वैद्यकीय क्षेत्रात रोबॉटच्या मदतीने केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा शस्त्रक्रिया अधिक अचूक होतात. त्यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची कार्यक्षमता वाढते. अगदी ओपन हार्ट सर्जरीसारख्या अवघड, जटिल शस्त्रक्रियेमध्ये रोबॉटचा वापर होऊ लागला आहे. यांत्रिक हात, कॅमेरे, शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधने, उपकरणे यांनी सुसज्ज असलेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधिपत्याखाली काम करणारा रोबॉट डॉक्टरांच्या मदतीला असल्यामुळे त्यांनाही एक नावीन्यपूर्ण अनुभव मिळत आहे.
संगणकाजवळ बसून डॉक्टर या रोबॉटचे नियंत्रण करू शकतात. असे रोबॉट त्यांच्यामध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या जागेचे त्रिमितीय चित्र दाखवू शकतात, जे डॉक्टरांना साध्या डोळय़ांनी दिसणे अशक्य आहे. अशा शस्त्रक्रियेमुळे शरीरावर सूक्ष्म आणि आवश्यक तेवढाच अचूक छेद दिला जातो. पूर्वी पित्ताशय किंवा मूत्रिपडाच्या शस्त्रक्रिया करताना फार मोठा छेद द्यावा लागत असे. रोबॉटचा वापर करून केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये आवश्यक तेवढाच छेद द्यावा लागतो. जास्त रक्तस्राव होत नाही. जखमाही कमी होतात. रुग्णाचा त्रास वाचतो. गुंतागुंत कमी होते. शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता वाढते. शस्त्रक्रियेनंतर जखम भरून येण्याची प्रक्रिया जलद होते. रुग्ण लवकर बरा होतो. या पद्धतीच्या प्रत्येक शस्त्रक्रियेत निर्माण होणारी विदा एकत्रित केल्यास त्यापासून कृत्रिम बुद्धिमत्ता शिकू शकते आणि भविष्यात अशी कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला रोबॉट डॉक्टरांशिवायही अत्यंत सफाईने शस्त्रक्रिया करू शकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधिपत्याखाली असल्यामुळे रोबॉटची निर्णय घ्यायची क्षमता, शस्त्रक्रियेचा वेग, अचूकता, कौशल्य यामुळे या शस्त्रक्रिया एखाद्या अत्यंत निष्णात सर्जनने केलेल्या शस्त्रक्रियेइतक्याच उत्तम असतील.
डोळा हा अतिशय नाजूक आणि लहान अवयव आहे. त्यामुळे डोळय़ाची शस्त्रक्रिया ही अतिशय नाजूक, जटिल, गुंतागुंतीची असते. ही मायक्रोसर्जरी असते. त्यात एखादी अतिशय बारीक चीर द्यायची असेल तर ती तंतोतंत त्याच जागी देणे आवश्यक असते. येथे कृत्रिम बुद्धिमत्ता निश्चितच उपयुक्त ठरते. डोळय़ाच्या प्रतिमेचा अभ्यास करून नक्की कुठे चीर द्यायची हे ठरवता येते आणि तंतोतंत त्याच ठिकाणी नियंत्रणबद्ध पद्धतीने ती दिली जाते. विशेषत: रेटिनाच्या (ज्यावर प्रतिमा पडते तो पडदा) शस्त्रक्रियेसाठी हे फार उपयोगी ठरते. डोळय़ांच्या रोबोटिक सूक्ष्म शस्त्रक्रिया या रुग्णांसाठी वरदान ठरत आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सखोल शिक्षण अल्गोरिदम यांची योग्य, समर्पक सांगड घातली तर रोबोटिक शस्त्रक्रियेला उज्ज्वल भवितव्य आहे.
– बिपीन देशमाने ,मराठी विज्ञान परिषद