विद्यापीठाचे पीकसंरक्षण वेळापत्रक काटेकोरपणे राबवल्यावर बदलत्या हवामानात थ्रिप्स नावाच्या किडीला जवळपास आळा बसतो, असे दिसून आले आहे. विद्यापीठाने भाताचे २६ सुधारित वाण विकसित केले, तर सहय़ाद्री २,३,४,५ या जातींची निर्मिती केली. विशेष म्हणजे रत्नागिरी १ व २ या सुधारित जाती कोकणच नव्हे तर लॅटिन अमेरिका व आफ्रिका या देशांमध्येसुद्धा लोकप्रिय आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील भाताच्या पहिल्या संकरित जातीच्या निर्मितीचा मान याच विद्यापीठाला मिळाला. संकरित वाणांचे मातृ-पितृ वाण संकरित जातीच्या बीजोत्पादनासाठी अनेक कंपन्या वापरत आहेत. आज कोकणात भाताचे उत्पादन सरासरी ३ टन/हेक्टर आहे. विद्यापीठाने विकसित केलेले वाण हेक्टरी ६ ते ७ टन उत्पादन देऊ शकतात.
भुईमूग, मोहरी यांसारखी पिके विद्यापीठाच्या संशोधनातूनच कोकणात प्रथम रुजली. भुईमुगाच्या कोकण टपोरा व कोकण गौरव या जाती विद्यापीठाने खास कोकणासाठी विकसित केल्या. या पिकांनी येथे भातानंतर आता महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. उन्हाळी भुईमुगाची कोकणातील हेक्टरी उत्पादकता राज्याच्या इतर भागाच्या मानाने सर्वात जास्त आहे. पशुधनामध्ये विकास घडवण्यासाठी शेळीची ‘कोकण कन्या’ ही बुटकी जात विकसित करण्यात आली असून ती अतिपावसात तग धरून राहते. मटणासाठीही ही जात अत्यंत उपयुक्त आहे. कोकणातील शेतकऱ्याला उपयुक्त अशा अनेक बाबींवर विद्यापीठाने संशोधन करून शेतीउपयोगी विविध यंत्रे, अवजारे विकसित केली. त्यांचे उत्पादन करून ती गरजू शेतकऱ्यांना पुरवली जातात.
विद्यापीठाने जलसंधारणाची अनेक कामे लोकसहभागातून केली. त्याचा फायदा पावसाळ्यानंतर शेतकऱ्यांना होत आहे. तसेच मत्स्यपालन व प्रक्रियेबाबत मोलाचे संशोधन केले. मत्स्यबीजोत्पादनासाठीचे हॅचरी तंत्रज्ञान प्रथमत: याच विद्यापीठाने विकसित केले. म्हशीच्या स्वादुपिंड आणि फुफ्फुसापासून इन्सुलिन व हिपॅरिन वेगळे करण्यात यश मिळवून विद्यापीठाने त्यासाठी केंद्रीय पुरस्कार मिळवला. याशिवाय कोय कलम तंत्रज्ञान प्रमाणीकरण, वैभव विळानिर्मिती, नूतन आंबा झेला, आंब्याची सिंधू जात, उद्यान विद्या व पर्यावरण संतुलन अशा विविध कार्यासाठी विद्यापीठाने अनेक पुरस्कार मिळवले. विद्यापीठास आय्एस्ओ ९००१:२००८ या मानांकनानेही गौरवण्यात आले आहे.
जे देखे रवी.. – लढा : अंक दुसरा – भाग ५ (ऊर्जेचा प्रवास)
ज्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही बाग नावारूपास आली त्यांची नावे मी मुद्दामच लिहीत नाही. कारण त्यांच्याबरोबर माझे बिनसले. त्याची मीमांसा उद्या करीनच, पण तूर्तास त्यांचे कोणाचेही अवमूल्यन न करता तीन-चार वर्षे ती बाग आणि ते उद्यान मी दिवस-रात्र जगलो हे नक्की. पहिल्यांदा एक माळी ठेवला. मग पैसे वाढले तसे दोन ठेवले. या भागात जगतील अशा वनस्पती लावल्या. दररोज माळ्यांना काम वाटून देत असे. सकाळ-संध्याकाळ देखरेख करीत असे. त्या जागेत महानगरपालिकेचा एक छोटा नळ होता. तो पुरेना म्हणून विवंचनेत होतो. तर आधी उल्लेख केलेल्या नाना कुंटे यांनी पैसे दिले. त्यातून एका ‘पायाळू’ला बोलावून पाणी शोधले आणि विहीर खणली. तर त्यातून प्रचंड पाणी उडू लागले. मवाली लोक आणि ‘तसल्या’ बायकांचा बंदोबस्त करण्यासाठी जी उत्तर विभागात गेलो. तिथे जाधव नावाचे एक कनवाळू अधिकारी भेटले. त्यांनी मला सांगितले दोन दिवस थांबा. दुसऱ्या दिवशी पोलिसांची गाडी आली. त्यांनी सगळ्यांना उचलले आणि काहीही न करता रात्रभर लॉक-अपमध्ये नुसते चौकशीच्या निमित्ताने डांबून ठेवले. मग सोडून दिले. तेवढय़ानेच ती ब्याद गेली. माणसे फिरायला येऊ लागली, तसे फेरीवाले आले. एकाच्या गाडीवर मी मांडीवर मांडी घालून बसून राहिलो. लोक जमले तसे ते पांगले.
एका दाढीवाल्याने रात्रभरात इथे साईबाबाचे तात्पुरते मंदिर उभारले. त्याची अक्षरश: दाढी धरून त्याच्याशी झटापट केली. तो शिव्याशाप देऊ लागला. त्याचे होऊ घातलेले मंदिर मी उचकटून टाकले. तेव्हा तो बाबांची मूर्ती घेऊन पळाला, तो परत आला नाही. आयुक्त काळे यांच्याकडच्या माझ्या फेऱ्या चालूच होत्या. एकदा तिथे सुप्रसिद्ध क्रिकेटर बापू नाडकर्णी भेटले. ते म्हणाले मी, ‘स्कॅटिंग असोसिएशनचा अध्यक्ष आहे. आम्ही त्यासाठी जागा शोधत आहोत.’ मी म्हटले, ‘माझ्याकडे जागा आहे.’ जसे काही तो भूखंड माझ्याच बापाचा होता! बापूंचे व्यक्तिमत्त्व मार्दवशील आणि स्वच्छ होते. रीतसर अर्ज देण्यात आला आणि हळूहळू तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाची घसरपट्टी बांधली गेली.
या संस्थेमध्ये गुजराथी हिरे व्यापाऱ्यांचे प्राबल्य होते. त्यांना मी म्हटले, बघा तुमचे काम मी केले. आता माझ्या लोकांसाठी तुम्ही चालण्याचा ट्रॅक करून द्या. त्या बिचाऱ्यांना ते करण्याशिवाय तरणोपायच उरला नाही. याला समाजसेवा म्हणायचे की लबाडी? बाग तर मार्गी लागली, पण काळ कोणाला सोडत नाही, तसेच माझेही झाले. त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – हृद्रोग : भाग ८
ज्या काळात मी सुमादि या औषधाचे संशोधन केले त्यानंतर काही काळ हृद्रोग, पौरुषग्रंथी वृद्धी, कृमी, यकृतविकार, धाप, गुल्म, शोथ, वृक्कविकार, श्रमश्वास, रक्तदाबवृद्धी, क्षय, तीव्र मलावरोध, तमकश्वास इत्यादी सान्निपातिक विकारात केवळ एकच काढा उपयुक्त ठरतो का म्हणून काही प्रयोग केले. त्याकरिता प्रथम ताज्या वनस्पतींच्या काढा पुडय़ा तयार केल्या. अनुभवाने थोडा फार बदल करून ‘राजकषाय’ नावाचा एक काढा-तयार काढा, आसवारिष्ट पद्धतीने करू लागलो. तो पाठ पुढीलप्रमाणे- घटकद्रव्ये – बाहवामगज, एरंडमूळ, कुटकी, हिरडा, पुनर्नवा, धमासा, गुळवेल, देवदार, कुमारीस्वरस, ज्येष्ठमध, गोखरू, वावडिंग, धने, लाक्षा, मनुका, पुष्करमूळ, पिंपळी, सुंठ व अर्जुन; सर्व समभाग व टिकविण्यासाठी धायटीचूर्ण, हिरडाचूर्ण, काढय़ाच्या साठ टक्के गूळ इ.
या काढय़ाचा वापर केवळ निवडक रुग्णांकरिताच करतो. ज्यांना फार औषधे लागू पडत नाहीत त्यांना हा काढा हृद्रोगात अर्जुनारिष्ट, अश्वगंधारिष्ट, दशमूलारिष्ट, अभयारिष्ट, कुमारी आसव यांच्यापेक्षा अधिक वेगाने गुण देतो. खूप खूप वर्षांपूर्वी पुणे येथे त्या काळातील प्रसिद्ध हृद्रोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके व माझे एकत्र व्याख्यान होते. तेथे मोठय़ा संख्येने हृद्रोग असणारी बडीबडी स्त्री-पुरुष मंडळी आधुनिक वैद्यक व आयुर्वेद अशा दोन्ही चिकित्सा पद्धतीतील सल्लामसलत ऐकू इच्छित होती. मी छोटा मजदूर वैद्य. हृद्रोगी माणूस घाबरला की, जवळचे नातेवाईक घाबरतात. कुठूनही पैसे आणतात; अॅन्जिओग्राफी, अॅन्जिओप्लास्टी करून घेतात. माझ्या दवाखान्यात हृद्रोग चिकित्सेकरिता आलेल्या मंडळींना एक थट्टा विनोदवजा सल्ला सांगून मी त्यांचे टेन्शन कमी करत असतो. ‘माझ्या कारखान्यात ५० मायभगिनी काम करतात. माझ्या हृदयाचे ५० तुकडे करून मी एकेकीला एक एक तुकडा दिला. त्यामुळे माझे हृदय सुरक्षित आहे.
त्यानंतरच्या हास्यकल्लोळात हृद्रोगी मंडळी काही काळ बिनधास्त राहिली. ‘तू हसत रहा, हसत रहा!’ हास्य योग जिंदाबाद!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – १६ जुलै
१८४४> निबंधकार, भाषांतरकार काशीनाथ बाळकृष्ण मराठे यांचा जन्म. सरकारी शिक्षणखात्याच्या आदेशानुसार त्यांनी ‘ज्योति:शास्त्र, भूवर्णन, भूशास्त्र, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी पुस्तके लिहिली.
१८७५> लेखक प्रा. नारायण दाजी लाड यांचे निधन. त्यांनी ‘रसायनशास्त्र’, ‘औषधविद्या’ या पुस्तकांसह अनेक संशोधनात्मक लेख लिहिले.
१९७४> अश्लीलताविरोधी मोहिमेचा विचार पायाशुद्ध भूमिकेतून पुढे ठेवणारे लेखक दत्तात्रेय बळवंत गोडबोले यांचे निधन. ‘अप्सरा’ या शृंगारिक मासिकावर फिर्याद दाखल करून संपादकाला तुरुंगात धाडले.
१९१४> मराठी कथाकार, विचारवंत आणि स्वातंत्र्यसेनानी वामन चोरघडे यांचा जन्म. ‘सुषमा’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यानंतर ‘हवन’, ‘यौवन’, ‘प्रस्थान’, ‘पाथेय’, ‘संस्कार’, ‘नागवेल’, ‘मजल’, ‘बेल’, ‘ख्याल’, ‘ओला दिवस’ असे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध झाले. विविध प्रकृतींची माणसे त्यांच्या कथांतून भेटतात. चंद्रपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. त्यांच्या स्वतंत्र, अनुवादित, संपादित ग्रंथांची संख्या जवळजवळ ७५च्या घरात जाते.
– संजय वझरेकर