सी-ग्रास किंवा सागरी गवत म्हणजे समुद्रात उगवणारी एक प्रकारची वनस्पती. ‘सी-ग्रास’ हा शब्द वापरणारे अशेरसन (१८७१) पहिले शास्त्रज्ञ असावेत. ही समुद्रकिनारी किंवा जमिनीवर वाढत नसून समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या आत आढळणारी एकमेव सपुष्प वनस्पती आहे. जशी माणसांमध्ये कुळे असतात, तशीच वनस्पतीतही कूळ पद्धत असते. त्यानुसार, समुद्री गवतांची चार कुळे आहेत. या वनस्पती बऱ्याच वर्षांपूर्वी जमिनीवरून समुद्रात स्थलांतरित झाल्या. त्या जमिनीवरील गवतासारख्याच दिसतात म्हणून त्यांना सागरी गवत म्हणतात. एखाद्या गवताळ प्रदेशाप्रमाणेच या वनस्पती बऱ्याच प्रमाणात एकाच जागी आढळल्यामुळे समुद्राखाली कुरण निर्माण झाल्याचा भास होतो. इतर हिरव्या वनस्पतींप्रमाणेच या वनस्पतीसुद्धा सौर ऊर्जेपासून अन्न तयार करतात. त्यामुळे जिथपर्यंत सूर्यकिरण पोहोचतात तेवढय़ा खोलीपर्यंतच या वनस्पती उगवतात. हे गवत काही वेळा समुद्रतटापासून जवळच असते. अशी समुद्री कुरणे आसपासच्या परिसरातील बराच कार्बन शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषण करतात आणि म्हणूनच त्यांना जगभरातील सर्वात उत्पादक परिसंस्था म्हटले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा