले समीक्षक आणि अनेक साहित्यिक, समीक्षकांच्या दोन पिढय़ा घडवणारे गुरू प्रा. वामन लक्ष्मण कुलकर्णी यांचा जन्म. समीक्षेविषयीची त्यांची भूमिका त्यांनी ‘साहित्य : शोध आणि बोध’ या ग्रंथातून मांडली आहे. समकालीनतेचे भान ठेवून अभिजाताचा शोध समीक्षकांनी घेतला पाहिजे, त्यासाठी समीक्षेने प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, अशी वालंची शिकवण होती. ‘वाङ्मयीन टीका आणि टिप्पणी’, ‘वाङ्मयातील वादस्थळे’, हे ग्रंथही त्यांनी लिहिले, तसेच नाटककार खाडिलकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वामन मल्हार जोशी यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचे यथायोग्य मूल्यमापन पुढील पिढय़ांसाठी उपलब्ध करून देणारे समीक्षाग्रंथ लिहिले.
– संजय वझरेकर

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khuthul pazhar lake and we part