करवत मासा हा सागरातील एक आश्चर्यकारक व अत्यंत दुर्मीळ जलचरांपैकी एक आहे. राजीफॉर्मीस उपगणाच्या प्रिस्टिडी कुलात याचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय निसर्ग व नैसर्गिक स्रोत संवर्धन संघटनेने या माशाच्या अस्तित्वात असणाऱ्या पाच प्रजाती संकटग्रस्त आणि वेगाने नष्ट होणाऱ्या म्हणून  घोषित केल्या आहेत. आपल्या देशातही वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत या माशांना संरक्षण मिळालेले आहे. त्यांची शिकार तसेच त्यांच्या अवयवांच्या वापरावर बंदी आहे. सर्वसामान्य जनतेत त्याबाबत जाणीव-जागृती व्हावी आणि त्यांचे संरक्षण व  संवर्धन व्हावे, या हेतूने २०१६ पासून १७ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक करवत मासा दिन’ म्हणून साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करवत मासे उष्णकटिबंधातील समुद्रकिनाऱ्यालगतच्या पाण्यात तसेच नदीमुखाजवळही सापडतात. करवत माशाचा आकार शार्कच्या शरीरासारखा असून लांबी सुमारे ७ ते ७.६ मीटर इतकी असू शकते. हा कास्थिमत्स्य असल्याने सांगाडा कास्थीने बनलेला असतो.  त्याचे मुख आणि कल्ले शरीराच्या अधरपृष्ठावर असतात. नाकाड करवतीच्या पात्याप्रमाणे चपटे व लांबलचक असून त्याच्या दोन्ही कडांवरील खवल्यांचे रूपांतर अणकुचीदार दातेरी रचनेत झालेले असते. नाकाडावर असलेल्या रंध्रांच्या आधारे ते आपल्याभोवती असणाऱ्या भक्ष्याचा वेध घेऊन आपले नाकाड करवतीप्रमाणे चालवून भक्ष्याच्या शरीराचे तुकडे करतात. करवतमासे जरायुज आहेत. ते एका विणीत सुमारे  २० पिल्लांना थेट जन्म देतात. नर माशाच्या अनुपस्थितीत शुक्राणूद्वारे फलन न झाल्यास अनिषेकजनन म्हणजे अफलित अंडी प्रौढ जीवात विकसित होण्याची प्रक्रिया दिसून येते. यांची आयुर्मर्यादा ५० वर्षांपर्यंत असू शकते.

त्यांचे मांस खाण्यासाठी व परांचा उपयोग सूपसाठी होतो. नाकाड हे अनोखी संग्राह्य वस्तू म्हणून तसेच काही पारंपरिक औषधांत वापरले जाते. या कारणास्तव मोठय़ा प्रमाणावर  होणारी त्यांची शिकार, त्याचबरोबर किनाऱ्यालगतच्या विकासकामांमुळे होणारा  अधिवासाचा ऱ्हास, ही त्यांच्या नष्ट होण्यामागची कारणे आहेत. नाकाडाच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे तसेच प्रचलन आणि भक्ष्य पकडण्याच्या प्रयत्नात बऱ्याचदा हे मासे मासेमारीच्या जाळय़ात गुरफटूनही मरतात. मार्च २०२२ मध्ये कर्नाटकातील उडुपी येथे ३ मीटर लांबीचा व सुमारे २५० किलो वजनाचा करवत मासा जाळय़ात अडकल्याचे प्रसारमाध्यमांतून समजले. यांना प्रयत्नपूर्वक अभय द्यायला हवे. 

डॉ. सीमा खोत ,मराठी विज्ञान परिषद