सील, समुद्रसिंह (सी-लायन) व वॉलरस अशा ३० प्रजातींचा पिन्नीपीडिया या गणात समावेश होतो. यांची शरीरे डोक्याकडे फुगीर, मध्यभागी दंडगोलाकार व शेपटीकडे निमुळती होत गेलेली असतात. यांच्या अग्र व पश्चबाहूंचे रूपांतर वल्ह्यासारख्या उपांगात झालेले असते. या उपांगांना टोकाकडे प्राथमिक अवस्थेतील बोटांसारखे अवयव आणि नखेही असतात. या दोन्ही बाहूंचा उपयोग त्यांना पाण्यात अतिशय चपळतेने हालचाल करण्यास होतो. बहुतेक पिन्नीपिडींच्या त्वचेखाली चरबीचा थर असतो व त्यामुळे हे प्राणी समशीतोष्ण, तसेच ध्रुवीय प्रदेशातील थंड पाण्यात राहू शकतात. त्याचप्रमाणे सर्व सीलच्या त्वचेवर लोकरीसारखा मऊ केसांचा थर असतो. बहुतांश वेळ पाण्यात पोहण्यात व्यतीत करणारे हे प्राणी प्रजनन व पिल्लांची काळजी घेणे, याकरिता जमिनीवर येऊन कळपाने राहतात.
वॉलरसच्या मुखात हस्तिदंतासारखे दोन मोठाले, तीक्ष्ण सुळे असतात. यांचा वापर ते स्वत:ची अजस्र शरीरे पाण्यातून बाहेर काढण्याकरिता, तसेच बर्फाचा थर फोडण्याकरिता करतात आणि पाण्याबाहेर असताना माद्यांचा ताबा मिळवण्यासाठी इतर नरांवर हल्ला करताना करतात. समुद्रतळाशी असलेले शिंपले, किडे, समुद्र काकडी असे अपृष्ठवंशीय प्राणी ते सुळय़ांनी वाळू उकरून खातात.
सीलचे अग्रबाहू खूप मजबूत असतात. जमिनीवर असताना त्यावर शरीर तोलणे आणि एखाद्या फणा काढलेल्या नागासारखे अर्धवट उभे राहणे, त्याला त्यामुळेच जमते. मध्यम आकाराचे सील छोटे मासे, माकूळ व अन्य छोटे जलचर यांच्यावर गुजराण करतात. तर लेपर्ड सीलसारखे मोठे भक्षक टय़ूना, शार्क असे मोठे मासे तसेच पेंग्विनदेखील खातात. सीलची मादी वयाच्या चौथ्या वर्षी प्रजननक्षम होते व ८-१० महिन्यांच्या गर्भधारणेनंतर एका पिल्लाला जन्म देते. उत्तर ध्रुवाच्या परिसरात मानवाने अनेक शतकांपासून चरबी, मांस व लोकरीसाठी सीलची शिकार केली.
समुद्रसिंहाला बाह्य कर्ण असून त्याचे चार पाय हे वल्ह्यांत रूपांतरित झालेले आहेत. जेव्हा ते जमिनीवर येतात तेव्हा त्यांना वल्हेसदृश पायांवर अवाढव्य वजन पेलत चालणे त्रासदायकच असते. नर समुद्रसिंहाच्या मानेवर सिंहाच्या आयाळीसारखे लांब केस असतात आणि ते कळपाच्या रक्षणासाठी गुरगुरत किंवा आवाज काढत असतात म्हणून त्यांना हे नाव पडले.
डॉ. राजीव भाटकर, मराठी विज्ञान परिषद