प्राचीन काळी पराशर नावाच्या शेतीतज्ज्ञाने मुख्यत: भातशेती होणाऱ्या प्रदेशात उपयोगी पडेल, अशी माहिती ‘कृषी पराशर’ या ग्रंथात २४३ चरणांद्वारे दिलेली आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भारतात शेती या विषयावर विविध अंगांनी सखोल असे लिखाण झाले होते. शेतीशी संबंधित पंधरा मुद्दे त्यांनी मांडले आहेत. त्यांतील उल्लेखनीय म्हणजे पावसाचे अनुमान, शेतीत वापरायच्या अवजारांची माहिती, पशुधनाचे व्यवस्थापन आणि बियाणांची काळजी.
पावसाचे महत्त्व सांगून त्याबद्दलचे ज्ञान आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले आहे. काही खगोलांची स्थिती, एखादा विशिष्ट ढग, वाऱ्याची दिशा, नदीची ठराविक दिवशीची पातळी, प्राण्यांच्या हालचाली इत्यादी घटक पावसाच्या अंदाजाकरिता त्यांनी विचारात घेतले आहेत. पराशरांनी ढगांचे चार प्रकार सांगितले आहेत- आवर्त, सामवर्त, पुष्कर व द्रोण. पौष महिन्यापासून प्रत्येक महिन्यात सरासरी किती पाऊस पडतो, याचे निरीक्षण करावे, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे. काठीला निशाण लावून वारा कोणत्या दिशेला वाहतो, याची दररोज नोंद करण्यासही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तरेकडून व पश्चिमेकडून वाहणारे वारे पाऊस आणतात. तर दक्षिणेकडून व पूर्वेकडून वाहणारे वारे पाऊस आणत नाहीत. वार्षकि, महिन्याचे आणि आकस्मिक अशा विविध प्रकारच्या पावसांचे अनुमान त्यांनी सांगितले आहे. पाऊस मोजण्याची पद्धतही ते स्पष्ट करतात. ‘जलाधक’ हे पाऊस मोजण्याचे माप त्यांनी सांगितले आहे. १०० योजने क्षेत्रफळ आणि ३० योजने खोली असलेल्या क्षेत्रात जेवढे पाणी मावते, ते एक अधक.
पावसाच्या अंदाजानंतर ते शेताच्या अवजारांकडे वळतात. हा मुद्दा त्यांनी सविस्तर मांडला आहे. नांगर, त्याचे भाग व त्यांची मापे त्यांनी स्पष्ट केली आहेत. टणक जमिनीसाठी चकतीच्या आकाराचा फाळ वापरावा असे ते सांगतात. तसेच २१ सुळे असलेल्या दंताळ्याचा ते उल्लेख करतात. याला ते विद्धक (हॅरो) म्हणतात. या साधनाचे विविध उपयोग असतात. ते नांगराला जोडण्याचे साधन असून ते दणकट असावे, असा ते सल्ला देतात. (उत्तरार्ध मंगळवारच्या अंकात)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा