चाकाचा उपयोग वाहतुकीच्या साधनांमध्ये, वेगवेगळय़ा उपकरणांमध्ये, यंत्रांमध्ये केल्याचे आपल्याला आढळते. पण प्राचीन काळी चाकाचा उपयोग चक्क घडय़ाळ म्हणूनदेखील केला गेला आहे. ओरिसा राज्यातल्या कोणार्क सूर्य मंदिरात आपल्याला हे पाहायला मिळते. मंदिराच्या पायथ्याशी दगडात कोरलेली चाके ही केवळ सूर्यरथाची चाके नसून ती सौरघडय़ाळे आहेत. सूर्यप्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीच्या आधारे या सौरघडय़ाळांच्या मदतीने दिवसा अचूक वेळ सांगणे शक्य आहे.
१२५०च्या दशकात बांधलेले हे मंदिर रथाच्या स्वरूपात आहे. या रथाला चाकांच्या १२ जोडय़ा, म्हणजे एकूण २४ चाके आहेत. चाकांवर असलेले कोरीव काम सारख्याच धाटणीचे असले तरी यातले प्रत्येक चाक थोडय़ाफार फरकाने वेगवेगळे आहे. चाकांच्या या १२ जोडय़ा वर्षांचे १२ महिने दर्शवतात; आणि २४ चाके दिवसातले २४ तास दर्शवतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या चाकांना आठ जाड आरे (स्पोक) आहेत. याचा अर्थ, दिवसाच्या २४ तासांचे विभाजन आठ प्रहरांमध्ये केले आहे. प्रत्येक प्रहर तीन तासांचा! म्हणजेच प्रत्येक दोन आऱ्यांमधील अंतर तीन तासांचा कालावधी दर्शवते. या आठ मुख्य आऱ्यांच्या दरम्यान कमी जाडीचे आणखी आठ आरे आहेत. म्हणजेच प्रत्येक तीन तासांच्या कालावधीचे विभाजन दीड-दीड तासांमध्ये, म्हणजे ९० मिनिटांमध्ये केले आहे.
चाकाच्या कडेवर पुरेशा मोठय़ा आकाराचे गोलाकार दगडी मणी आहेत. क्रमाने येणारा प्रत्येक मोठा आरा आणि लहान आरा यांच्या दरम्यान असलेली दगडी मण्यांची संख्या ३० आहे. याचाच अर्थ, प्रत्येक ९० मिनिटांच्या कालावधीसाठी ३० मणी कोरलेले आहेत. त्यामुळे दोन मण्यांच्या दरम्यानचा कालावधी हा तीन मिनिटांचा आहे.
चाकाच्या अक्षालगत जर एखादी काठी आपण धरली तर काठीची सावली कुठे पडते यावरून आपण तेव्हाची वेळ सांगू शकतो. मण्यांची संख्या जर लक्षात घेतली तर या घडय़ाळाचा वापर करून तीन मिनिटापर्यंत अचूक वेळ सांगणे शक्य आहे. म्हणजेच शास्त्रीय भाषेत, या घडय़ाळाचे लघुतम माप हे तीन मिनिटे आहे. मात्र दगडी मणी आकाराने पुरेसे मोठे असल्याने मण्याचे तीन समान भाग कल्पून आपण एक मिनिटापर्यंत वेळ सांगू शकतो.
मंदिराच्या पूर्वेला असलेल्या चाकाचा वापर सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंतची वेळ सांगण्यासाठी आणि मंदिराच्या पश्चिमेला असलेल्या अशाच प्रकारच्या चाकाचा वापर माध्यान्हापासून सूर्यास्तापर्यंतची वेळ सांगण्यासाठी केला जाऊ शकतो.
कला, विज्ञान आणि निसर्ग यांचा एक अद्वितीय संगम आपल्याला या चाकांच्या माध्यमातून कोणार्क सूर्यमंदिरात पाहायला मिळतो.
– हेमंत लागवणकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org