सागरी मासे हे प्राचीन काळापासून किनारी प्रदेशांतील लोकांच्या खाद्यसंस्कृतीचा भाग आहेत. त्यातील उच्च पोषणमूल्य आणि चवीमुळे अनेक प्रकारच्या आहारांत त्यांचा समावेश होऊ लागला. नव्याने मत्स्याहार करणाऱ्यांचा कल हा प्रामुख्याने पापलेट, हलवा, बांगडा, रावस, सौंदाळे, माकूळ, नळ, सुरमई, बोंबील, घोळ यांसारख्या कमी काटे, जास्त मांस असणारे आणि उग्र वास नसणारे मासे खाण्याकडे असतो, तर पट्टीचे मत्स्याहारी, मांदेली, मोतके, सुळे, बोय, पेडवे, लेपा, वाकट, तारली, जिताडा, काळुंद्र, कर्ली, मुडदुशे, शेंगटी अशा माशांचा समावेश आहारात करतात. याशिवाय कोळंबी, जवळा, कुल्र्या (चिंबोरी) असे संधिपाद तर तिसऱ्या, कालवं, नळ, माकूळ असे मृदुकाय त्यांच्या मत्स्याहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. खाण्यातले दर्दी मुशी, पाकट यांसारखे उग्र वास असणारे अस्थीमीन चवीने खातात. माशांपैकी बांगडे, ढोमे, लेपा, वाकटी, घोळ, सुरमई, मोतके हे मासे खारवून तसेच कोळंबी, जवळा, बोंबील हे न खारवता वाळवले जातात. काही माशांना फारशी चव नसल्याने (उदा. राणी मासा) बाजारात मागणी नसते परंतु त्यांचे पोषणमूल्य चांगले असल्याने मीट बॉल्ससारखी मूल्यवर्धित उत्पादने त्यापासून तयार केली जातात. मुशी, कुपा, यांच्या यकृतापासून जीवनसत्त्वयुक्त शक्तिवर्धक तेल काढले जाते. घोळीच्या ‘भोतीचा’ (वाताशय) वापर अनेक बाबींसाठी करतात. मत्स्योत्पादन परकीय चलन मिळवून देते म्हणून त्याकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा