अल्पना कुलकर्णी
‘‘भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) बेंगळूरु’’ ही भारतातील अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संस्था. येथील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्रात मशीन लर्निंग मॉडेल्स तयार करून विश्लेषण, भविष्यातील अंदाज आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया विकसित केली जाते. मानवाची भाषा संगणकाद्वारे समजून घेणे, भाषेचा अनुवाद करणे, आवाज ओळखणे तसेच प्रतिमांची ओळख, वस्तू ओळख, दृश्य डेटाचे विश्लेषण करण्याची क्षमता, ही कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जाते.

आरोग्य सेवेत वैद्याकीय प्रतिमांवरून संगणकीय प्रणाली वापरून लवकरात लवकर निदान करता येते. यामध्ये कर्करोग, हृदयविकार आणि इतर आजारांच्या निदानावर विशेष संशोधन चालते. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अचूक पद्धतीने बाधित पेशीपर्यंत थेट औषध पोहोचवण्याबाबत इथे संशोधन केले जात आहे.

हेही वाचा :कुतूहल : नकाशांच्या भविष्याचा नकाशा

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून उपलब्ध माहिती आणि डेटा सायन्सचा वापर करून आर्थिक मॉडेल, पर्यावरण अभ्यास आणि विविध वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठीही उपयोग केला जातो. भारतीय संस्थेने विविध आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांसोबत संशोधन आणि व्यावसायिक वापर या दोन्हीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विकसित केले आहे.

हेही वाचा : कुतूहल: स्मार्ट नकाशे

‘‘केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्था’’ (सीएफटीआरआय) ही भारतातील खाद्य तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन संस्था असून खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन विकास आणि प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करते आहे. इथे डेटा विश्लेषण आणि यंत्र शिक्षण प्रणालीचा वापर अन्न गुणवत्ता व सुरक्षा तपासणीसाठी केला जातो. अन्न उत्पादनातील दोष आणि हानिकारक घटक तंत्राद्वारे ओळखले जाऊन अन्न गुणवत्ता टिकवली जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची अन्न संरक्षकता वाढवणे, पोषणमूल्य सुधारणे, कच्चा मालाच्या गुणवत्तेत वाढ करणे व उत्पादन प्रक्रिया करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे अन्न उत्पादनाच्या मागणीचे व पुरवठ्याचे विश्लेषण या तंत्राच्या साह्याने केले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ग्राहकांच्या विशिष्ट पोषण गरजेनुसार अन्न उत्पादनाची निर्मिती करता येते. अन्नाचा अपव्यय टाळता येतो.

अल्पना कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org