डॉ. शीतल पाचपांडे
महाराष्ट्र शासनाने किनारी व सागरी जैवविविधता केंद्राची स्थापना २०१७ मध्ये ऐरोली येथील ठाणे खाडी परिसरात रोहित (फ्लेमिंगो) अभयारण्यालगत केली. हे केंद्र कांदळवन, प्रवाळ, महासागरातील जीव, पाणथळ पक्षी यांच्याविषयी जनजागृतीसाठी निर्माण केलेले केंद्र आहे. केंद्राचा मुख्य उद्देश कांदळवन परिसंस्थेचेही महत्त्व पटवून देणे, फ्लेमिंगो बोट सफारीमार्फत रोहित पक्ष्याबरोबरच स्थानिक व परदेशी पक्षी प्रत्यक्ष दाखवणे, हा आहे.
वन विभागामार्फत नगरपालिका शाळांमधील मुलांना हे केंद्र पाहण्याचा आनंद विनामूल्य घेता येतो. समृद्ध कांदळवन व त्या परिसंस्थेतील जैवविविधता- पक्षी, खेकडे, शिंपले, विविध कांदळवन प्रजाती तसेच त्यांच्या मुळांमध्ये झालेले अनुकूलनही पाहायला मिळते.
केंद्रात प्रवेश करताच रोहित पक्ष्यांचे पुतळे दिसतात. रंगीबेरंगी मासे असलेले तळे पाहायला मिळते. या केंद्राच्या दोन स्वतंत्र इमारती आहेत. पहिली इमारत ही अनेकांना आकर्षित करणाऱ्या ‘टॅक्सिडर्मी’ पद्धतीने जतन केलेल्या खऱ्याखुऱ्या पक्ष्यांची आणि कासवांची आहे. महाराष्ट्रातील किनारपट्टीवर आढळणाऱ्या कासवांची उंची आणि आपली स्वत:ची उंची यामधील फरक दर्शवणारा तक्ता, हुबेहूब रोहित पक्ष्यासारखे दिसणारे पुतळे वापरून तयार केलेला सेल्फी पॉइंट आणि खरेदीप्रेमींसाठी जैवविविधतेशी निगडित उत्पादनांचे विक्री केंद्र या इमारतीत आहे.
दुसऱ्या इमारतीत जर्मन तंत्रज्ञान वापरून दृकश्राव्य माध्यमातून कांदळवन, प्रवाळ, मासे, समुद्रातील महाकाय प्राणी व त्यांच्या अधिवासाचे वेगवेगळे पैलू दर्शविले आहेत. भरती-ओहोटीच्या भागात सापडणारे पक्षी, बेडूक इत्यादींच्या चित्रांसह त्यांचे आवाजही ऐकवले जातात. सुरमई, बोंबील, डॉल्फिन, व्हेल यांसारख्या सागरी जीवांची माहिती व आवाज येथे ऐकायला मिळतात. येथील एलईडी डिस्प्लेवर पाणथळ भागांवर दिसणाऱ्या जीवांची तसेच रोहित पक्ष्याची सखोल माहिती वाचता येते. या अभयारण्याच्या जैवविविधतेविषयी विशेष माहितीपट दाखवण्यासाठी येथे छोटे प्रेक्षागृह आहे.
केंद्रातून खाडीपर्यंत जाण्यासाठी बोर्डवॉक व नुकतीच सुरू करण्यात आलेली फ्लोटिंग जेट्टी असे दोन मार्ग आहेत. दोन्ही मार्गानी खाडीपर्यंत जाण्याचा अनुभव अतिशय रंजक आहे. बोर्डवॉक कांदळवनातून वाट काढत खाडीचे दर्शन घडवतो तर फ्लोटिंग जेट्टी अंतर्भागात आढळणाऱ्या जीवांचे दर्शन घडवते. नोव्हेंबर ते मे या कालावधीत या केंद्राला भेट देता येते.