‘जगातील जहाजे थांबली तर अर्धे जग गारठून जाईल आणि उरलेले अर्धे उपाशी राहील’ अशी एक म्हण आहे आणि ती शब्दश: खरी आहे. आजही जगातील ९५ टक्के मालाची वाहतूक समुद्रामार्गे होते. यात अन्नधान्य, खते, कच्चे तेल, इंधने, रसायने आणि गॅस अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असतो. सध्या जगात ५० हजारांहून अधिक मोठी जहाजे आहेत. ही जहाजे चालवण्यासाठी जे मनुष्यबळ लागते ते पुरवणाऱ्या देशांमध्ये भारताला महत्त्वाचे स्थान आहे. यात कप्तान आणि इतर नौवहन अधिकारी, मरिन इंजिनीअर आणि इतर कर्मचारी यांचा समावेश होतो.
जहाजांवरील अधिकारी (र्मचट नेव्ही ऑफिसर) हे करिअर काहीसे चाकोरीबाहेरचे आहे. ‘नऊ ते पाच’ या पांढरपेशा नोकऱ्यांपेक्षा ते फार वेगळे आहे. यात एकतर अनेक महिने (हल्ली चार ते सहा) घरापासून दूर राहून ऊन-पाऊस, वादळ-वारे, बर्फ आणि कडाक्याची थंडी अशा बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते. दिवसा, रात्री कधीही आणि कधीकधी सलग अनेक तास काम करावे लागते. तरीही धाडसी वृत्तीच्या तरुणांमध्ये हे करिअर लोकप्रिय आहे आणि आजकाल काही तरुणीही या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. या आकर्षणाची कारणे म्हणजे जगप्रवासाची संधी, चांगला पगार (अनेकदा करमुक्त विदेशी चलनात), लांब (२-३ महिने) सलग सुट्टय़ा आणि आर्थिक स्वावलंबन.
अधिकारी वर्गासाठी यात तीन मार्ग असतात. नॅव्हिगेटिंग ऑफिसर (हे कॅप्टनपर्यंतच्या पदाला जाऊ शकतात), मरीन इंजिनीअर (जे पुढे चीफ इंजिनीअर होतात) आणि इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर. नॅव्हिगेटिंग ऑफिसर होण्यासाठी विज्ञान शाखेतून १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन प्रवेश मिळतो. त्यानंतर एक वर्ष जमिनीवर आणि दीड वर्ष समुद्रावर प्रशिक्षण घेऊन इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीची ‘बी.एस्सी. नॉटिकल सायन्स’ ही पदवी घेतल्यावर जहाजावर अधिकारी म्हणून नियुक्ती होते. त्यापुढे पदोन्नतीच्या परीक्षा देऊन कप्तानपदापर्यंत पोहोचता येते. मरीन इंजिनीअर हे मेकॅनिकल इंजिनीअिरगची पदवी किंवा मरीन इंजिनीअिरगचे प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात प्रवेश करतात. इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअिरगच्या पदवीनंतर प्रशिक्षण घेऊन नियुक्त होतात. या अधिकारी वर्गाखेरीज कर्मचारी वर्गात डेक, इंजिन आणि केटिरग या तीनही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची गरज असते.
कॅप्टन सुनील सुळे,मराठी विज्ञान परिषद