सागरी सस्तन प्राण्यांच्या चार प्रमुख गणांपैकी सेटाशीया (व्हेल, डॉल्फिन व पॉरपॉइज) या गणात एकूण ९० प्रजाती आहेत. सेटाशीया गणातील सस्तन प्राण्यांची शरीरे मध्यभागी फुगीर तर टोकांकडे निमुळती असतात. अग्रबाहूंचे रूपांतर वल्ह्यांच्या आकारात तर पश्चबाहूंचे एकत्रीकरण होऊन त्यांचे रूपांतर लांब व रुंद शेपटीत झालेले असते. ही शेपटी आडवी असल्यामुळे तिच्या एकाच फटकाऱ्याने त्या प्राण्याला त्वरित पाण्याच्या पृष्ठभागावर येण्यास मदत होते. यांच्या नाकपुडय़ा डोक्यावरती टाळूजवळ असल्यामुळे त्यांना श्वासोच्छ्वासासाठी पूर्ण पाण्याबाहेर यावे लागत नाही. अनेक व्हेल व डॉल्फिनच्या त्वचेखाली असणाऱ्या चरबीच्या जाड थरामुळे त्यांना थंड प्रदेशातही राहाता येते. यांची स्वरयंत्रे अत्यंत विकसित झालेली असतात. त्यामुळे त्यांना ध्वनिलहरी परावर्तित करून एकमेकांशी दूर अंतरावरून संपर्क साधता येतो. व्हेल प्रामुख्याने समशीतोष्ण प्रदेशात तर डॉल्फिन आणि पॉरपॉइज सर्व प्रकारच्या हवामानात आढळतात. व्हेलच्या काही प्रजाती भक्ष्याच्या शोधार्थ ध्रुवीय प्रदेशात जातात आणि तेथून प्रजनन करण्यासाठी जवळपास पाच ते सात हजार किलोमीटर प्रवास करून विषुववृत्त प्रदेशात स्थलांतर करतात.
व्हेलमध्ये दंतयुक्त व दंतविरहित असे दोन उपगण आहेत. त्यातील पहिल्या उपगणातील मोठे मासे, ऑक्टोपस, सील यांना खातात. दंतविरहित व्हेल त्यांच्या जबडय़ामध्ये केसासारख्या परंतु कडक तंतूपासून बनलेल्या गाळणीसदृश पट्टिकांतून पाणी गाळून छोटे मासे, क्रिल व प्लवक खातात. व्हेलची मादी साधारण १ वर्ष गर्भार राहते. एका वेळी एकाच पिल्लाला जन्म देते आणि पुढील वर्षभर स्तन्य देऊन त्याचे पालन करते.
तेल व मांसासाठी अनेक शतकांपासून व्हेलची शिकार केली जात असल्याने अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याचप्रमाणे जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, तेल उत्खनन इत्यादींमुळे सेटाशीया गणातील सस्तन प्राण्यांची संख्या कमी होत आहे. यावर उपाय म्हणून १९४६ साली ‘इंटनॅशनल व्हेलिंग कमिशन’ची स्थापना झाली. ही संस्था जागतिक स्तरावर व्हेलच्या संवर्धनासाठी अनेक मोहिमा राबवते. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबईनजीक सात टन वजन आणि ३० फूट लांबीचा निळा व्हेल मृत अवस्थेत सापडला. व्हेल प्रजातींचे संवर्धन व्हावे, त्यांच्या महत्त्वाविषयी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील तिसरा रविवार हा ‘जागतिक व्हेल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
डॉ. राजीव भाटकर ,मराठी विज्ञान परिषद